16 January 2021

News Flash

कुतूहल : मानवनिर्मित कचरा

सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरात कोणत्याही स्वरूपात प्लास्टिकचा शिरकाव झालेला नव्हता.

भारतासारख्या विकसनशील देशात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास २० वर्षे कचरा नावाचे काही आहे आणि त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे हेच मुळी कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. एक तर भारताची लोकसंख्या आताच्या तुलनेत खूप कमी होती. एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्क्यांहून अधिक जनता ग्रामीण भागात राहत होती. मानवनिर्मित संसाधनांचे उत्पादन आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांचा वापर अतिशय मर्यादित होता. जनसामान्यांच्या मूलभूत गरजादेखील अतिशय अल्प होत्या आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा काटेकोर वापर करून त्या गरजा सहजपणे भागवल्या जायच्या. ‘एकदा वापरा आणि फेकून द्या’ ही संस्कृती उदयास आलेली नव्हती. सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरात कोणत्याही स्वरूपात प्लास्टिकचा शिरकाव झालेला नव्हता. ग्रामीण भागात हा कचरा गावातील एखाद्या पडीक, वापरात नसलेल्या जागी टाकण्याची व्यवस्था असे. त्याला ‘उकिरडा’ असे म्हणत. या उकिरडय़ावर भाजीपाला व तत्सम जैविक कचरा तिथल्या जमिनीत आपोआप जिरून जात असे. त्यामुळे जागोजागी कचराकुंडय़ा ठेवणे हा प्रकार नव्हता.

मात्र, १९५०-६० च्या दशकात विकासकामांनी वेग घेतला. लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. शहरांमध्ये कारखाने, उद्योगधंदे यांची भरभराट होऊ लागली. खूप मोठय़ा प्रमाणात रोजगार उत्पन्न होऊ लागले आणि भारतात शहरीकरणाच्या प्रक्रियेने प्रचंड वेग घेतला. याच दरम्यान प्लास्टिकच्या वस्तू मोठय़ा प्रमाणात भारतीय बाजारपेठेत दिसू लागल्या आणि या वस्तूंच्या उपयुक्ततेमुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. साहजिकच अशा वस्तूंचा खप वाढतच गेला. यातूनच ‘वापरा व फेकून द्या’ या ‘डिस्पोजेबल’ संस्कृतीचा उदय झाला. देशात सातत्याने वाढणारी लोकसंख्या, शहरीकरणाचा रेटा, मानवनिर्मित संसाधनांच्या मोठाल्या बाजारपेठा, वाढते उत्पन्न, हाताशी खेळता पैसा, वस्तूंची मुबलक उपलब्धी, जनसामान्यांच्या बदलत जाणाऱ्या जीवनशैलीमुळे आणि मानसिकतेमुळे येत असलेली बेफिकीर वृत्ती या व अशा घडामोडींमुळे हळूहळू कचरानिर्मिती होत गेली आणि कचऱ्याचे प्रमाणदेखील वाढत गेले.

साठच्या दशकामध्ये कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणावर काही तोडगा काढावा यासाठी भारत सरकारने एक कर्ज योजना जारी केली. ही योजना जैविक कचऱ्यापासून उत्तम खत निर्माण करावे यासाठी होती. कालांतराने ही योजना बारगळली. आता गेल्या ६०-७० वर्षांमध्ये कचरानिर्मिती आणि त्याची विल्हेवाट लावणे हा साधासोपा प्रश्न न राहता त्याचे सामाजिक- आर्थिक- मानवी आरोग्य- पर्यावरण या सर्वच आघाडय़ांवर एका अतिशय गंभीर समस्येत रूपांतर झाले आहे.

– डॉ. संजय जोशी मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 1:49 am

Web Title: loksatta kuthul man made waste zws 70
Next Stories
1 मनोवेध : रिकामे मन..
2 मनोवेध : ‘मी’चे गाठोडे
3 कुतूहल : वन्यजीव न्यायवैद्यकशास्त्र
Just Now!
X