विसाव्या शतकात झालेल्या दोन महायुद्धांनंतर जगात बरीच राजकीय उलथापालथ झाली. विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर जगातली बहुतेक साम्राज्ये कोसळली. या पराभूत साम्राज्यांचे, जेत्या राष्ट्रांनी लचके तोडून ते आपसात वाटून घेतले. यातूनच अनेक नवीन देशांचा उदय झाला. पुढे त्यांतील बहुसंख्य नवदेशांनी जेत्या राष्ट्रांच्या जोखडातून आपली सुटका करून स्वातंत्र्य मिळवले. पुढे हे देश स्वायत्त, सार्वभौम राष्ट्र म्हणून उदय पावले.

यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे, गेल्या शतकातील नवजात राष्ट्रांपैकी बऱ्याच राष्ट्राचा स्वातंत्र्यदिन हा ऑगस्टमध्ये येतो. हा एक विशेष योगायोग आहे! ईशान्य आशियातील चिमुकल्या दक्षिण कोरियाचाही स्वातंत्र्यदिन आपल्यासारखाच १५ ऑगस्ट रोजी येतो! तिथे लोकशाहीवादी सरकार- रिपब्लिक ऑफ कोरिया- १५ ऑगस्ट १९४८ रोजी स्थापन झाले.

सिंगापूर, तैवानप्रमाणेच दक्षिण कोरियानेही सार्वभौम देश म्हणून अस्तित्वात आल्यावर अल्पकाळातच- केवळ तीन ते चार दशकांतच औद्योगिक क्षेत्रावर भर देऊन, आधुनिकीकरण करून मोठा विकास केला. दक्षिण कोरियाने त्यांचा राष्ट्रीय विकासदर प्रतिवर्ष सहा टक्क्यांहूनही अधिक राखत जनतेच्या राहणीमानात आमूलाग्र सुधारणा केली. आशियातल्या असा चार छोटय़ा देशांनी कमी काळात झपाटय़ाने अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा केल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात त्यांचा उल्लेख ‘आशियाचे चार वाघ’ म्हणून केला जातो. त्यांपैकी सिंगापूर आणि तैवानविषयी आपण जाणून घेतले. यातला तिसरा वाघ आहे- दक्षिण कोरिया आणि चौथा- हाँगकाँग!

प्राचीन काळात या प्रदेशावर कोर्यो या वंशाचे राज्य होते आणि त्यामुळे या प्रदेशाचे नाव ‘कोरिया’ झाले. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात कोरियातील तीन राजघराणी एकत्र होऊन पुढे त्यांच्यापैकी गोरियो आणि चोसून या घराण्यांनी कोरियावर इ.स. १८९७ पर्यंत राज्य केले. इ.स. १८९७ ते १९१० पर्यंत येथे कोरियन साम्राज्य सत्तेवर होते. या काळात शेजारचे मांचुरियाचे साम्राज्य, चिनी राज्यकर्ते, जपानी साम्राज्य यांचे कोरियाशी सतत प्रादेशिक वाद आणि संघर्ष चालू असे.

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com