– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

जन्मत:च मुलाचा मेंदू पूर्ण विकसित नसतो. त्या बाळास जे अनुभव मिळतात त्यानुसार त्याच्या मेंदूतील पेशींच्या जोडण्या तयार होऊन त्याच्या बुद्धीचा विकास होऊ लागतो. मात्र, सात वर्षांपर्यंत त्याचा ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ काम करत नसतो. त्यामुळे चार वर्षांचे बाळ राग आल्यानंतर खेळणी फेकून देत असेल तर ते स्वाभाविक आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ विकसित होऊ लागतो, पण तो विकास २५ वर्षांपर्यंत पूर्ण होत नाही. ‘गद्धे पंचविशी’ हा शब्द त्यामुळेच रूढ झाला असेल! कारण या वयात घेतले जाणारे बरेच निर्णय भावनिक असतात. भावनिक मेंदू त्या वेळी पूर्ण सक्रिय असतो, पण त्यावर नियंत्रण ठेवणारा ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ मात्र अविकसित असतो.

मुलांच्या शरीरात पौगंडावस्था असताना वेगाने बदल होत असतात. त्यामुळे मुले अधिक आक्रमक होतात. मेंदूतील पेशी एकमेकांना जोडणाऱ्या तंतूंवर याच वयात एक आवरण तयार होते. त्यामुळे त्यातून विद्युतधारा अधिक वेगाने वाहू लागते. परिणामी या वयातील मुलांच्या मनात विचार वेगाने येऊ लागतात. त्यांची संख्याही बालवयापेक्षा खूप वाढते. त्यामुळे मुले तंद्रीत राहू लागतात. जेवायला बसली तरी घास हातात घेऊन बसून राहतात. समोर कुणी बोलत असेल तरी यांचे तिकडे लक्ष नसते. विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवणारा ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ पूर्ण विकसित नसल्याने यांच्या मनातील भावनांच्या लाटा खूप मोठय़ा असतात. त्यांना क्षणात खूप उत्साह वाटतो आणि लगेच खूप कंटाळाही येतो. त्याचमुळे त्यांचे सैराट वागणे वाढते.

या वयातील मुलांची ऊर्जा कायम ठेवून त्यांचे बेभान वागणे कमी करायचे असेल, तर त्यांना पाच मिनिटे ध्यानाच्या सरावाला बसवायला हवे. या वयात ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ला योग्य प्रशिक्षण मिळाले, की त्याचा विकास योग्य दिशेने होतो. त्याची कार्ये चांगली होऊ लागतात. मेंदूच्या या भागाची अनेक कामे आहेत. ऑर्केस्ट्राचा संयोजक जसा सर्व वादकांच्या ताफ्याला सूचना करून उत्तम सुरावट साधत असतो, तसाच ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ मेंदूच्या सगळ्या भागांशी संपर्क ठेवून त्यांची कार्ये नियंत्रित करतो. हे मुलांना समजावून सांगितले तर ती ध्यानाचा सराव करू लागतात. पालकांनी स्वत: ध्यान शिकून मुलांबरोबर रोज पाच-दहा मिनिटे सरावासाठी बसायचे ठरवले तर ते संपूर्ण कुटुंबासाठी हितावह ठरेल.