20 January 2021

News Flash

मनोवेध : जीवनोत्सव

ध्यान पारमार्थिक माणसेच करतात, हा समज आता बदलायला हवा.

गेले वर्षभर सजगता आणि साक्षीभाव यांचा वेध आपण घेतला. सजगता म्हणजे वर्तमान क्षणात लक्ष असणे. सजगतेने माणूस रोज काही वेळ साक्षी, काम करताना कर्ता आणि आनंद अनुभवताना रसिक भोक्ता होऊ शकतो. साहित्य, कला मनात रस म्हणजे विविध भावना निर्माण करतात, त्यांमध्ये रंगून जाण्याची वृत्ती म्हणजे रसिकता! ती विकसित करावी लागते, बुद्धिबळातील चाली, गाण्यातील सूर समजू लागले कीत्याचा आनंद घेता येतो. आयुष्य समरसून जगण्यासाठी अशी अनेक क्षेत्रांतील रसिकता विकसित करता येते. भूतकाळात सजगता निवृत्तीसाठी अधिक वापरली गेली; आता ती प्रवृत्तीसाठी, या जगातील आनंद अनुभवण्यासाठीदेखील उपयोगात आणायला हवी. रसिकता व्यक्तिसापेक्ष असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीस जे गाणे आवडेल ते दुसरीस आवडायलाच हवे असे नाही. मनात चिंता, उदासी, राग असेल तर वर्तमान क्षणात आनंद वाटत नाही, अशावेळी रसिकता शक्य नसते. रसिकतेसाठी सजगतेचा, लक्ष वर्तमान क्षणात आणण्याचा सराव करावा लागतो. अतृप्तीची वखवख म्हणजेही रसिकता नाही. प्रत्येक सुंदर फुल माझ्याच कोटाला असले पाहिजे ही आसक्ती म्हणजे रसिकता नाही. ‘मी’चा विसर पडून त्या क्षणी पंच ज्ञानेंद्रिये आणि मन यांनी आनंदात न्हाऊन जाणे म्हणजे रसिकता! दृष्टीने सौंदर्य, कानाने सुस्वर, रसनेने सुरुची, मनाने सरस साहित्य, बुद्धीने संकल्पना यांचा आनंद अनुभवल्याने ‘वाहऽऽ’ अशी दाद देणे म्हणजे रसिकता!

ध्यानाचा सराव करणारी व्यक्ती परलोकाच्या आकांक्षेने या आयुष्यातील आनंदांना नाकारणारी, विरक्त, रुक्ष असायलाच हवी असे नाही. ध्यान पारमार्थिक माणसेच करतात, हा समज आता बदलायला हवा. हे आयुष्य हाच उत्सव. हा ‘जीवनोत्सव’ साजरा करण्यासाठीही सजगता हवी. जीवनशैली म्हणजे कसे जगायचे आणि जीवनदृष्टी म्हणजे कशासाठी जगायचे, हे समजले की जगणे हेच सुरेल गाणे होते. ‘भाकरी आणि फुल’ या जुन्या रूपकातील भाकरी जिवंत ठेवते आणि फूल कशासाठी जगायचे याचे प्रयोजन देते. हे फुल म्हणजेच रसिकता! दु:ख विसरण्यासाठी घटाघटा दारू पिणे, मन रिकामे राहू नये म्हणून टीव्ही किंवा मोबाइलमध्ये बुडून राहणे, म्हणजे रसिकता नाही. रसिकता म्हणजे आयुष्यातील विविध अनुभव घेण्यासाठी उल्हसित असणे, माणसांशी आणि निसर्गाशी नाते जोडायला उत्सुक असणे. गेले वर्षभर आपलेही नाते ‘मनोवेध’मुळे निर्माण झाले आहे, ते जपू या, त्यासाठी संवाद साधत राहू या!

(समाप्त)

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2020 4:23 am

Web Title: loksatta manovedh jeevan utsav enjoyment in life zws 70
Next Stories
1 मनोवेध : वर्तनबदल
2 कुतूहल : पंधराव्या वर्षांतला पर्यावरण जागर!
3 मनोवेध : व्यवहारध्यान
Just Now!
X