व्हॅनिलाला आपण ‘आईस्क्रीमचा स्वाद’ म्हणूनच ओळखतो; परंतु ते केशरानंतर सर्वाधिक महाग असलेले आणि शोभिवंत ऑíकड फुलाच्याच कुळातील पीक आहे. समुद्रसपाटीपासून थेट १५० मीटर उंचीपर्यंतच्या भागातही व्हॅनिलांची वाढ चांगली होते. पश्चिम घाटात व्हॅनिलाच्या लागवडीसाठी आदर्श स्थिती आहे. कोकणपट्टय़ातही व्हॅनिला शेतीचे प्रयोग सुरू आहेत.
व्हॅनिलाच्या वेलींना सावलीची आणि वाढीसाठी आधाराची आवश्यकता असते. म्हणून तिची लागवड सुपारी, नारळ यांसारख्या बागांमध्ये करतात. शेडनेटच्या कृत्रिम सावलीतही व्हॅनिलाची लागवड करतात. लागवडीसाठी शूट कटिंग वापरतात. शेंगा आल्यानंतर त्या पूर्ण पक्व झाल्यावर त्यांची काढणी करतात. कमी किंवा जास्त पिकलेली शेंग काढल्यास, स्वादावर परिणाम होतो. शेंगा काढल्यावर त्यांची तशीच विक्री करतात किंवा अधिक चांगली किंमत मिळण्यासाठी त्यांच्यावर काही साध्या प्रक्रिया करतात. १५ सेंटिमीटरपेक्षा लांब शेंग हा सर्वोत्तम दर्जाचा माल असतो. प्रत्येक शेंगेमध्ये बिया असतात आणि त्यावर लाल द्रवाचा थर असतो. त्यांच्यापासून अर्क काढतात.
व्हॅनिलाचा उपयोग खाद्यासोबतच औषध म्हणूनही करतात. अनेक उत्पादनांमध्ये कृत्रिम व्हॅनिला वापरतात. तो लाकडाच्या लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करून मिळवितात. असा व्हॅनिला स्वस्त पडतो. नसíगक व्हॅनिला मात्र खूप महाग असून अथक प्रयत्नांनी उपलब्ध होतो. व्हॅनिलाच्या फुलांना सुगंध नसतो. ती फक्त आकर्षक असतात. पण या फुलांपासून ज्या शेंगा येतात, त्या सुकविल्यानंतर त्यांच्यातून सुवास येऊ लागतो.
व्हॅनिला ही दक्षिण अमेरिकेने जगाला दिलेली देणगी आहे. स्पॅनिश खलाशांनी ती युरोपात आणली; परंतु त्या काळी व्हॅनिलाची प्रचंड लागवड करूनदेखील एखाद्याच झाडाला शेंग येई. यामुळे हे पीक व्यापारीदृष्टय़ा घेणे अशक्य ठरू लागले. याच काळात फ्रेंचांच्या रीयुनियन बेटावरील बागेत काम करणाऱ्या एडमंड नावाच्या एका गुलामाने सहज म्हणून व्हॅनिलाच्या फुलाचा पुढे आलेला भाग हाताने बाजूला केला आणि त्यामधील दांडी बाजूला करून परागकोष आणि स्त्रीकेसराग्रे एकमेकांवर दाबली. त्याच्या या कृतीमुळे त्या फुलापासून शेंग तयार झाली. आज साऱ्या जगात एडमंड नावानेच ओळखल्या जाणाऱ्या या पद्धतीने व्हॅनिलाचे फलीकरण करून व्हॅनिला सुगंध तयार करतात.

