विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून औद्योगिकीकरणामुळे कित्येक लक्ष टन अँटिमनी, आर्सेनिक, कोबाल्ट, निकेल यांसारख्या विषारी मूलद्रव्यांचे कण वातावरणात विखुरले गेले. त्याबरोबरच कोळसा, खनिज तेल व इतर जीवाश्मी (हायड्रोकार्बनयुक्त साठय़ांच्या रूपातील) इंधन जाळल्यामुळे गेल्या शंभर वर्षांत कित्येक कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याहूनही अधिक कर्बवायू हवेत मिसळला गेला असा अंदाज व्यक्त केला जातो. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते २१व्या शतकाच्या सुरुवातीस एकूणच हवा, पाणी, जमीन ही सर्व मूलभूत नैसर्गिक संसाधने कमालीची प्रदूषित झाली असून नैसर्गिक परिसंस्थांच्या आणि मानवाच्या आरोग्यावर याचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शेतीच्या औद्योगिकीकरणामधील यंत्रसामग्री, खतांचा अतिरिक्त वापर, सिंचनाच्या नवीन पद्धती, संकरित पिके यामुळे अनेक त्वरित फायदे झाले. त्याच दरम्यान मोठय़ा प्रमाणावर होत गेलेली जमिनीची धूप, एका वेळी एकाच प्रकारचे पीक घेण्याच्या पद्धतीमुळे इतर पिकांवर होणारे दुष्परिणाम, पाणथळ प्रदेशांचा ऱ्हास, बेसुमार जंगलतोड अशा अनेक समस्यादेखील निर्माण झाल्या. हवेतील आणि पाण्यातील प्रदूषकांचा परिणाम वनस्पती, मासे, माती, जंगले या सगळ्यावरच झाला. त्यात भर पडली ती जैवविविधतेचा ऱ्हास, आक्रमक प्रजातींचा शिरकाव, असुरक्षित परिसंस्था, धोक्यात आलेली अन्न सुरक्षा, जागतिक तापमान वाढ, वाढणारी समुद्रपातळी, प्रवाळी खडकांचे ब्लीचिंग, किनारी प्रदेशाची दुर्दशा, घनकचऱ्याचा प्रश्न, तेलगळती, चक्रीवादळे, भूकंप, सुनामी आणि अगदी अलीकडेच लक्षात आलेली  सागरातील मायक्रोप्लास्टिकचा कचऱ्याची गंभीर समस्या, अशा पर्यावरणीय समस्या आजही  मानवाच्या अस्तित्वाला आव्हान देत आहेत.

१९५०-६० च्या दशकामध्ये या आव्हानाला तोंड देण्यासाठी काय करता येईल यावर  प्रगत राष्ट्रांमधील पर्यावरणतज्ज्ञांची  विचारविनिमय प्रक्रिया सुरू झाली. १९७२ मधील संयुक्त राष्ट्रांची स्टॉकहोम परिषद ही याचीच फलश्रुती आहे. या परिषदेने विकास आणि पर्यावरण यातील परस्परसंबंध ओळखून पावले उचलण्याचा निर्णय घेतला आणि जगभरात त्यावरील उपायांचा शोध आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे कसोशीचे प्रयत्न स्थानिक व जागतिक पातळीवर होत आहेत. परंतु विशेषत: प्रगतिशील राष्ट्रांमध्ये प्रदूषण आणि एकूणच पर्यावरणीय समस्यांच्या मुळाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे असलेली लोकसंख्या विस्फोटाची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. यामुळे पर्यावरणीय  समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसते आहे. खूप उशीर होण्यापूर्वी या प्रचंड आव्हानाला सामोरे जाण्यासाठी माणसाने जाणीवपूर्वक सक्रिय  व्हायला हवे.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org