काही माणसे एकाच वेळी अनेक कामे करतात. उदाहरणार्थ, काही जण एकाच वेळी अनेक वाद्ये वाजवतात. हाताने संवादिनी किंवा तबला वाजवत गाणारे गायक आपण पाहतो. एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिणारी किंवा चित्रे काढणारी माणसे असतात. त्यांना हे शक्य होते कारण या दोनपैकी एक कृती सवयीने होत असते. सायकल चालवायला शिकल्यानंतर ती चालवताना आपण मनात विचार करू शकतो, तसेच हे होते. एक कृती सवयीने होते आणि दुसऱ्या कृतीत लक्ष दिले जाते. त्यामुळे असा चमत्कार वाटणाऱ्या कृती या निरंतर मेहनतीचा परिणाम असतात. मेंदूत एकाच वेळी अनेक चक्रे, अनेक विचार चालू असले, तरी अटेन्शन, ध्यान एका वेळी एकाच ठिकाणी असते.

माणसाचा मेंदू आणि संगणक यांमध्ये हा फरक आहे. संगणक खऱ्या अर्थाने ‘मल्टिटास्किंग’ करतो; त्याच्या आत एकाच वेळी अनेक प्रोग्राम चालू असतात आणि त्याच्या पडद्यावरदेखील एकाच वेळी छोटय़ा छोटय़ा अनेक विण्डो चालू राहू शकतात. निसर्गत: मेंदूच्या आतमध्ये अनेक फाइल्स चालू असल्या, तरी पडद्यावर मात्र एका वेळी एकच विण्डो चालू असते; ती वेगाने बदलते म्हणून आपल्याला ते ‘मल्टिटास्किंग’ वाटते. मात्र, नियमित सरावाने मेंदूची लक्ष देण्याची क्षमता विकसित करता येते, समग्रता शक्य होते.

शरीरावर लक्ष नेऊन माणूस ध्यानाचा प्रदेश विस्तारित करू शकतो. एका वेळी मांडीपासून तळपायापर्यंत संपूर्ण पायावर किंवा संपूर्ण शरीरावरदेखील लक्ष देऊ शकतो. ‘एकाग्रता’ आणि ‘समग्रता’ असे ध्यान देण्याचे दोन प्रकार आहेत. माणूस एकाग्र चित्ताने वाचन करीत असेल, तर त्याला हाक मारली तरी ऐकू येत नाही. कारण त्याच्या मेंदूतील श्रवण केंद्र त्या वेळी बधिर असते. अशी एकाग्रता नेहमी चांगलीच असते असे नाही. सजग राहण्यासाठी समग्रता आवश्यक असते. एकाच इंद्रियावर एकाग्र न होता वर्तमान क्षणी परिसरात, शरीरात आणि मनात काय होते आहे यावर लक्ष देता येते. यालाच ‘पूर्णभान’ म्हणतात. साक्षीभाव ठेवून हे पूर्णभान विकसित करता येते. मात्र कर्ताभाव ठेवून असे भान एकाच वेळी दोन कृतींवर ठेवता येत नाही. एकाच वेळी दोन कृती शक्य होण्यासाठी एक कृती सवयीने आपोआप व्हावी लागते.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com