कच्छच्या गादीवर १८१४ साली भरमलजी द्वितीय याला बसवून सन्याचे नियंत्रण ‘ बार भायात’ या बारा सदस्यीय मंडळाचा नेता हुसेन मियाँ याने केले. १८१५  सालाच्या अखेरीला ब्रिटिश आणि बडोद्याचे गायकवाड यांच्या संयुक्त फौजेने कच्छवर आक्रमण केले. संयुक्त फौजेचे नेतृत्व कर्नल ईस्टकडे तर कच्छचे नेतृत्व मियाँ हुसेनकडे होते. भद्रेश्वर येथे दोन्ही सन्यांची गाठ पडली. ब्रिटिश सन्य भद्रेश्वराच्या विशाल जैन मंदिराच्या आडोशाला उभे राहिले. विशेष म्हणजे कच्छचा सेनापती हुसेन मियाँ स्वत आणि अनेक सनिक मुस्लीम असूनही केवळ भद्रेश्वर जैन मंदिराचे पावित्र्य, ब्रिटिशांवर केलेल्या गोळीबाराने नष्ट होईल, ब्रिटिश सनिक मंदीर उद्ध्वस्त करतील या विचाराने त्याने ब्रिटिशांना प्रतिकार केला नाही.
या लढाईनंतर ब्रिटिशांनी अंजार परगाणा घेऊन कच्छ शासकांशी १८१९ साली संरक्षण क रार केला आणि कॅप्टन मेकमाडरे याला भूज येथे ब्रिटिश निवासी अधिकारी म्हणून नियुक्त केले. याच काळात १८१९ साली राज्यात मोठा भूकंप झाला आणि १८२३, १८२५ आणि १८३२साली दुष्काळ पडून मोठी मनुष्यहानी झाली.
कच्छच्या राजांपकी महाराव खेनगारजी तृतीय यांची कारकीर्द सर्वात मोठी म्हणजे ६७  वर्षांची झाली. खेनगारजी तृतीय महाराव यांनी कच्छ रेल्वे, कांडला बंदर आणि अनेक शाळांची पायाभरणी केली. त्याच्या काळात व्यापार उदीम वाढून राज्याची चौफेर प्रगती झाली. युरोपियन राजघराण्यातील अनेक व्यक्तींशी त्याचे जवळचे संबंध होते. महाराणी व्हिक्टोरियाच्या वृद्धापकाळात खेनगारजी तृतीय हे राणीसाहेबांचे विश्वासू म्हणून वावरत असत. भारतातील ब्रिटिश अधिकारी, व्हाइसरॉय यांनाही महाराणीची भेट हवी असल्यास महारावांच्या मार्फत गेल्यास त्वरित मिळत असे! जीनिव्हाच्या ‘लीग ऑफ नेशन्स’च्या १९२१ सालच्या बठकीत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
  सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल म्यूल – सूतकताई साचा (भाग १)
रिचर्ड आर्कराइटने जल साच्यामध्ये पेळूची जाडी कमी करण्यासाठी खेच रूळ व पीळ देऊन सूत बॉबिनवर गुंडाळण्यासाठी पंखाचे चाते वापरले होते. पंखाच्या चात्यामुळे सूतकताईमधील खेच, पीळ देणे व सूत बॉबिनवर गुंडाळण्याच्या प्रक्रिया एकाच टप्प्यात होत असल्यामुळे कताई प्रक्रिया अखंडित झाली. परंतु पंखाच्या चात्याचा आकार व वजन बरेच जास्त असल्यामुळे पीळ देताना सुतावर मोठा ताण पडत असे व चात्याची गती वाढवून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास सूत तुटत असे. त्यामुळे चात्याची गती एका मर्यादेपुढे वाढवणे शक्य होत नसे. त्यामुळे या साच्याची उत्पादनक्षमता मर्यादित होती.
या मर्यादा ओळखून सॅम्युअल क्रॉम्प्टन या शास्त्रज्ञाने  इ. स. १७७९ साली म्युल साचा विकसित केला. या साच्यामध्ये त्याने जल साच्यामधील खेच रूळ पद्धत वापरली आणि सुताला पीळ देऊन ते बॉबिनवर गुंडाळण्यासाठी जेनी यंत्राप्रमाणेच व्यवस्था ठेवली. एका अर्थाने म्युल हे यंत्र आर्क राइटचा जल साचा आणि जेम्स हारग्रीव्हसची जेनी यांचा संकर आहे. घोडय़ाची मादी व गाढवाचा नर यांच्या संकरापासून उपजणाऱ्या प्राण्याला इंग्लिशमध्ये म्युल असे म्हणतात म्हणून सॅम्युअल क्रॉम्प्टनने या साच्याला म्युल असे नाव दिले.
पूर्वीच्या जेनी यंत्रामध्ये पेळू घालून त्याचे सुतामध्ये रूपांतर करीत असत. परंतु आर्क राइटचा जल साचा विकसित होईपर्यंत कापसावर ज्या कताईपूर्व प्रक्रिया करतात त्यामध्ये बरीच सुधारणा होऊन पेळूची जाडी आणखी दहा पटीने कमी करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले होते. या पेळूपासून जाडी कमी केलेल्या कापसाच्या घटकास वात (रोिवग) असे म्हणतात. त्यामुळे जल साचा व त्यानंतर विकसित झालेल्या सूतकताई यंत्रामध्ये वातीपासून सूतकताईची पद्धत रूढ झाली. ही वात एका मोठय़ा बॉबिनवर गुंडाळली जाते. या बॉबिनला वातीची बॉबिन (रोिवग बॉबिन) असे म्हणतात. अर्थातच वातीची बॉबिन सुताच्या बॉबिनपेक्षा आकाराने मोठी असते हे ओघाने आलेच.
चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ – office@mavipamumbai.org