‘लाजून हासणे अन् हासून ते पाहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ असं जेव्हा कवी म्हणतो तेव्हा ती त्याची कल्पनाच असते. कारण बहाणा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ते लाजण्यात मुळी अभिप्रेतच नाही. खरं तर लाजणं हा उत्स्फूर्त भावनाविष्कार आहे.  उत्क्रांतिवादाचा जनक चार्लस डार्विन यानं आपल्या ‘द एक्स्प्रेशन ऑफ इमोशन्स इन मॅन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल्स’ या ग्रंथातलं एक अख्खं प्रकरण लाजेपायी खर्ची घातलं आहे. तो म्हणतो की ‘लाजणं ही एक विलक्षण आणि संपूर्ण मानवी भावना आहे’. लाजल्यावर गालावर गुलाब फुलतात. चेहऱ्यावर रक्तिमा पसरतो. त्याचं कारण म्हणजे चेहऱ्याच्या नितळ त्वचेखाली असलेल्या छोटय़ा छोटय़ा रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह मोठय़ा प्रमाणात आणि वेगानं दौडू लागतो. मस्तानीच्या गळ्यातून उतरणारी पानाची पिंकही दिसत असे असं म्हणतात. चेहऱ्याची त्वचाही तशीच नितळ असल्यामुळं तिच्या खालून वेगानं वाहणारा रक्तप्रवाह सहजगत्या दिसून येतो. चेहऱ्यावरच्या रक्तिम्याच्या स्वरूपात तो प्रकट होतो.

त्या लालीची मात्रा मोजता आली तर खरोखरच ती व्यक्ती लाजली आहे की कवी म्हणतो त्याप्रमाणे बहाणा करते आहे, हे ओळखता येईल. पण चेहरा कमी लाल झाला आहे की अधिक हे नेमकं आणि वस्तुनिष्ठरीत्या ठरवायचं कसं?

ती अडचण सोडवली ‘लेझर डॉपलर फ्लोमेट्री’ या तंत्रानं. कोणत्याही प्रकाशलहरीची निर्विवाद ओळख तिच्या तरंगलांबीवरून पटते. तो प्रकाश देणारा स्रोत जर स्थिर असेल तर त्या तरंगलांबीत काहीही फरक पडत नाही. पण जर तो स्रोत वाहता असेल तर त्याच्या वेगानुसार त्या लहरीच्या तरंगलांबीत बदल होतो. तो किती झाला आहे हे मोजून त्या स्रोताचा वेग शोधता येतो.  क्रिकेटच्या किंवा टेनिसच्या सामन्यात चेंडूचा वेग मोजण्यासाठी याच तंत्राचा वापर करतात. तर चेहऱ्यावर लेझरच्या किरणांचा झोत सोडून त्यांच्या तरंगलांबीत काही फरक पडतो आहे की काय याचा वेध या तंत्रानं घेता येतो. त्यावरून त्या बदलाला कारणीभूत ठरणाऱ्या रक्तप्रवाहाचा वेग मोजता येतो. तो वाढतो आहे की नाही हे पाहून मग लाजण्याची मात्राही मोजता येते. चेहरा लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या तंत्राने लाजण्याची चोरी पकडली जाईलच?

– डॉ. बाळ फोंडके,  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत – डॉ. सत्यव्रत शास्त्री- साहित्य

सत्यव्रत शास्त्री हे प्रतिभासंपन्न कवी, विद्वान पंडित, सफल शिक्षक, प्रशासक, अनुवादक, समीक्षक, व्याकरणाचार्य तर आहेतच, पण शिवाय संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून, ते प्रभावशाली वक्ता आहेत. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी ‘षड्ऋतुवर्णनम्’ ही पहिली संस्कृत कविता लिहिली. नंतर १९५७ मध्ये त्यांचा दक्षिण-पूर्व आशियातील कला, संस्कृती, साहित्य, वास्तुशिल्पावर प्रकाश टाकणारा, विभिन्न छंदात लिहिलेला ‘बृहत्तरं भारतम्’ (१९६०) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. वयाच्या ३०व्या वर्षी ‘श्रीबोधिसत्त्व चरितम्’ ही काव्यरचना-महाकाव्य लिहिले. ‘इंदिरा गांधी चरितम्’ (१९७६), ‘थाई देश विलासम्’ (१९७९), ‘श्रीगोविंदसिंहचरितम्’ (१९६७), ‘पत्रकाव्यम्’ (१९९४) इ. ग्रंथसंपदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

‘श्रीबोधिसत्त्व चरित्तम्’ या महाकाव्यात त्यांनी भगवान बुद्धाचा उपदेश अगदी सहज, सरल संस्कृत भाषेत लिहिला आहे. शीख संप्रदायाचे दहावे गुरू श्री. गोविंदसिंहांचे- ‘श्री गुरुगोविन्दसिंह चरितम्’ हे विविध छंदांत पद्यमय लिहिलेले जीवनचरित्र आहे. शिखांचा इतिहासच कथानक रूपात जणू काही काव्यात लिहिला आहे. इंदिरा गांधींच्या आयुष्यावर लिहिलेले पहिले महाकाव्य आहे- ‘इंदिरा गांधी चरितम्’. २५ सर्गातील विविध छंदांत लिहिलेल्या या काव्यात अलाहाबादमधील आनंद भवनातील त्यांच्या जन्मापासून ते १९७५ मधील आणीबाणीच्या परिस्थितीचे वर्णन या महाकाव्यात असून, यात स्वातंत्र्य चळवळीचे, त्यातील व्यक्ती, घटनाचक्र इ.चे पण वर्णन आहे. शास्त्रीजींचे वेगळेपण म्हणजे संस्कृतमध्ये त्यांनी साधारण साडेतीन हजार कडव्यांतील ‘पत्रकाव्यम्’ दोन भागांत लिहिले आहे.

‘श्रीरामकीर्ति महाकाव्यम’ हेही २५ सर्गातील एक महत्त्वाचे संस्कृत महाकाव्य आहे. यात थाई देशातील प्रचलित रामकथा- ‘रामकिशन’चे कथानक आहे. थाई रामायणातील राम अनेक प्रसंगांत सामान्य माणसासारखा एक दुर्बल व्यक्तिरूपात असून सीता पतिव्रता असली तरी ती एका मानिनी रूपात यात चित्रित केली आहे. या महाकाव्याच्या रूपाने, दक्षिण-पूर्व आशियाई रामायण संस्कृतमध्ये प्रथमच शास्त्रीजींनी आणले आहे.या महाकाव्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या असून, कन्नड, हिंदी, आसामी, तमिळ इ. भारतीय भाषांत, तसेच इंग्रजी आणि थाईमध्येही याचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. देशविदेशातील ११ पुरस्कार  मिळाले आहेत.