मानसिक तणावामुळे होणारा एक त्रासदायक आजार म्हणजे- इर्रिटेबल बॉवेल सिण्ड्रोम (आयबीएस)! अमेरिकेत सर्वाधिक लोकांना होणाऱ्या आजारात अग्रस्थानी सर्दी आहे आणि दुसरा क्रमांक आयबीएसचा आहे. पोट फुगणे, दुखणे आणि शौचास पुन:पुन्हा जावेसे वाटणे, काहीवेळा जुलाब होणे आणि काहीवेळा बद्धकोष्ठता होणे, शौचाला न होता फक्त वात सरणे.. अशी लक्षणे या आजारात जाणवतात. भारतातदेखील हा आजार मोठय़ा प्रमाणात आहे, फक्त त्याला येथील माणसे ‘गॅस’ असे म्हणतात. मानसिक तणावामुळे हा आजार वाढतो. शरीरातील संप्रेरकांचाही परिणाम या आजारावर होत असावा; कारण मासिक पाळीच्या वेळी ही लक्षणे काही स्त्रियांमध्ये वाढतात आणि रजोनिवृत्तीनंतर हा त्रास कमी होतो, असे काही संशोधनांत आढळले आहे. पोट फुगले असेल आणि पोटात कळ येत असेल अशा वेळी दीर्घ श्वसन केले तर लक्षणांचा त्रास कमी होतो, असा अनुभव अनेक रुग्ण सांगतात.

डॉ. सुजॅन गेलॉर्ड यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना येथे हा त्रास होणाऱ्या ७५ रुग्णांचा अभ्यास केला. त्यातील ३८ रुग्णांना त्यांनी आठ आठवडय़ांचा ‘माइण्डफुलनेस’चा वर्ग करायला लावले आणि उरलेले रुग्ण असा ध्यान वर्ग न करता फक्त औषधे घेत राहिले. आठ आठवडय़ांनंतर ध्यान करणाऱ्या रुग्णांची लक्षणे २६.४ टक्क्यांनी कमी झाली आणि केवळ औषधे घेणाऱ्या रुग्णांची लक्षणे फक्त ६.२ टक्क्यांनी कमी झाली. तीन महिन्यांनंतर ध्यान करणाऱ्यांची लक्षणे ३८.२ टक्क्यांनी आणि ध्यान न करणाऱ्यांची लक्षणे ११.८  टक्के कमी झाली. दोन्ही गटांतील हा फरक लक्षणीय होता.

अशाच एका अभ्यासाचे संशोधक ओलाफर पाल्सन हे ‘क्लिनिकल सायकोलॉजिस्ट’ आहेत; त्यांच्या मते, साक्षीध्यान हे शरीरातील संवेदना प्रतिक्रिया न करता अनुभवायला शिकवते. त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून वाढणारी पोटातील कळीची तीव्रता कमी होते;  परिणामत: त्या लक्षणांमुळे निर्माण होणारी चिंता कमी होते. चिंता असेल तर तिचा परिणाम म्हणून पुन्हा लक्षणांची तीव्रता वाढत असते. रुग्णाने शरीरातील संवेदनांना प्रतिक्रिया करायचे कमी केले कीहे दुष्टचक्र थांबते. अन्नपचनावर मानसिक तणावाचा दुष्परिणाम होत असल्याने असा त्रास असलेल्या सर्व व्यक्तींनी साक्षीध्यानाचा सराव करून पाहायला हवा.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com