जे देखे रवी.. – रक्तकथा : कायदा, धंदा आणि धर्म
आधुनिक जगात रक्त हे एक ज्याचा कायदेशीर धंदा करता येतो असे एक उत्पादन झाले आहे. अमेरिकेतल्या एका बाईचा रक्तगट अगदीच विरळा होता. तेव्हा त्या गटाच्या रक्ताची मागणी होत असे तेव्हा हिला पाचारण केले जाई. ही बाई होती गरीब. तिने याचा व्यवसायच सुरू केला. रक्त वारंवार देता यावे म्हणून भरपूर पौष्टिक खुराक खायला सुरुवात केली आणि झालेले उत्पन्न वजा खुराकाची किंमत म्हणजे निव्वळ नफा, असे समीकरण मांडून तेवढय़ावरच कर भरेन, अशी भूमिका घेतली. त्यावर चाललेला कज्जा जवळजवळ चार वर्षे चालला आणि निर्णय तिच्याच बाजूने लागला. दुसरे एक जोडपे होते त्यांनी खासगी रक्तपेढी सुरू केली आणि रक्त देणाऱ्याचा मोबदला सरकारी पेढय़ांपेक्षा वाढविला. सरकारने त्याला विरोध केला आणि प्रकरण कोर्टात गेले. वरील दोन्ही कथा अमेरिकेतल्या. हा कज्जाही सरकारच्या विरोधात सुटला. तुम्ही कोंबडय़ाची अंडी विकता, मधमाश्यांचा मधाचा धंदा करता, मेंढपाळ लोकरीचा टनावारी लिलाव करतात आणि माणसे स्वत:चे केस विकतात. तर मग रक्त का नाही? या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. आज रक्ताच्या व्यवसायातली आर्थिक उलाढाल अनेक दशलक्ष डॉलर्सहूनही अधिक आहे. उदाहरणार्थ ही जाहिरात बघा- ‘तुम्हाला गोवर होऊन गेला असेल तर आम्हाला भेटा. कारण तुमच्या रक्ताला आम्ही जास्त किंमत देऊ.’ यातील गोम अशी आहे की, रक्तात फक्त ४५ टक्केच पेशी असतात. बाकीच्या ५५ टक्क्यांत ९० टक्के पाणी असते आणि ७ टक्के प्रथिने असतात. राहिलेल्या टक्क्यांत प्लेटलेट्स नावाच्या अर्धपेशी असतात. ज्यांच्यात रक्त गोठविण्याची शक्ती असते आणि तितकीच महत्त्वाची प्रतिजैविके असतात. गोवर, डांग्या खोकला, कांजण्या, निरनिराळ्या व्हायरसमुळे होणाऱ्या काविळी जर माणसाला होऊन गेल्या असतील तर ही प्रतिजैविके अनायासे मिळतात. प्रथिनांनाही भाव आहे तसाच प्लेटलेट्सना.
अशा तऱ्हेने माणसाच्या शरीराचे एक दुकानच तयार होते. अर्थात हे दुकान आणि रक्तपेढी कशी चालवायची यासाठी दुकानाला असतो तसा गुमास्ता कायदा असतो; परंतु शरीर केवळ रक्त देणारे किंवा विकणारे दुकान म्हणून थांबत नाही. तर त्या दुकानाचा मॉलही (टं’’) होतो जिथे सर्व प्रकारची इंद्रिये स्वखुषीने देण्याची किंवा मेंदूच्या मृत्यूनंतर ती कायद्याप्रमाणे नातेवाईकांना विचारून काढून घेण्याची सोयही असते. अशा तऱ्हेने अनेक जीव वाचतात, पण हे जीव वाचविताना काही लांडीलबाडी होते आहे का? अशी इंद्रिये देणे योग्य आहे का? हृदयाचेच रोपण केले तर मग आत्म्याचे काय वगैरे चर्चा करण्यासाठी नैतिकतज्ज्ञही असतात. अर्थात मेंदूचे दान करता येत नाही. मेंदू हलतो तेव्हा त्याबरोबर ती व्यक्ती हलते. म्हणजे अवतारच.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – दातांचे विकार
दातांचे विकार चांगल्या टूथपेस्टने, मऊ वा कडक टूथब्रशने बरे होत असतात अशी भाबडी समजूत, प्रसारमाध्यमांतील आकर्षक जाहिरातींमुळे होत असते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे दात शरीरातील अस्थिधातूचा एक महत्त्वाचा घटक आहे. दाताचे आरोग्य हे त्याच्या हिरडय़ांच्या आवरणाच्या सुस्थितीवर अवलंबून असते. निव्वळ ब्रशने दात घासून दंत समस्या संपत नाही. ‘पांढरे शुभ्र दात’ म्हणजे दाताचे आरोग्य नव्हे. दातांचे आरोग्य समजून घेण्याकरिता दात, हिरडय़ा, दातात उत्पन्न होणारी लाळ, दातावरील कीटण, दातांमधील अंतर, दातांची सार्वत्रिक झीज, दातातून घाण वास मारणे, दातातून रक्त येणे, अचानक कळा येणे. हिरडय़ा व दात सळसळणे, बालकांचे दात वाकडे येणे इत्यादी लक्षणांकडे थोरामोठय़ांचे व बालकाच्या पालकांचे लक्ष असायला हवे.
