‘मी’चे विस्मरण होणे ही साक्षिभावाची उन्नत अवस्था आहे. अल्झायमर या आजारातही ‘मी’चे विस्मरण होते, पण तो साक्षिभाव नाही. कारण साक्षिभावात काळाचे, परिसराचे भान असते. अल्झायमरमध्ये मात्र हेदेखील भान असत नाही. सध्या माणसे दीर्घायुषी होऊ लागल्याने अल्झायमर आजाराचे प्रमाण वाढले आहे. या आजाराचे केवळ पाच टक्के रुग्ण पासष्टीखालचे असतात. विस्मरण हे याचे एक लक्षण असले, तरी वार्धक्यातील विस्मरण आणि हा आजार यांमध्ये फरक आहे.
या आजाराच्या तीन अवस्था केल्या जातात; त्यातील दुसरी अवस्था हा आजार असेल तरच येते. पहिल्या अवस्थेत वर्तमान अनुभव लक्षात राहात नाहीत, त्यामुळे नवीन काही शिकता येत नाही. दुसऱ्या अवस्थेत माणसे जेवण झालेले असूनदेखील पुन्हा जेवण मागू लागतात. त्यांना काळाचे भान राहात नाही. ते रात्रीबेरात्री आंघोळीला जाऊ लागतात. आंघोळ केल्यानंतर कपडे न घालताच बाहेर येतात. त्यांचा राग, उदासी, चिंता वाढते. ते बाहेर फिरायला जातात, पण घराचा पत्ता विसरतात. त्यांना स्वत:चे नाव सांगता येत नाही. ही अवस्था अनेक वर्षे राहू शकते. या स्थितीत ते फार वेगळे बोलू शकत नाहीत. बोलले तरी जुन्या आठवणी पुन:पुन्हा सांगत राहातात. दुसऱ्या व्यक्तीशी किती जवळीक साधायची, तिच्याशी शारीरिक लगट किती करायची याचे भान राहात नाही. ते भूतकाळात जगू लागतात. जोडीदाराचा मृत्यू होऊन दहा वर्षे झाली असली तरी तो/ती आहेच असे त्यांना वाटते. जोडीदाराला शोधत फिरू लागतात. जोडीदार जेवायला येईल म्हणून वाट पाहात बसतात. हळूहळू त्यांना स्वत:ची काळजी घेणे, शरीराची स्वच्छता करणेही जमत नाही. जेवताना घास किती वेळ चावायचा याचेही भान राहात नाही. ते घास बकाबका न चावताच गिळू लागतात किंवा तोंडात तसाच धरून ठेवतात. त्यांना काही भास होऊ लागतात. असंबद्ध बोलू लागतात.
अल्झायमरच्या या दुसऱ्या अवस्थेत ते हिंडून-फिरून असतात. तिसऱ्या अवस्थेत मात्र ते अंथरुणातच राहू लागतात. त्यांना स्वत:चे स्वत: उठूनही बसता येत नाही. हळूहळू त्यांना कुशीवरही वळवावे लागते आणि त्याचमुळे या आजाराने मृत्यू येतो. हा आजार बरे करणारी परिणामकारक औषधे नाहीत; पण सजगतेच्या सरावाने तो टाळता येतो, त्याची गती कमी करता येते.
डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 4, 2020 12:11 am