अणुक्रमांक ५७ ते ७१ ही पंधरा लॅन्थॅनाइड्स! आवर्तसारणीच्या पायथ्याशी वसलेली आणि अणुक्रमांक ५७ असलेल्या या ‘लॅन्थॅनम’ मूलद्रव्याच्या पाठोपाठ येणारी! त्यांना रेअर अर्थ्स किंवा ‘दुर्मीळ मृदा’ मूलद्रव्य म्हणूनही ओळखतात. असं असलं तरी ही मूलद्रव्ये तशी काही फारशी दुर्मीळ नाहीत. अपवाद फक्त या कुटुंबात असलेल्या प्रोमेथिअम या मूलद्रव्याचा..  जे खरोखरच निसर्गात कमी आढळतं. आणि तसं म्हणावं तर ५८ अणुक्रमांक असलेल्या सिरिअमचा नैसर्गिक आढळ, जवळपास कॉपर म्हणजे ‘तांबं’ या मूलद्रव्याएवढा आहे. मग त्यांना रेअर अर्थ्स म्हणजे दुर्मीळ मृदा का म्हटलं जातं?

यामागचं पहिलं कारण म्हणजे पृथ्वीवरती कोणत्याही एका ठिकाणी अशी, ही मूलद्रव्यं खूप प्रमाणात आढळत नाहीत. तर पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर अनेक ठिकाणी ती थोडय़ा थोडय़ा प्रमाणात विखुरलेली आढळतात. दुसरं आणि अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे, या पंधराही मूलद्रव्यांचे अनेक रासायनिक तसेच भौतिक गुणधर्मदेखील खूप सारखे असल्यामुळे, ज्या कुठल्या खनिजामध्ये यातलं एक मूलद्रव्य आढळतं, त्याच्याबरोबर याच गटातली आणखी सात-आठ मूलद्रव्येही आढळतात. सर्व १५ मूलद्रव्ये, + ३ स्वरूपाचे धन आयन तयार करतात आणि संयुगे तयार करतात. म्हणूनच या सर्वाचे बरेचसे रासायनिक गुणधर्म सारखे असतात, ज्यायोगे, या साऱ्यांना एकमेकांपासून दूर करणं, वेगळं करणं खूप कठीण, वेळखाऊ आणि खर्चीकही असतं. म्हणूनच लॅन्थॅनाइड्सना ‘ अर्थ्स’ म्हटलं जातं.

लॅन्थॅनम (La), सिरिअम (Ce), प्रिसोडायमिअम (Pr), निओडायमिअम (Nd) प्रोमेथिअम (Pm), सॅमॅरिअम (Sm), युरोपिअम (Eu), गॅडोलिनिअम (Gd) टर्बअिम (Tb), डायस्प्रोसिअम (Dy), हॉल्मिअम (Ho), एर्बअिम (Er), थुलिअम (Tm) (य) टर्बअिम (¹F) आणि ल्युटेशिअम (Yb) अशी या रेअर अर्थ्सच्या कुटुंबातल्या सदस्यांची नावं आहेत. ही सर्व मूलद्रव्ये ‘ Ln ‘ अशा सर्वसाधारण संज्ञेने दर्शवली जातात.

प्रत्येक मूलद्रव्याला स्वत:चा असा इतिहास आहे, स्वत:चे असे काही भौतिक, रासायनिक गुणधर्म आहेत आणि त्यानुसार मानवाला त्यांचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा कमी-जास्त प्रमाणात उपयोगही आहे. येत्या काही भागांमध्ये आपण मूलद्रव्यांच्या या विशेष गटाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org