शिशाचा शोध कधी लागला हे नक्की सांगणे कठीण आहे. हल्लीच्या तुर्कस्तानच्या भागात इ.स.पूर्व ७००० ते इ.स.पूर्व ६५०० या काळातले शिशाचे गोळे सापडले आहेत. याच प्रदेशात इ.स.पूर्व ५००० ते इ.स.पूर्व ४००० वर्षे या काळातले, शिशाच्या खाणींचे अवशेषही आढळले आहेत. आशियाप्रमाणेच दक्षिण अमेरिकेतही पेरू आणि ग्वाटेमालामध्ये, युरोपीय लोक पोहोचायच्या आधीपासून वापरात असलेल्या शिशाच्या खाणी आणि शिशाचे गोळे सापडले आहेत. तुर्कस्तानमध्ये सापडलेल्या शिशाच्या गोळ्यांचे रासायनिक विश्लेषण केल्यावर, हे शिसे गॅलेना (शिशाचे सल्फाइड) या शिशाच्या खनिजापासून मिळवले असल्याचे लक्षात आले.

गॅलेनापासून शिसे धातूरूपात मिळवणे सोपे आहे. प्रथम या खनिजाला उष्णता देऊन त्याचे रूपांतर ऑक्साइडमध्ये केले जाते व त्यानंतर कार्बनच्या साहाय्याने या ऑक्साइडचे रूपांतर धातूरूपी शिशात केले जाते. शिसे अत्यंत मृदू असून ते वितळतेही फक्त ३२७ अंश सेल्सियस तापमानाला. हवेच्या संपर्कात ते गंजतही नाही. शिशाच्या मृदूपणामुळे सुरुवातीला छोटे दागिने बनवण्याशिवाय त्याचे इतर उपयोग नव्हते. प्राचीन इजिप्तमध्ये सर्वप्रथम शिशाचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला गेल्याचे पुरावे आढळतात. (सिंधू संस्कृतीमध्येही शिशाचा वापर छोटे दागिने बनवण्याकरिता होत असे.) इजिप्तमधून ही प्रथा ग्रीसमध्ये पोचली. त्यानंतर भूमध्य सागराच्या आजूबाजूच्या प्रदेशात दागिन्यांबरोबरच, नाणी, बांधकाम, जहाजाचे नांगर, अशा अनेक गोष्टींसाठी शिसे वापरले गेले. त्यानंतर ग्रीक संस्कृतीत शिशाचा वापर वाढत गेला आणि रोमन काळात त्यावर कळस चढला. इसवी सनाच्या सुरुवातीस रोमन साम्राज्यात दरवर्षी ८० हजार टन इतकी शिशाची निर्मिती होत असल्याचे गणित संशोधकांनी मांडले आहे.

nazi battle of normandy the great battle for normandy german defeat in normandy
भूगोलाचा इतिहास : ‘त्या’ भाकिताने बदलला जगाचा इतिहास
Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
mohan bhagwat remark on ram mandir
‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?

रोमन लोकांनी शिशाचे पाइप बनवून त्यापासून जलवाहिन्या निर्माण केल्या. लांब अंतरावरून रोम शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याकरिता त्यांनी शिशाच्या जलवाहिन्यांचे जाळे विणले. याशिवाय रोममध्ये अन्न शिजवण्याकरिता शिशाची भांडी वापरली जात, तसेच मद्याची चव सुधारण्यासाठीही त्यात शिशाचे अ‍ॅसिटेट मिसळले जाई. मानवी आरोग्याला शिसे हा धातू घातक आहे. त्याच्या अतिवापराने किंवा ते शरीरात मोठय़ा प्रमाणात गेल्यास मृत्यूही ओढवतो. रोमन लोकांना शिशाचे घातक परिणाम माहीत नव्हते. काही इतिहासकारांच्या मते रोमन साम्राज्याच्या ऱ्हासाचे इतर राजकीय आणि आर्थिक कारणांबरोबरच शिशाचा अतिवापर हेही एक कारण होते!

– योगेश सोमण

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org