प्रसिद्धी एखाद्या चकव्यासारखी असते. भगीरथ प्रयत्न करूनही ती एखाद्याला कायम हुलकावण्या देते, तर काहीही संबंध नसलेल्या आणि अजिबात प्रयत्न न करणाऱ्या एखाद्याच्या झोळीत ती भरभरून देते. एकोणिसाव्या शतकात कॅलिफोíनयात राहणाऱ्या रॉबर्ट लिवरमोअर या मूळच्या इंग्रज शेतकऱ्याच्या स्वप्नातही आलं नसेल, की भविष्यात ११६ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याचे नाव त्याच्या आडनावावरून ठेवण्यात येणार आहे.

रसायनशास्त्राशी आणि विज्ञानाशी दूरान्वयानेही संबंध नसणाऱ्या रॉबर्ट लिवरमोअरची कॅलिफोíनयातील सध्याच्या लिवरमोअर शहराजवळ मोठी शेती होती. १८५०च्या सुमारास कॅलिफोíनयात सोन्यासाठी लोकांचा प्रचंड ओघ सुरू झाला. सॅन फ्रान्सिस्कोहून उत्तरेला सोन्याच्या शोधासाठी जाणाऱ्या लोकांच्या वाटेवर लिवरमोअरची जमीन होती. येणाऱ्या-जाणाऱ्याला मदत करण्याच्या स्वभावामुळे लोक या भागाला लिवरमोअरचे गाव म्हणू लागले आणि पुढे मोठय़ा झालेल्या शहरालाही लिवरमोअर हेच नाव मिळाले.

इ.स. २००० पूर्वी अणुक्रमांक ११६ तयार करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते यशस्वी झाले नाहीत. १९९९ मध्ये तर कॅलिफोíनयाच्या लॉरेन्स बर्कले नॅशनल प्रयोगशाळेने अणुक्रमांक ११६ तयार केल्याचा दावाही केला. दुसऱ्या प्रयोगशाळेत हाच प्रयोग केल्यावर मिळालेले निष्कर्ष लॉरेन्स बर्कले नॅशनल प्रयोगशाळेच्या निष्कर्षांशी जुळत नव्हते. पुन्हा एकदा लॉरेन्स बर्कले प्रयोगशाळेत तोच प्रयोग करण्यात आला आणि त्यांचेही निष्कर्ष वेगळे आले आणि अणुक्रमांक ११६ तयार केल्याचा दावा मागे घेतला गेला. इ.स. २००० मध्ये कॅलिफोíनयातील लॉरेन्स लिवरमोअर प्रयोगशाळा आणि रशियाच्या जे.आय.एन.आर. प्रयोगशाळा यांच्या संयुक्त प्रयत्नाने केलेल्या प्रयोगात ११६ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याचे अस्तित्व नोंदले गेले. २९० ते २९३ अणुभाराची चार समस्थानिके असलेले हे मूलद्रव्य अत्यंत अस्थिर आहे. याचा सर्वाधिक अर्धायुष्यकाल केवळ ६१ मिलिसेकंद इतकाच आहे. २०१२ साली आयुपॅकने या मूलद्रव्याला अधिकृत मान्यता दिली. लॉरेन्स लिवरमोअर प्रयोगशाळेत हे मूलद्रव्य तयार झाल्याने, या प्रयोगशाळेच्या प्रयत्नांची पावती म्हणून लिवरमोअर शहराचे नाव या मूलद्रव्याला दिले गेले.

ऑक्सिजन, सल्फर यांच्या गटात आणि पोलोनिअमच्या खाली येणाऱ्या या मूलद्रव्याचेही फार थोडे अणू आजपर्यंत तयार करता आले आहेत. सद्धांतिक गणिताद्वारे याच्या गुणधर्माचे भाकीत करण्यात आले असले तरी त्यांची पडताळणी करण्याचे प्रयत्न चालूच आहेत.

– योगेश सोमण

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org