तुकोबांच्या जीवनासंदर्भात एक कथा सांगितली जाते.. सुगीचा हंगाम चालू होता. जोंधळा भरदार आला होता. टच्च दाणे भरलेली कणसे शिवारात डोलत होती. कापणीची आणि मळणीची घाई सर्वत्र दाटलेली होती. बैलांच्या पाती खळ्यात गोल फिरत होत्या. कणसांमधून बाहेर पडलेल्या जोंधळ्यांची रास खळ्याशेजारीच वाढत होती. एकदा का भूस आणि दाणे वेगवेगळे केले, की पोती भरून घरी नेण्याची तयारी. अशाच एका खळ्यावर उफणणी भरात आलेली. खळ्याशेजारूनच गाडीवाट जात होती. आत्मानंदात रममाण झालेले तुकोबा झपाझप पावले टाकत वाट कापत होते. उफणणी चालू असताना आजूबाजूला उडालेले जोंधळ्याचे चुकार दाणे टिपण्यासाठी पाखरांची भारी लगबग. साऱ्या परिसरात पाखरे दाणे टिपत होती. तिकडून चालत तुकोबा आले आणि त्यांची चाहूल लागल्यानंतर जोंधळे टिपणारा पाखरांचा थवा एकदम उडाला. पंखांच्या आवाजाने महाराज एकदम सजग झाले. काय झाले असावे हे त्यांनी क्षणार्धात ताडले.. अन् आपल्याला पाहून पाखरे उडून पसार झाली याचा तुकोबांना मनस्वी खेद झाला. दाणे टिपणाऱ्या पाखरांना ज्या अर्थी आपली भीती वाटली त्या अर्थी आपल्या अंत:करणामध्ये द्वैत तेवत असले पाहिजे, अशी महाराजांची पक्की धारणा बनली. आपल्या उपासनेला हा डाग आहे, या भावनेने विव्हल झालेल्या तुकोबांनी तिथेच बैठक मारली. कोणाला तरी आपला धाक वाटतो, भीती वाटते ही भावनाच तुकोबांना मनोमन छळू लागली. अहंतेचा हा ठाव शोधून काढण्यासाठी महाराजांनी आसन लावले आणि तिथेच ते चिंतनात निमग्न झाले. किती वेळ गेला कोणास ठाऊक. चिंतनमग्न तुकोबांचा देहभाव हरपला. सृष्टीचा व्यवहार चालूच होता. उडून गेलेली ती पाखरे काही वेळाने परतली. तुकोबांच्याच परिसरात नि:शंकपणे पुन्हा दाणे टिपू लागली. निश्चलावस्थेत स्थित महाराजांच्या अंगाखांद्यावरही काही खेळू लागली. मगाची भीती पार लयाला गेली. महाराज सावध झाले. चिंतनाचा गाभा हस्तगत झाला म्हणून समाधान पावले. निर्द्वद्व जगणे कसे असते याचा हा साक्षात्कार! कोणाला तरी आपली भीती वाटणे, ही आपल्या अंतरी नांदत असलेल्या द्वैताची खूण होय. तुकोबांना उपसर्ग जाणवला तो त्याच द्वैताचा. ‘‘माझी कोणी न धरो शंका। हो कां लोकां निर्द्वद्व।।’’ अशा इरेसरीने महाराजांनी त्याच क्षणी चिंतनरूपी यज्ञ आरंभला. त्या नामयज्ञामध्ये द्वैताचे हवन झाले व अंगाखांद्यावर पाखरे बागडू लागली. कथा संपली. तुकोबांच्या जीवनात हा प्रसंग खरोखरच घडला होता का, यांसारख्या शंका उपस्थित करणे फोलच. प्रसंगाचा गाभा महत्त्वाचा. अद्वयदृष्टी लाभलेली व्यक्ती व्यवहारात कशी जगते याचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे तुकोबांचे उभे जीवन. आपण आणि वरकड लोक अथवा जीवसृष्टी एकाच तत्त्वाचे आविष्कार आहोत, या आकलनाचेच नाव अद्वयबोध! ‘‘तुका म्हणे जें जें भेटे। तें तें वाटे मी ऐसें।।’’ असा एकात्म भाव त्या अद्वयदृष्टीमधूनच उमलतो. अशी अद्वयदृष्टी लाभणे हीच खरी पांडुरंगकृपा असे तुकोबा- ‘‘विश्वास तो खरा मग। पांडुरंग कृपेचा।।’’ अशा रोखठोक शब्दांत नितळपणे सांगून टाकतात. अशी निर्द्वद्वावस्था अंत:करणात स्थिरावली की अंत:करण आपोआपच निर्भय बनते. भय संपले की जीवनात उरतो केवळ आनंद. निवृत्तीनाथांनी त्यांच्या सद्गुरूंची- गहिनीनाथांची नेमकी तीच अवस्था गुरुपरंपरेच्या अभंगात- ‘निर्द्वद्व नि:शंक विचरतां मही। सुखानंद हृदयी स्थिरावला।।’’ अशा प्रत्ययकारी शब्दांत वर्णिलेली आहे.
– अभय टिळक
agtilak@gmail.com