दातांचे आरोग्य बिघडण्याकरिता विविध कारणांचा मागोवा लहानथोरांनी घ्यायलाच हवा. १) दात नियमित साफ न करणे, २) दातात अन्नाचे कण अडकणे, ३) भरपूर चुळा न भरणे. ४) दाताला श्रम पडतील असे पदार्थ खाण्याची सवय नसणे. ५) पिठूळ, गोड, बुळबुळीत असा आहार जास्त असणे. ६) हिरडय़ा, दाढा, सुळे या वेगवेगळ्या दातांच्या अवयवांचा व प्रकारांचा नीट वापर न होणे, काम न मिळणे. ७) चहाकॉफी, कोल्ड्रिंक अशा थंड व उष्ण, उलटसुलट पेयांचा अतिरेकी वापर ८) विडय़ा, सिगारेट, पान, तंबाखू इ. व्यसन. ९) मिश्रीचा अज्ञानाने अपायकारक वापर,कोळशाची पूड असलेल्या दंतमंजनाचा वापर १०) ताप, सर्दी, पडशावर तीव्र औषधे घेणे. ११) अतिबोलणे, विशेषत: बाळंतपणानंतर जास्त बोलणे. १२) ब्रशचा चुकीचा वापर.
दाताची सूज असल्यास सूज ओसरेपर्यंत दात काढणे, भरणे, या गोष्टी करताच येत नाहीत. किडका दात मजबूत नसेल तर काढावा, काढलेल्या दातांचे जागी कृत्रिम दात बसविणे योग्य, त्यामुळे हिरडय़ा झिजत नाहीत. दातांचे आरोग्य हिरडय़ांच्या आरोग्यावर अवलंबून असते हे कदापि विसरू नये.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –   २७ मार्च
१८९३ > ‘जुनें जाउं द्या मरणालागुनि, जाळुन किंवा पुरुनी टाका’ अशा शब्दांत मराठी वाङ्मयातील नवमन्वंतराची चाहूल देणारी ‘तुतारी’ ही कविता केशवसुत (कवी कृष्णाजी केशव दामले) यांनी या दिवशी लिहून पूर्ण केली. १७ कडव्यांची ही ‘तुतारी’ समाजातील जुनाट रूढी-परंपरांविरुद्ध सुरू झालेल्या युद्धालाही स्फुरण देणारी ठरली.
१९२३ > कवी, कथाकार, कादंबरीकार व नाटककरा मंगेश भगवान पदकी यांचा जन्म. ‘ग्रामीण अर्थशास्त्र’ या विषयावर दांडगा अभ्यास असलेल्या पदकींचे ‘यक्षगान’ ‘खारीची पिल्ले’ हे कथासंग्रह, तसेच चार कादंबऱ्या, ‘राव जगदेवराव मरतड’ (सिरॅनो डि  बर्जेर्सच्या कथेवर आधारित) व ‘उद्धव’ ही नाटके, असे त्यांचे वैशिष्टय़पूर्ण साहित्य. १९९९ मध्ये त्यांचे निधन झाले.
१९५१ > ‘चिरदाह’, ‘ अस्वस्थ, विस्तीर्ण रात्र’ या कथासंग्रहांसाठी अधिक परिचित असलेले भारत सासणे यांचा जन्म. ‘जॉन आणि अंजिरा पक्षी’, ‘बाबीचे दुख’, ‘लाल फुलांचे झाड’ ‘अनर्थ’ क्षितिजावरती रात्र’ असे कथासंग्रह, दोन लघुकादंबऱ्या तीन नाटके अशी साहित्यसंपदा निर्माण करणाऱ्या सासणे यांनी लहान मुलांसाठी ‘जंगलातील दूरचा प्रवास’ ही कादंबरी आणि दोन बालनाटय़ेही लिहिली आहेत!
– संजय वझरेकर