21 March 2019

News Flash

जे आले ते रमले.. : लोधी-पठाण सल्तनत

बहलूलनंतर सुलतानपदी आलेला सिकंदर शाह लोधी हा चोख आणि कार्यक्षम प्रशासक होता.

इ.स. १२०६ ते १५२६ या ३२० वर्षांच्या काळात दिल्ली सल्तनतवर पाच घराण्यांच्या राज्यकर्त्यांचे शासन झाले. त्यापैकी अखेरची सल्तनत लोदी या पश्तून अफगाण घराण्याची झाली. लोदी किंवा लोधी हे भारतीय प्रदेशावरचे पहिले अफगाण राज्यकत्रे. बहलूल खान लोधी याने लोधी घराण्याची स्थापन केलेली दिल्ली सल्तनत इ.स. १४५१ ते १५२६ अशी ७५ वर्षे टिकली. बहलूल खान त्यापूर्वी दिल्लीवर अंमल असलेल्या सय्यद सल्तनतचा सरहिंद पंजाबचा राज्यपाल होता. शेवटचा सय्यद सुलतान अलम शाह याने बहलूल खानाला आपले दिल्लीचे सुलतानपद दिल्यावर सय्यद सल्तनत बरखास्त झाली. बहलूलने आपल्या अफगाण राज्याचा विस्तार ग्वाल्हेर, जौनपूर आणि उत्तरेकडच्या प्रदेशात केला.

बहलूलनंतर सुलतानपदी आलेला सिकंदर शाह लोधी हा चोख आणि कार्यक्षम प्रशासक होता. सिकंदरनेच प्रसिद्ध शहर आग्रा वसवले. प्रजाहितकारी कारभार करतानाच त्याने पंजाबपासून बिहापर्यंत प्रदेशविस्तार केला. सिकंदरने जमीन महसूल, गुप्तहेर खाते, न्याय खात्यात सुधारणा केल्या. पर्शियन भाषा राज्यभाषा म्हणून भारतातला पहिला वापर सिकंदर लोधीने करून सर्व जमाखर्च पर्शियनमध्ये लिहिण्याचा पायंडा पाडला. पर्शियन भाषेत काव्य करणारा सिकंदर धार्मिक बाबींमध्ये मात्र असहिष्णू होता. लागवडीखालच्या शेतजमिनीचे मोजमाप घेण्यासाठी गाझ-इ-सिकंदरी या नावाची पद्धत त्याने सुरू केली.

इब्राहिम लोधी हा दिल्ली सल्तनतचा अखेरचा सुलतान. याची राजकीय कारकीर्द इ.स. १५१७ ते १५२६ अशी झाली. मोगल साम्राज्य संस्थापक बाबर याच्याबरोबर पानिपत येथे झालेल्या युद्धात इब्राहिमचा पराभव झाल्यामुळे लोधी घराण्याची दिल्लीवरील सत्ता संपली. इब्राहिमच्या अत्यंत हट्टी स्वभावामुळे बहुतेक सरदारांशी वाकडे होते. त्याच्या असंतुष्ट सरदारांपैकी दौलतखान आणि आलमखान यांनी काबूलचा तमूर वंशाचा शासक बाबर यास इब्राहिमवर आक्रमण करण्यासाठी पाचारण केले. बाबरबरोबर झालेल्या युद्धात पराभूत झालेला इब्राहिम मारला गेला आणि दिल्लीवर मोगलांची सत्ता सुरू झाली. युद्धामध्ये रणांगणावर मारला गेलेला हा एकटाच सुलतान.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on May 15, 2018 2:37 am

Web Title: lodhi pathan