लोहमार्ग बांधणीमध्ये भू-तंत्र वस्त्रे : सर्वसाधारण रस्त्यांप्रमाणेच लोहमार्गामध्येही भू-तंत्र वस्त्रांच्या अलगीकरण, मजबुतीकरण आणि वहन या गुणधर्माचा उपयोग करून लोहमार्ग अधिक टिकाऊ बनविण्यासाठी केला जातो. लोहमार्गाचे रूळ टाकताना रस्त्याप्रमाणेच सर्वप्रथम जमीन खणून त्यामध्ये मोठय़ा दगडांचा एक थर दाबून बसविला जातो. या थरावर मध्यम व लहान खडीचे असे दोन किंवा तीन थर दाबाने बसविले जातात आणि सर्वात शेवटी लाकडी किंवा सिमेंटच्या तुळया बसवून त्यावर रूळ बसविले जातात. यामधील वरच्या किंवा थराच्या खाली भू-तंत्र वस्त्राचा वापर केला जातो. यामुळे रुळावरून जाणाऱ्या आगगाडीच्या वजनाने खालील थर एकमेकांमध्ये मिसळणे व खालील पाणी वरती येऊन वरील थराची ताकद कमी करणे यासारख्या क्रियांना प्रतिबंध होतो. त्याचबरोबर रुळाखालील थरांचे मजबुतीकरण होते आणि लोहमार्गाचे आयुष्य वाढते.

नद्या, कालवे व समुद्रकिनाऱ्यावरील भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग : समुद्राच्या लाटा जेव्हा किनाऱ्यावर आपटतात तेव्हा किनाऱ्यावरील वाळू किंवा माती वाहून जाऊन किनारे खचण्याचा धोका असतो. याचप्रमाणे नद्यांना जेव्हा पूर येतो तेव्हा असाच धोका नद्या किंवा कालव्याच्या किनाऱ्यांना उद्भवतो. यासाठी वाळूची पोती किनाऱ्यावर रचणे यासारखे तात्पुरते उपाय किंवा सिमेंट काँक्रीटच्या बांधकामासारखे खर्चीक उपाय केले जातात. यावर भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग हा एक कमी खर्चाचा पण टिकाऊ व अधिक परिणामकारक उपाय आहे. यामध्ये समुद्राच्या किंवा नदीच्या किनाऱ्यावर उतार तयार करून त्यावर भू-तंत्र वस्त्राचा एक थर अंथरला जातो. यावर प्रथम मोठय़ा दगडांचा एक थर व त्यावर मध्यम व लहान आकाराच्या खडीचे थर पसरले जातात. यामुळे किनाऱ्याची धूप थांबते.
जसा रस्तेबांधणीमध्ये भू-तंत्र वस्त्रे वापरल्यामुळे फायदा होतो, तसाच फायदा लोहमार्ग बांधणीमध्ये आणि समुद्रकिनारे, नद्या, कालवे यांचे काठ या ठिकाणीही होतो. याबाबत भारतात जागरूकता कमीच आहे. कमी खर्चाचे पण टिकाऊ उपाय म्हणून भू-तंत्र वस्त्रे वापरणे किफायतशीरसुद्धा आहे.

 चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर

कार्तिक थिरुनलची कारकीर्द

मरतड वर्माच्या मृत्यूनंतर त्रावणकोर राज्याच्या राजेपदी आलेल्या काíतक थिरुनल राम वर्मा याची कारकीर्द इ.स. १७५८ ते १७९८ अशी झाली. या लोकप्रिय राजाला जनतेने ‘धर्मराजा’ असा खिताब दिला. धर्मराजाने १७९५ मध्ये त्रावणकोरची राजधानी पद्मनाभपूरमहून तिरुवनंथपूरम येथे नेली. मरतड वर्माने केलेला राज्यविस्तार धर्मराजाने व्यवस्थित टिकवलाच पण त्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्याने केलेला सामाजिक उत्कर्ष. म्हैसूरच्या टिपू सुलतानाने तामीळ प्रदेशातल्या मलबार परगाण्यावर हल्ला करून त्यावर कब्जा केला होता. त्यानंतर मलबारमधील शेकडो िहदू कुटुंबांनी त्रावणकोर राज्यात आश्रय घेतला होता. या कारणावरून टिपूने अचानक १७८९ च्या अखेरीस त्रावणकोरच्या उत्तरेस कोचिनकडून हल्ला केला. दोन्ही फौजांची गाठ त्रिचूरजवळ पडली. त्रावणकोरच्या डच अ‍ॅडमिरल लॅनॉयने उभी केलेली ६००० ची फौज विरुद्ध फ्रेंच प्रशिक्षित १४ हजार सनिकांची म्हैसूरची फौज असा तो सामना होता. सुरुवातीला जरी टिपूचे अनेक सेनानी आणि सनिक मारले गेले तरी अखेरीस टिपूचेच सन्य जिंकणार असा रंग दिसू लागल्यावर त्रावणकोर राज्याचे मित्र कंपनी सरकार यांनी म्हैसूरविरुद्ध युद्धाची घोषणा केली. कंपनीच्या मद्रास प्रेसिडेन्सीच्या फौजेने म्हैसूरकडे कूच केल्याची बातमी टिपूला कळताच निरुपायाने टिपूला त्रावणकोरची मोहीम सोडून परत फिरावे लागले. असा तऱ्हेने ब्रिटिशांच्या साहाय्याने त्रावणकोर राजाने म्हैसूरवर मात केली आणि त्याचे ब्रिटिशांशी संबंध अधिक दृढ झाले! पुढे इ.स. १७९५ मध्ये धर्मराजाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत संरक्षण करार ऊर्फ सामंजस्य करार करून राज्यात ब्रिटिशांची तनाती फौज राखणे सुरू केले. यापुढे त्रावणकोर राज्य १९४७ साली स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत एक संस्थान बनून राहिले. कर्नाटकी संगीताची चांगली जाण असलेला महाराजा धर्मराजा स्वत: उत्तम गायक आणि कथकली नृत्यनाटय़ाचा रचनाकार होता आणि व्हायोलिनवादकही होता. कथकली नृत्यासाठी त्याने रचलेल्या कृतींची संख्या दीडशेहून अधिक आहे.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com