22 April 2019

News Flash

कुतूहल : क्रिप्टॉन

आवर्त सारणीमध्ये अणुक्रमांक ३५ असलेला अठराव्या गणात आणि चौथ्या आवर्तनात शेवटचे मूलद्रव्य म्हणजे क्रिप्टॉन.

आवर्त सारणीमध्ये अणुक्रमांक ३५ असलेला अठराव्या गणात आणि चौथ्या आवर्तनात शेवटचे मूलद्रव्य म्हणजे क्रिप्टॉन. स्कॉटिश रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रॅम्झी आणि मॉरिस एम ट्रॅव्हर यांनी ३० मे १९१८ रोजी क्रिप्टॉनचा शोध लावला. हा क्रिप्टॉन द्रवरूप वायूचे बाष्पीभवन करून मिळवला. हवेत मात्र त्याचे प्रमाण खूपच कमी आहे; समुद्राच्या प्रति किलो पाण्यामागे साधारणत: २.१ ७ १०-४ मिलिग्रॅम इतकेच! त्याचे अत्यंत अल्प प्रमाणात असलेले अस्तित्व यावरून (ग्रीक शब्द क्रिप्टॉज म्हणजे लपलेला) त्याचे नाव क्रिप्टॉन असे ठेवण्यात आले. हा रंगहीन तसेच गंधहीन वायू आहे. क्रिप्टॉनच्या बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनचे अष्टक पूर्ण असल्याने अठराव्या गणातील इतर मूलद्रव्यांप्रमाणे क्रिप्टॉनसुद्धा स्थिर आणि निष्क्रिय वायू म्हणून ओळखला जातो.

अत्यंत कमी प्रमाणातील उपलब्धता आणि हवेतून क्रिप्टॉन मिळविण्याच्या खूप खर्चीक पद्धतीमुळे त्याच्या वापरावर खऱ्या अर्थाने पुष्कळ मर्यादा आल्या आहेत. पण तरीही जिथे जिथे हा वायू वापरला जातो, त्या सर्व ठिकाणी त्याचे खूप महत्त्व आहे. क्रिप्टॉनची ३३ ज्ञात समस्थानिके आहेत आणि त्यांतील पाच समस्थानिके स्थिर आहेत. हिरव्या, पिवळ्या प्रकाश किरणांनी चमकणाऱ्या चिन्हांसाठी वापरण्यात येणाऱ्या वायूंच्या मिश्रणात क्रिप्टॉन हा महत्त्वाचा घटक आहे.

सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे लांबी मोजण्याचे एकक हे क्रिप्टॉन-८६ या समस्थानिकापासून प्रमाणित करण्यात आले. क्रिप्टॉन-८६च्या १६,५०,७६३ तरंगलांबी म्हणजे एक मीटर होय! ही पद्धत १९८३ पर्यंत वापरली जात होती. फुप्फुसाच्या रोगाचे अचूक निदान करण्यासाठी विकसित केलेल्या नवीन एम.आर.आय. स्कॅन तंत्रज्ञानामध्ये क्रिप्टॉनचा यशस्वीपणे वापर केला गेला आहे. क्रिप्टॉन-८५ हे किरणोत्सर्गी समस्थानिक मुख्यत्वे उच्च तीव्रतेचे डिस्चार्ज दिवे तयार करण्यात एक घटक म्हणून उपयोगी ठरले आहे. विमानाचे भाग, अर्धवाहक तसेच पाइपिंगची चाचणी करण्यासाठी क्रिप्टॉन-८५ वापरले जाते. मानवी शरीरात रक्ताचा प्रवाह अभ्यासण्यासाठीही क्रिप्टॉन-८५ वापरले जाते. हा वायू रक्तात मिसळल्यावर त्याच्या प्रवाहाची दिशा यंत्राच्या साहाय्याने निरीक्षण केली जाते. यावरून रक्तप्रवाह सुरळीत चालू आहे की नाही ते ठरविण्यास सोपे जाते.

डॉ. सुधीर कृष्णा लिंगायत

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org  

First Published on June 5, 2018 2:05 am

Web Title: krypton chemical element