वरझडी हे औरंगाबाद तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटसं गाव. या गावात माणिकराव पठारे यांची दोन एकर जमीन आहे. टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या पिकवणं हा त्यांचा व्यवसाय. शेतात दोन विहिरी. दोन्ही विहिरींतील पाणी भाजीच्या मळ्याला पुरवणं हा नेहमीचा कार्यक्रम. रुसलेल्या वरुण राजामुळे या कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला. २०१२ साली पाऊस आला कधी आणि गेला कधी कळलंच नाही. नद्या, ओढे, विहिरी, शेतं कुठेच पाणी साठलं नाही. पाण्याशिवाय भाज्या पिकवणं कठीण झालं. माणिकरावांनी टोमॅटो, वांगी ही कमी पाणी लागणारी दोनच पिकं घेण्याचं ठरवलं. काही दिवसांनी टोमॅटोलासुद्धा शेतातून बाहेर काढावं लागलं. वांगी ही एकमेव भाजी पिकवण्याची तयारी त्यांनी केली. अशक्तपणा आल्यावर किंवा आजारपणात सलाइन लावण्यात येतं, सलाइन लावल्यामुळे तब्येतीत सुधारणा होते. माणिकरावांनी अशक्त झालेल्या पिकाला सलाइनच्या बाटलीतून पाणी देण्याचं ठरवलं.
माणिकरावांनी गावापासून १५ किलोमीटर लांब असलेल्या करमाड येथे राहणाऱ्या डॉक्टरांकडून सलाइनच्या बाटल्या विकत आणल्या. बाटलीचा खालचा अर्धा भाग कापला, बाटली अडकवण्यासाठी वांग्याच्या रोपाजवळ एक काठी रोवली. बाटलीची नळी जमिनीत साधारण पाच ते सहा इंचपर्यंत आत सोडली. अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीतून नळीद्वारे हळूहळू पाणी वांग्याच्या रोपापर्यंत पोहोचेल अशी सोय केली. दर दोन दिवसांनी अर्धा लिटर पाणी वांग्याच्या रोपाला मिळू लागलं. अशक्त झालेल्या वांग्याच्या रोपांची तब्येत एकदम सुधारली. वांग्याचं उत्पादन दुपटीहून अधिक वाढलं.  माणिकराव स्वत:च्या प्रयोगावर खूश झाले. ३० हजार रुपये निव्वळ नफा झाला. एका छोटय़ाशा प्रयोगातून मोठं यश मिळालं.
अशाच प्रकारे स्वत:च्या व्यवसायावर निष्ठा व प्रेम कष्ट करण्याची तयारी असेल, स्वतच्या शेतीचे प्रश्न ओळखून उपाय शोधण्याची जिद्द असेल, तर आधुनिक महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.
– सुचेता भिडे (कर्जत)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. – हिंदी भाषा आणि सिनेमा
वर्तमानकाळी हिमाचल प्रदेश, पूर्व पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहार या प्रदेशांतील रहिवासी लोकांची जी मातृभाषा तिला हिंदी म्हणतात. त्यात खडी बोली, हिंदोस्थानी, वांगरू, व्रजबुंदेली, अवधी, वधेली, गढवाली, छत्तीसगढी, मगही, भोजपुरी, कानोजी, मैथिली, मारवाडी, मेवती, मालवी या भाषांचा समावेश होतो. या सर्व बोलीभाषा हिंदीच्या शाखा मानल्या जातात.
..ही नोंद आहे पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतीकोशातली. त्यात असेही म्हटले आहे की आधुनिक हिंदी ही एकोणिसाव्या शतकात प्रसूत झाली. मनात असा विचार आला की या पाश्र्वभूमीवर ही भाषा राष्ट्रभाषा म्हणून कशी काय सिंहासनावर बसली? ही भाषा आपण ऐकतो तेव्हा ती उर्दूप्रचुर तरी असते किंवा संस्कृतप्रचुर असते. केवळ बहुप्रसव प्रदेशांमधल्या संख्याबळावर ही कृत्रिम भाषा सगळ्या देशावर लादली गेली की काय? घटना समितीत या विषयावर सखोल(!) आणि हिरिरीची चर्चा झाल्याचे ऐकले आहे. खरे तर हिच्यापेक्षा उर्दू सरस असे काही जण म्हणतात ते काही खोटे नाही.
