इ.स.पूर्व ३२०० च्या सुमारास दक्षिण इजिप्तमधील नकाडा या ठिकाणी नार्मर या माणसाने प्रथम आपले राज्य स्थापन करून संपूर्ण इजिप्तभर पसरलेल्या, विखुरलेल्या टोळ्यांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. पुढे मेनेस याने सध्याच्या कैरो शहराच्या परिसरातल्या मेम्फीस येथे साधारणत: इ.स.पूर्व ३००० च्या सुमारास राज्य स्थापन केले. हे राज्य संपूर्ण इजिप्तभर पसरून पुढच्या तीन हजार वर्षांत, रोमनांनी आक्रमण करेपर्यंत चांगलेच फोफावले. कैरो आणि संपूर्ण इजिप्तमधील प्रदेशात इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व ११०० हा राज्यकाळ ओल्ड किंगडम, मिडल किंगडम आणि न्यू किंगडम अशा तीन सत्ताकाळांत विभागला गेला. ओल्ड किंगडमच्या राज्यकालात म्हणजे इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व २२०० मध्ये कैरोला लागून असलेल्या गिझ्झा येथे तीन पिरॅमिड बांधले गेले.

इ.स.पूर्व ३३२ मध्ये कैरोवर अलेक्झांडरचा अंमल सुरू झाला. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर काही काळ कैरोचे प्रशासन त्याच्या गव्हर्नरने सांभाळल्यावर परत इजिप्तच्या राजांकडे म्हणजे फॅरोंकडे आले. इ.स.पूर्व ३० मध्ये क्लिओपात्रा सातवी या राणीच्या मृत्यूनंतर कैरो रोमन साम्राज्यात सामील केले गेले. रोमन सत्ताधाऱ्यांनी कैरोला प्रथम शहराचे स्वरूप दिले. इ.स. १५० मध्ये रोमनांनी बॅबिलोन फोर्ट बांधून त्याच्या सभोवती वस्ती निर्माण केली. इ.स. ४०० मध्ये कैरो शहर रोमन साम्राज्याकडून बायझंटाईन अमलाखाली आले. सध्याचे आधुनिक कैरो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी इ.स. ६४१ मध्ये अरब सेनानी अमीर-इब्न-अल अस याने आपला लष्करी तळ वसवून त्याला नाव दिले अल फुसात. पुढे ९६९ साली फातिमीद या इस्लामी वंशाच्या जाव्हर अल् सिकीली या नेत्याने अलफुसातच्या जवळ मनसुरिया हे शहर वसवून त्याचे नाव पुढे ‘अल् काहिरा’ असे केले. अरेबिकमध्ये अल् काहिरा म्हणजे जेता. अल् काहिराचे पुढे कैरो झाले. फातिमीड राज्यकर्त्यांनी कैरो येथे आपली राजधानी करून पुढची दोन शतके राज्य केले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

 

ब्रह्मकमळ : हे की ते?

ब्रह्मकमळ – खरे कोणते? कुठल्या वनस्पतींच्या फुलाला ब्रह्मकमळ म्हणावे असे बरेच वाद आहेत. एक व्यक्ती जेव्हा आपल्या घरी फुललेल्या ब्रह्मकमळाचा फोटो मोबाइलवर दाखवते, तेव्हा दुसरी व्यक्ती जिने हिमालयाच्या पायथ्याशी भटकंती केली आहे त्याला खोटे पाडते. आपण येथे ब्रह्मकमळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीची माहिती घेणार आहोत.

ब्रह्मकमळ कूळ सूर्यमुखी फुलाचे अर्थात अस्टेरॅसी. सामान्य इंग्रजी नाव स्नो लोटस. एक धार्मिक महत्त्व असलेली फुले नंदादेवी, केदारनाथ, बद्रीनाथ येथील मंदिरात वाहिली जातात. उत्तराखंड राज्याचे हे राज्यपुष्प आहे. या वनस्पतीची उंची साधारण ३० ते ४५ सेंमी असते. जुल-ऑगस्ट हा फुलांचा हंगाम. गुच्छात येणारी फुले जांभळट गुलाबी रंगाची उभयिलगी आणि पिवळट हिरव्या कागदी

ब्राकक्टसने झाकलेली असतात, त्यामुळे फुलांचे थंडी वाऱ्यापासून संरक्षण होते. ब्रह्मकमळ एक औषधी वनस्पती आहे. त्याचा उपयोग मूत्रमार्गात झालेल्या बिघाडासाठी होतो. या वनस्पतीची तोड मोठय़ा प्रमाणात झाल्याने हे ब्रह्मकमळ लुप्तप्राय होत जाणारी वनस्पती म्हणून घोषित झाले आहे. उत्तराखंड राज्यातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये हे पुष्प बघायला मिळते.

ब्रह्मकमळ अनेकांच्या गच्चीवर, बाल्कनीत कुंडीत बघायला मिळणारी ही वनस्पती. सामान्य इंग्रजी नाव नाइट ब्लू, मग कॅक्ट्स, क्वीन ऑफ नाइट. ही वनस्पती कॅक्टस कुळातील आहे. या ब्रह्मकमळाच्या फुलात ऑर्किडचे सौंदर्य असते तसेच खोड आणि पाने कॅक्टससारखी असतात, म्हणून कॅक्टस ऑर्किड या नावानेही ओळखले जाते. कॅक्टस ऑर्किड हे मूळचे श्रीलंकेचे आहे. पानाची लांबी ३० ते ४५ सेंमी असून मांसल व जाड असतात. पानातील विशिष्ट द्रव्याचा उपयोग अँटिबॅक्टेरियल म्हणून केला जातो. फुलाचा खालचा भाग जवळजवळ ३० सेंमी लांब लालसर रंगाचा असतो. पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. फुलाला मंद सुगंध असतो. फुले पानाच्या खाचांमधून उगवतात. फूल फुलण्याची सुरुवात सूर्यास्तानंतर सात वाजण्याच्या सुमारास होते. फुलाच्या सुगंधामुळे पतंग हे कीटक आकर्षित होतात, त्यामुळे फुलाचे परागण होते. वरील वर्णनावरून असे लक्षात येते की, आपल्याकडे फुलणारे ब्रह्मकमळ हिमालयातील ब्रह्मकमळ नाही.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org