ताऱ्यांचा अभ्यास करताना त्यांची तेजस्विता ठरविणे म्हणजे तिचे मापन करणे आवश्यक असते. परंतु विश्वात अतिफिक्या ताऱ्यांपासून ते अतितेजस्वी ताऱ्यांपर्यंत असे वेगवेगळ्या तेजस्वितेचे अब्जावधी तारे अस्तित्वात आहेत. त्यामुळे हे मापन अवघड बनलेले आहे.

यावरही शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला असून यासाठी त्यांनी लॉगॅरिदमिक श्रेणीचा वापर केला आहे. या श्रेणीत तेजस्विता ‘भासमान तारकीय प्रत’ या शब्दांत व्यक्त केली जाते. या श्रेणीचे वैशिष्टय़ म्हणजे ती सापेक्ष पद्धतीची आहे. म्हणजे अभिजित (Vega) नावाच्या ताऱ्याची प्रत शून्य आहे, असे मानून इतर ताऱ्यांची प्रत ठरविली जाते. (प्रत शून्य आहे याचा अर्थ अभिजितची तेजस्विता शून्य आहे असे नाही, ही गोष्ट अगदी उघडच आहे.) जे तारे अभिजितपेक्षा फिके आहेत त्यांची प्रत धन (positive) चिन्हाने दाखविली जाते, तर जे तारे अभिजितपेक्षा अधिक तेजस्वी आहेत त्यांची प्रत ऋण (negative) चिन्हाने दाखविली जाते. तारकीय प्रत श्रेणीनुसार दोन ताऱ्यांपकी जो तारा अधिक तेजस्वी दिसत असेल त्याची प्रत कमी असते.

तारकीय प्रत ही सापेक्ष श्रेणी असल्याने तिला कोणतेही एकक नसते.

सूर्याची तारकीय प्रत (-२६.७२ ) इतकी आहे. आकाशात नेहमी उत्तरेलाच दिसणाऱ्या ध्रुवाची तारकीय प्रत आहे(+१.९७).

उत्तर गोलार्धातून दिसणाऱ्या सर्वात तेजस्वी ताऱ्याची म्हणजे व्याधाची प्रत आहे (-१.४६).

निरोगी डोळे असलेली व्यक्ती साधारणपणे (+६) एवढय़ा प्रतीपर्यंतचे तारे कोणत्याही साधनाशिवाय पाहू शकते. काही प्रसिद्ध ताऱ्यांच्या प्रती अशा आहेत  :  स्वाती (-०.०४ ), रोहिणी (+०.८५), चित्रा (+०.९८) इ. याचा अर्थ असा की, स्वातीचा तारा रोहिणीपेक्षा अधिक तेजस्वी आहे; तर रोहिणी चित्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे.

तारकीय प्रतीची ही संकल्पना आकाशातील इतर वस्तूंच्या तेजस्वितेसाठी ही वापरली जाते. उदा. पौर्णिमेच्या चंद्राची (सरासरी) प्रत (-१२.७४) इतकी आहे. या पद्धतीने आकडेमोड केली तर सूर्य चंद्रापेक्षा सुमारे ४ लक्ष पट तेजस्वी आहे, असे उत्तर मिळते. चंद्राप्रमाणे ग्रहांचीही प्रत ठरविता येते.

– डॉ. गिरीश पिंपळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

‘विविधतेचा व संमिश्रतेचा काव्याने वेध घेतला पाहिजे’

२००३चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात विंदांनी आपली साहित्यविषयक भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात-

‘‘काव्याने जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मी मानतो. मानवी अवस्थेत अंतर्भूत असलेल्या विविधतेचा व संमिश्रतेचा काव्याने वेध घेतला पाहिजे. ज्या कवीला जीवनातील विविधतेचा व व्यामिश्रतेचा वेध घ्यायचा असेल त्याला काव्याविषयीचा खुला दृष्टिकोन स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. काव्याविषयीचा खुला दृष्टिकोन हा निरनिराळय़ा भावना, घाट व शैली यांनी शक्यता गृहीत धरतो. परिणामत: तो अनुभवातील व तंत्रातील विविधतेचा स्वीकार करतो. मी हा काव्याविषयी खुला दृष्टिकोन स्वीकारतो. त्यामुळे माझ्या काव्यात परस्परविरोधी भावना, विचार व सौंदर्यात्मक दृष्टिकोन प्रगत होताना आढळतात. पण हा काव्यविषयक दृष्टिकोन हा माझ्या विशिष्ट निर्मितीशी संलग्न असल्यामुळे कदाचित तो इतर कवींना गैरसोयीचा वाटण्याचीही शक्यता आहे.

मी साहित्य ही एक ‘जीवनवेधी’ कला आहे, असे मानतो. जीवनवेधी म्हणजे ‘जीवनाविषयी असलेली.’ साहित्याने जीवनाशी समकक्ष होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी जीवनाविषयीच्या, कलेविषयीच्या व साहित्याविषयीच्या खुल्या दृष्टिकोनाचा पुरस्कार करतो, पण माझ्यावर इतरांचा प्रभाव पडला नाही असे नव्हे.

माझा विश्वास विज्ञानावर आहे. धर्मावर नाही. मी ज्ञानाला फक्त एक शक्ती मानत नाही, तर मानवाचा खराखुरा मुक्तिदाता मानतो. म्हणून फ्रॉईड किंवा मार्क्‍स, लिंकन किंवा गांधी हेही डार्विन किंवा आइनस्टाइन यांच्याइतकेच माणसाचे मुक्तिदाते ठरतात.

मला दिसणारा नवा मानव हा संपूर्ण जगाचाच नागरिक असेल. तो रंग, वंश, धर्म, लिंग किंवा राष्ट्रीयता हे भेद मानणारा नसेल. तो मानवजातीचे ऐक्य व बंधुत्व यांचा पुरस्कार करील. तो सुसंस्कृत जीवनात आर्थिक पिळवणूक, राजकीय दडपशाही, अतिरिक्त लोकसंख्या आणि युद्धे यांना स्थान नाही असे मानील. तो स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या गोष्टींना मूलभूत मूल्ये मानील. तो स्वत: शिस्तबद्ध व सहिष्णू असेल. एखाद्या धार्मिक माणसाला परलोकाबद्दल जितके प्रेम व आदर वाटतो, तितकेच प्रेम व आदर त्याला इहलोकातील जीवनाविषयी वाटेल आणि अधूनमधून धक्के मिळत असले तरी तो निर्ढावलेला आशावादी असेल.’’

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com