म्या मराठी माणसाला हिंदी ही दिल्लीकरांची भाषा म्हणूनच खुणावते. मराठी मुलखाने दिल्लीकरांना परके मानले त्याला काळ लोटला पण ती गाठ माझ्या मनात तरी पक्की आहे. एकेकाळी स्वातंत्र्यानंतर हिंदी हिंदी असा हाकारा झाला तेव्हा माझ्या आईने कोविदची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे आठवते, पण माझ्या मनात मात्र या भाषेने कधीही जम धरला नाही. त्यातच बहुप्रसव आणि मागास उत्तरेकडील प्रांतातून हल्ली जे लोंढे भारताला विळखा घालून आहेत तेही हीच किंवा यातली उपभाषा बोलतात त्यामुळे मन आणखीनच बिनसले आहे. हॉलीवूडने युरोपला ज्याप्रमाणे घेरले आणि सिनेमा या कलाकृतीचा विपर्यास युरोपियनांच्या माथी मारला, त्याचप्रमाणे हिंदी बॉलीवूडने भारताला एक कृत्रिम दर्जाहीन संस्कृती अर्पण केली आणि आपण त्यात अडकलो आहोत. हॉलीवूडच्या कलाकृतीकडे जर तुम्ही सूक्ष्मपणे बघितलेत तर त्यातले चांगले आशय दाखवणारे जे चित्रपट आहेत त्यातले अनेक इंग्रजी नट-नटय़ा आणि दिग्दर्शकांनी केलेले आहेत. तसेच इथेही प्रादेशिक अस्मिता जपत ज्यांनी अभिजात कलाकृती त्या त्या भाषेत चित्रपटाच्या माध्यमातून सादर केल्या त्यातले काही या हिंदी सिनेमाला बळी पडले. या बॉलीवूडचे जे पारितोषिक वितरणाचे वार्षिक कार्यक्रम असतात त्यातल्या रुचिहीनतेने तर पाताळ गाठले आहे. पुढच्या रांगेत तारिका त्या विनोदांना दातांवर हात ठेवून खोटय़ा हसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. शेवटी त्या या व्यवस्थेच्या गुलाम असतात. दुर्दैवाने हल्ली मराठी समारंभातही अशीच दृश्ये दाखवण्याचा प्रघात सुरू झाला आहे. असो, हा विषय उद्या चालू.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – सांसर्गिक रोग : आयुर्वेदीय उपचार- भाग – ३
६) खरुज-   एका कुटुंब सदस्याला काही कारणाने खरुज कोरडी किंवा ओली झाली की, घरातील इतरांना ग्रासू शकते. या खरजेतील सूक्ष्म जंतू फार झपाटय़ाने पसरतात. हा प्रचार प्रसार थांबवण्याकरिता कोरडय़ा खरजेकरिता संगजिरेपूड वारंवार लावावी. साबण, मीठ, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. खरजेमध्ये खूप लस असल्यास त्रिफळाचूर्ण उकळून संबंधित अवयव त्या पाण्याने स्वच्छ धुवावा; कापसाने तो भाग धुवावा. आग होत असल्यास शतघौतघृत लावावे. रक्त वाहत असल्यास प्रवाळ, कामदुधा, खरूज दीर्घकाळची असल्यास महातिक्तघृत दोनदा घ्यावे. कपडे, अंथरुण, पांघरुण स्वच्छ धुण्याची काळजी घ्यावीच.
