समुद्रातले प्रवाळ! नळीसारखा अगदी लहान प्राणी. संरक्षणासाठी स्वत:भोवती चुनखडीचं म्हणजे कॅल्शियम काबरेनेटचे कवचरूपी घर तयार करणारा. हे प्राणी म्हटले तर एकएकटे; म्हटले तर समूहाने राहणारे. हा प्राणी एखाद्या आधाराला चिकटून वाढू लागतो, त्याच्यावरच दुसरा जीव निर्माण करतो. अशा रीतीने त्यांची वसाहत तयार होते. प्रवाळ आपले चुनखडीचे घर तयार करण्यासाठी समुद्राच्या पाण्यातले कॅल्शियम आणि कार्बन डायऑक्साइड हे घटक वापरतो. वसाहत वाढत जाते, प्रवाळांचा खडक तयार होतो. लाखो वर्षांत लक्षावधी प्रवाळांनी बांधलेली त्यांची घरे बेटांप्रमाणे वाटतात. प्रवाळाची बेटे पाण्याच्या पृष्ठभागापासून फार खोल नसतात; कारण त्यांना ऊर्जा पुरवणारा त्यांनी त्यांच्या ऊतीत ठेवलेला सहजीवी फायटोप्लांक्टन म्हणजे वनस्पतीप्लावक  सूर्यप्रकाशातच अन्न तयार करू शकतो. वनस्पतीप्लावकाने तयार केलेले अन्न प्रवाळ घेतात, वाढतात आणि आपली संख्याही वाढवतात.

प्रत्येक प्रवाळप्राणी आपल्या ऊतीत विशिष्ट वनस्पतीप्लावकास जागा देतो. वनस्पतीप्लावकाला तेथे संरक्षण मिळते आणि त्याचा मोबदला म्हणून प्रवाळाला अन्न. वनस्पतीप्लावकामुळेच प्रवाळाला रंग येतो.  काही वेळा वनस्पतीप्लावक प्रवाळाशी फारकतही घेतो, पण तितका काळ उपासमार सहन करून पुन्हा नवीन वनस्पतीप्लावक मिळाले की प्रवाळ काम सुरू करतो. पण वनस्पतीप्लावक मिळाले नाही, तर प्रवाळ मरून जातो.. अन् उरते ते त्याने चुनखडीचे बांधलेले निस्तेज, रंगहीन घर. सध्या रंगीबेरंगी प्रवाळ रंगहीन होण्याचे प्रमाण वाढत आहे, ते कशामुळे?

समुद्राच्या पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने जरी वाढले आणि ही स्थिती सलग चार आठवडे राहिली, तर वनस्पतीप्लावक तग धरू शकत नाहीत. मग वनस्पतीप्लावकाशिवाय प्रवाळाला दिवस काढावे लागतात.

कार्बन डायऑक्साइड वातावरणात जास्त प्रमाणात वाढला, तर पाण्याचेही तापमान वाढते. कार्बन डायऑक्साइड पाण्यात मिसळला की काबरेनिक आम्ल तयार होते. आम्लात चुनखडी विरघळते. अर्थातच असे आम्लधर्मी पाणी प्रवाळांसाठी, इतर सागरी जलचरांसाठी कर्दनकाळ ठरते. समुद्राचे पाणी हळूहळू आम्लधर्मी होत आहे. त्याची तीव्रता एकदम जाणवणारी नसली, तरी त्याचे परिणाम मात्र आता दिसू लागले आहेत. याशिवाय बेसुमार प्रदूषण हेही त्यास कारणीभूत आहेच.

सागरी जीवसृष्टीतील अन्नसाखळी ज्यावर अवलंबून आहे, ते वनस्पतीप्लावक वाढत्या तापमानामुळे कमी होताहेत. जी प्रवाळ बेटे तयार व्हायला लाखो वर्षे लागली, त्यांचे अस्तित्व आता काही वर्षांचे आहे. प्रवाळांच्या बेटावर अवलंबून राहणारे इतर अनेक जलचर प्राणी नामशेष होऊ लागलेत. याचे परिणाम मानवावर होणारच आहेत.

– चारुशीला सतीश जुईकर  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org