12 December 2019

News Flash

नृत्यांगना लीला सॅमसन

मराठी संस्कृतीशी समरस झालेल्या या लोकांनी आपआपल्या क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध केली.

दोन हजार वर्षांपूर्वी धार्मिक जाचाला त्रासलेली काही ज्यू कुटुंबे समुद्रमाग्रे पूर्वेकडे कुठे तरी स्थलांतर करण्यासाठी निघाले. त्यापकी सात कुटुंबे महाराष्ट्रात अलिबागच्या किनाऱ्यावर उतरली आणि त्या परिसरात स्थायिक झाली. त्यांची संख्या वाढल्यावर ते मुंबई, पुणे, ठाणे वगरे ठिकाणी स्थायिक झाले. या ज्यूंना स्थानिक यहुदी किंवा बेने इस्रायल म्हणतात. मराठी संस्कृतीशी समरस झालेल्या या लोकांनी आपआपल्या क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध केली.

सध्याच्या प्रसिद्ध भरतनाटय़म नृत्यांगना लीला सॅमसन यासुद्धा बेने इस्रायलीच आहेत. १९५१ साली जन्मलेल्या लीला पुण्याचे व्हाइस अ‍ॅडमिरल बेंजामिन सॅमसन आणि लला सॅमसन या दाम्पत्याच्या कन्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्र’या संस्थेत  नृत्य शिक्षण घेणे सुरू केले. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून बी.ए. झाल्यावर त्यांनी भरतनाटय़म हेच आपले कार्यक्षेत्र ठरवून दिल्लीच्या गांधर्व महाविद्यालय व श्रीराम भारतीय कलाकेंद्रात अध्यापनाचे काम केले. १९९५ साली त्यांनी स्वत:चा ‘स्पंद’ हा नृत्यवृंद स्थापन करून पुढे भारत, युरोप, अमेरिका व आफ्रिकेत अनेक वेळा नृत्याचे कार्यक्रम सादर केले. लंडन येथील रॉयल ऑपेरा हाऊसमध्येही भरतनाटय़मचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. २०१५ साली प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘ओके कनमणी’ या चित्रपटात नृत्य संरचना आणि नृत्य दिग्दर्शनाचे काम केले.  सॅमसन या निष्णात भरतनाटय़म नर्तिका, नृत्यनाटिका संरचनाकार, नृत्यशिक्षिका व लेखिका म्हणून जागतिक स्तरावर ओळखल्या जातात.

लीला सॅमसन यांनी लिहिलेल्या पुस्तकांपकी ‘ऱ्हिदम इन जॉय’, ‘रुक्मिणीदेवी- ए लाइफ’, ‘द जॉय ऑफ क्लासिकल डान्स’ विख्यात आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारात पद्मश्री (१९९०), संस्कृत चुडामणी, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००) हे महत्त्वाचे होत. त्यांनी २०१० मध्ये संगीत नाटक अकादमीचे अध्यक्षपद तसेच २०११ साली भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. परंतु या दोन्ही पदांवर असताना अनुपम खेर आणि इतर कलाकारांनी आक्षेप घेतल्यामुळे लीला सॅमसननी या पदांचा राजीनामा दिला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on March 30, 2018 3:18 am

Web Title: leela samson
Just Now!
X