७) गोवर- कांजिण्या- शाळेत एका मुला-मुलीला गोवर- कांजिण्याची लागण झाली की वर्गातील शिक्षक त्या मुला-मुलीला ‘दोन दिवस’ घरी राहा असा रास्त, चोख सल्ला देत असतात. घरच्या इतर मंडळींनीही गोवर- कांजिण्याग्रस्त मुला-मुलींशी; कमीच संपर्क ठेवावयास हवा. हे सर्वानाच माहिती आहे. गोवर-कांजिण्यांचा बहर सहसा ४८ तास असतो. एकांतात पूर्ण विश्रांती, कटाक्षाने आंबट खारट, तिखट टाळणे. यामुळे रोग दोन दिवसात संपतो. असे असूनही त्रस्त मुलाबाळांचे आईवडील कोणाकोणाच्या सल्ल्याने परिपाठादिकाढा, प्रवाळयुक्त गुलकंद घेत असतात. परिपाठादी काढय़ाऐवजी ताज्या गुलाब फुलांचा रस, काळ्या मनुका किमान ३०/४० सत्वर गुण देतात. गोवर कांजिण्यांनंतर अशक्तपणा येऊ नये म्हणून प्रवाळ, कामदुधा, मौक्तिकभस्म यांचा वापर करावा.
८) गंडमाळा- दिवसेंदिवस मुंबईत गंडमाळा ग्रस्तांची वाढती संख्या हा एक चिंताजनक विषय होत आहे. स्त्रिया व बालके या रोगाला लवकर बळी पडतात. अस्वच्छ राहणी खाण्या-पिण्याची आबाळ यामुळे हा विकार चटकन पसरतो. टी बी ग्लँड असे नाव असणाऱ्या या रोगाकरिता आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादी, लाक्षादी, त्रिफळागुग्गुळ, कांचनार, लघुसूतशेखर सुधाजलाबरोबर घ्याव्यात. अमरकंद वनस्पतीचा काढा हा रोग मुळापासून नाहीसा करतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – २७ डिसेंबर  
१८७६ > इतिहास संशोधक भास्कर वामन भट यांचा जन्म. महाराष्ट्र धर्म अर्थात मराठय़ांच्या इतिहासाचे आत्मिक स्वरूप, शिवाजीची राजनीती ही पुस्तके त्यांची.
१९२३ > श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत म्हणजेच ‘श्रीपु’ यांचा जन्म.  प्रकाशक, समीक्षक, संपादक, लेखक आणि प्राध्यापक असा लौकिक असलेल्या श्रीपुंचा मौज, सत्यकथा या नियतकालिकांच्या संपादनात वाटा होता. विशेषत सत्यकथा मासिकातून नववाङ्मयाला प्राधान्य देण्यात सिंहाचा वाटा होता; तर श्रीपुंच्या वाङ्मयदृष्टीमुळे ‘मौज’ प्रकाशन आधुनिक महाराष्ट्राची वाङ्मयीन अभिरुची घडवण्यात अग्रेसर ठरले. सुरुवातीला सत्यकथा मासिकातून पुस्तक परीक्षणे, कथा, व्यक्तिचित्रे तसेच तात्कालिक वाङ्मयीन घडामोडींवर त्यांनी लेखन केले. पुढे गंगाधर गाडगीळ, कुसुमावती देशपांडे, वा. ल. कुलकर्णी, मर्ढेकर, माधव आचवल यांच्यावर लेख लिहिले. साहित्याची भूमी  हे त्यांचे पुस्तक. २००७ साली ते निवर्तले.
१९२४ > शिवपुत्र संभाजी  या ग्रंथाच्या कर्त्यां कमल श्रीकृष्ण गोखले यांचा जन्म.
१९२४ > सुमती देवस्थळे यांचा जन्म. टॉलस्टॉय : एक माणूस या ग्रंथासह मॅक्झिम गॉर्की, डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर आदींवर त्यांनी चरित्रपुस्तके  लिहिली.  
– संजय वझरेकर