आपण मीटरच्या बाबतीत पाहिले तसे, एककांसारखी महत्त्वाची परिमाणे जर वैश्विक स्थिरांकांवर आधारलेली असली तर त्यांच्या व्याख्याही स्थिर राहतील व स्थलकालावर अवलंबून राहणार नाहीत. शिवाय वैश्विक स्थिरांक हे बहुतेक वेळा अनेक प्रयोगांद्वारे,

अतिशय अचूकपणे मोजता येतात. म्हणूनच, अशा स्थिरांकांवर आधारित एककांच्या व्याख्या करण्याचे तत्त्व अंगीकारले गेलेले आहे व या मापदंडांमधील नवे होऊ घातलेले बदल याच अनुषंगाने सुचवले गेले आहेत.

आता एक किलोग्रॅमच्या व्याख्येकडे वळू. आजचा किलोग्रॅम हा, फ्रान्समध्ये, शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ठेवलेल्या एका इरिडिअम-प्लॅटिनमच्या मिश्रधातूच्या एका दंडगोलाच्या वस्तुमानावर आधारलेला आहे. हा दंडगोल ‘मापदंड एकक’ म्हणून ओळखला जातो. अर्थात, यालाही अचूकतेच्या मर्यादा आहेतच, कारण त्याला चिकटणारे आजूबाजूचे अतिसूक्ष्म कणही वर्षांनुवर्षांच्या कालावधीत त्याचे वस्तुमान थोडेसे बदलू शकतात. त्यामुळे असा मापदंड दीर्घकाल वापरणे योग्य नाही. यातून मार्ग निघतो तो क्वांटम सिद्धांतातील प्लँकच्या स्थिरांकाद्वारे.

प्लँकचा स्थिरांक हा क्वांटम सिद्धांतानुसार प्रकाशलहरीची तरंगलांबी आणि प्रकाशलहरीची ऊर्जा यांच्यातील संबंध दर्शवतो. तसेच विशिष्ट सापेक्षतावाद हा ऊर्जा आणि वस्तुमान यांच्यातील संबंध दर्शवतो. परिणामी, वस्तुमानाचे एकक हे एखाद्या प्रकाशकिरणाच्या तरंगलांबीशी निगडित करणे शक्य आहे. अशा रीतीने निश्चित केली गेलेली किलोग्रॅमची व्याख्या ही वस्तुरूपी एककावर अवलंबून नसेल, तर ती लांबी व काळ या दोहोंच्या व्याख्यांप्रमाणेच फक्त स्थिरांकांवर अवलंबून असेल.

अर्थात, यासाठी प्लँकच्या स्थिरांकाचे मूल्य अत्यंत अचूकतेने निश्चित करणे आवश्यक होते. याच दृष्टीने गेल्या काही वर्षांत प्लँकच्या स्थिरांकाची अधिकाधिक अचूक मोजमापे घेतली गेली. या मोजमापांतून मिळालेली प्लँकच्या स्थिरांकाची किंमत काही महिन्यांपूर्वीच, ६.६२६०७०१५ ७ १०-३४ ज्यूल-सेकंद एवढी निश्चित केली गेलेली आहे.

नव्या व जुन्या किलोग्रॅममधील फरक अर्थातच मोजता येणार नाही एवढा सूक्ष्म असेल. किलोग्रॅमसारखे प्रमुख एकक बदलण्याची ही संधी साधून, इतर एककांच्या व्याख्याही वैश्विक स्थिरांकांच्या संदर्भात तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सात मूलभूत एककांपैकी किलोग्रॅमव्यतिरिक्त अजून केल्विन, अँपिअर आणि मोल या तीन एककांच्या व्याख्यांत बदल होणार आहेत. त्यासंबंधी पुढील लेखांत पाहू.

– डॉ. अमोल दिघे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

डॉ. भालचंद्र नेमाडे – देशीवाद

नेमाडे हे मातृभाषा मराठीचा देशीयतावादी पुरस्कार करणारे लेखक असल्याने त्यांनी आपली पहिली कादंबरी ‘कोसला’ ते ‘टीकास्वयंवर’मधील जवळजवळ सर्वच समीक्षालेखांतून देशीवादाचा पुरस्कार सतत केला आहे.

आधुनिक मराठी आणि भारतीय साहित्य इंग्रजीसारख्या संकुचित साहित्य संकल्पनांवरच नको इतके विसंबून राहात आहे, ही टोचणी एक प्राध्यापक, समीक्षक, संशोधक म्हणून त्यांना सतत अस्वस्थ करीत होती. या संदर्भात एका मुलाखतीत ते म्हणतात, देशी सौंदर्यशीलता अस्तित्वातच नाही. किंबहुना तिची गरजही नाही असं मानून आपले साहित्य, कलाव्यवहार काँग्रेस गवतासारखे फोफावत होते. या सगळय़ामुळे माझ्या मनात क्षोभ निर्माण होत असे. माझ्या मते एकंदर परिस्थितीतूनच देशीवाद मांडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. खरंतर कुठल्याही निर्मितिप्रक्रियेत आपापल्या परिसराचं, इतिहासाचं, भूगोलाचं, समाजाचं आणि एकंदर सर्व प्रकारच्या पर्यावरणाचं भान गृहीत धरलेलं असतं. प्रदीर्घ काळच्या आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक गुलामगिरीमुळे आणि सांस्कृतिक आयातीच्या व्यापाराची सवय जडल्यामुळे आपल्यावर आपल्या जवळच्या गोष्टींशिवाय एकूण नि:सत्त्व संवेदनशीलतेची परकीय प्रतिमानं समोर ठेवून साहित्यनिर्मितीची सवय लागली. आपल्या सामाजिक आशयाची समजसुद्धा परकीय संकल्पनांनी करून घेण्याची, नवीन सौंदर्यशास्त्रीय परंपरा मराठीत रूढ झाली. त्यावर वेषधारी, आधुनिकतेचं कवच मिळून देशी वास्तवाला फारच वाईट दिवस आले.

प्रादेशिक अस्मिता आणि देशीयता यांचे निकटचे संबंध आहेत. सगळय़ा स्वातंत्र्य चळवळी प्रादेशिक अस्मितेपोटीच निर्माण होतात. संयुक्त महाराष्ट्र हे काय होतं? प्रादेशिक अस्मिता असण्यात, ती बाळगण्यात काहीही अनैतिक नाही. वस्तुत: जगात सर्वत्र राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळी जिथे जिथे झाल्या, तिथे तिथे देशीवाद उफाळून आला. आधुनिकता ही सेंद्रिय परंपरेतून नैसर्गिकपणे आली पाहिजे. ती बाहेरून उसनी आणून जोडता येत नाही. देशीवाद आणि देशीपणा या दोन्ही अवस्थांना सामावणारा शब्द म्हणून आपण देशीयता ही संज्ञा वापरली. या शब्दांनी व्यक्त होणारं त्या त्या प्रदेशाचं व्यक्तिमत्त्व स्वाभाविकत:च कलानिर्मितीत उतरतं.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com