13 December 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : ‘अ‍ॅक्टिव्ह’ की ‘हायपरॅक्टिव्ह’?

असा वर्तनदोष (डिसऑर्डर) जर  झाला असेल, तर ही मुलं शांत झोपत नाहीत. त्यांच्यात चिंता दिसून येते.

(संग्रहित छायाचित्र)

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

एखादं मूल चपळ असेल, भरपूर हालचाल करत असेल, एका जागी स्वस्थ बसत नसेल तर त्याचा अर्थ ते मूल ‘अ‍ॅक्टिव्ह’ आहे असा  होतो. पण वय वर्षे आठच्या खालची बहुतांश मुलं ही थोडय़ाफार फरकाने अशीच असतात. मात्र, अशा मुलांना उद्देशून अगदी सहजपणे ‘हायपरॅक्टिव्ह’ ही संज्ञा वापरली जाते. सर्वच मुलांना हायपरॅक्टिव्ह म्हणणं हे योग्य नाही. कारण मूल अ‍ॅक्टिव्ह असणं ही चांगली गोष्ट आहे. चांगली तब्येत, चपळ मन त्यातून दिसून येतं. हायपरॅक्टिव्ह असणं हा मात्र एक प्रकारचा वर्तनदोष समजला जातो. योग्य ठिकाणी लक्ष नसणं यास ‘अटेंशन डेफिसिट डिसॉर्डर’ म्हणतात. अतिशय टोकाचा अस्वस्थपणा, कधीही शांत न बसणं, विचार न करता धाडदिशी एखादी कृती करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता नसणं अशा प्रकारे हा आजार समजला जातो. काही वेळेला ही मुलं चंचल असतात, तेव्हा त्याला ‘अटेंशन डेफिसिट हायपरॅक्टिव्हिटी डिसॉर्डर’ म्हणतात.

असा वर्तनदोष (डिसऑर्डर) जर  झाला असेल, तर ही मुलं शांत झोपत नाहीत. त्यांच्यात चिंता दिसून येते. सांगितलेल्या गोष्टी लवकर विसरण्याची शक्यता असते. ही मुलं अखंड फिरत राहतात, त्यामुळे शिक्षकांना आणि वर्गाला त्रास होतो. एखादी कृती करण्यापूर्वी सेकंदभराचा विचार करणं जमत नाही. त्यामुळेच कोणत्याही गोष्टींना धडकून येणं यांना जमतं. मात्र, या मुलांना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण ही मुलं मुद्दाम, इतरांना त्रास व्हावा म्हणून असं वागत नसतात. त्यांच्या वागण्याला त्रासून जाऊन विविध प्रकारच्या शिक्षा केल्या, पालकांनी योग्य उपचार करण्याऐवजी मारहाण करण्यासारखे उपाय केले तर वर्तन आणखीच बिघडतं. अशा मुलांचे विविध पद्धतीचे खेळ घेणं, त्यांच्याशी योग्य पद्धतीनं बोलत राहणं आणि ‘रेमेडिअल टीचिंग’सारखे काही उपाय करणं यामुळे त्यांच्यात सुधारणा होऊ शकतात. एडीएचडी हा मज्जातंतूंशी संबंधित आहे असं समजलं जातं.

मूल हायपरॅक्टिव्ह असेल तर बाजारात रंगीबेरंगी पुडय़ांमध्ये मिळणारे वेफर्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि जास्त प्रमाणात चॉकलेट्स खायला देऊ नयेत. ते मुलांच्या मेंदूसाठी चांगलं नाही. अशा पदार्थात असलेल्या सोडियमच्या अतिमात्रेमुळे आणि प्रिझव्‍‌र्हेटिव्ह्जमुळे  मूल अधिकच अस्वस्थ आणि उत्तेजित  होईल. अशा मुलांना हालचालींशी संबंधित कामं द्यायला हवीत, शिकवण्यात हालचालींचा अंतर्भाव करायला हवा.

 

First Published on August 9, 2019 4:40 am

Web Title: kids with active or hyperactive brain work zws 70
Just Now!
X