नागर आख्यानाला वर्षभरात आलेले आणखी काही प्रतिसाद पुढीलप्रमाणे-

सुधीर पाटील, पुणे – थोडक्या शब्दांमध्ये दुर्मीळ माहिती देणारे लेख. नीलेश  बावीस्कर, यश खानझोडे, मुंबई- केमाल पाशाची माहिती फारच उद्बोधक वाटली. यशराज कीर्तने, वॉर्सा, पोलंड- वॉर्सामधील द स्क्वेअर ऑफ गुड महाराजा हे टिपण लिहून अत्यंत दुर्मीळ माहिती आपण दिली. भास्कर खरे, मुंबई-भारतीय शहरांविषयी माहिती द्यावी. केमाल पाशावरील लेख आवडला. संजय कुलकर्णी, पालघर-कमी शब्दांत वर्णन करणारे लेख स्तुत्य. फिरोज मुल्ला, मुंबई- या विषयावर आपण पुस्तक लिहावे. राधा मराठे- या विषयावरचे पुस्तक हवे. प्रफुल्ल जोशी, कुसुंबे जळगाव- महाराष्ट्रातील शहरांबद्दल माहिती अपेक्षित. नलिनी जोशी, बोरिवली- आपल्या लेखांमधून अत्यंत दुर्मीळ माहिती मिळते. ललिता पटवर्धन, दिल्ली- दिल्ली शहराचा इतिहास लिहावा. अतुल माने- ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माविषयी सत्य माहितीची पुस्तकांची नावे द्यावीत. क्रिशान्त घोरपडे- तुर्की अस्मितेविषयी आपला लेख आवडला. सुयोग पवार – या विषयावर पुस्तक हवे. प्रताप जोशी- दुर्मीळ माहिती मिळाली. विद्याधर वैशंपायन, भोपाळ- भारतीय शहरांचा इतिहासही प्रसिद्ध करावा. राजेश िशदे, प्रताप जोशी, अमोल नलावडे, पूजा यादव, आनंद देवकर, पी.पी.बारदेसकर वगरे वाचकांनीही अशाच प्रतिक्रिया पाठविल्या आहेत. योगेश पाटील अमरावती- थोडय़ा शब्दात मोठा आशय सामावून घेण्याची आपली लेखनशैली आवडली. संतोष जोशी, सांताक्रूझ-शहरांबद्दलची माहिती आपण देता. आमच्या रत्नागिरीविषयी लिहावे. सुरेश घोरपडे, उरण- कोकण पट्टय़ातील शहरांची वस्ती कशी झाली याबद्दल माहिती द्यावी.

(समाप्त)

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

वनस्पती साम्राज्यातर्फे वाचकांना शुभेच्छा

वाचकहो, वर्षभर तुम्हाला मराठी विज्ञान परिषदेने आमची विविध प्रकारे ओळख करून दिली. त्यात त्यांनी अगदी सुरुवातीला आमचे वर्गीकरण महाविद्यालायाच्या वर्गात कसे करून देतात हे सांगितले. हा भाग  तुम्हाला समजणे जरुरीचे होते, किंबहुना त्यातून आमचेही काही शिक्षण झाले, कारण आम्ही कुठे महाविद्यालयात गेलो आहोत? त्यानंतर आमच्यातल्या विविध वनस्पतींची माहिती तुम्हाला एकेका लेखातून सचित्र मिळत गेली. वस्तुत: ही चित्रे रंगीत असती तर आम्ही निसर्गात कसे दिसतो हे नेमकेपणाने तुम्हाला समजले असते, पण ज्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, त्या ‘लोकसत्ता’लाही काही आíथक मर्यादा असल्याने त्यांच्या चौकटीतून जेवढी जमली तेवढी चित्रे त्यांनी रंगीत दिली. सगळे दिवस त्यांना चित्रे रंगीत द्यायला जमले नाही, हे आपण समजून घेऊ या. या लेखातून तुम्हाला वनस्पतींचे शास्त्रीय नाव, व्यवहारातले नाव, वनस्पतीचे वर्णन आणि उपयोग व धोके समजावून सांगण्यात आले. यातले काही उपयोग औषधी होते, पण वाचकहो, ही औषधे तुम्ही तुमच्या वैद्य-डॉक्टर यांना विचारल्याशिवाय परस्पर वापरू नका, कारण कदाचित काही लोकांना त्यापासून धोकासुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते.

प्रत्येक आठवडय़ातील सोमवार ते शुक्रवार असे पाच-पाच दिवस हे लेख येत गेले आणि त्यातील प्रत्येक शुक्रवारी आमच्यावर संशोधनात्मक काम करणाऱ्या भारतभरच्या शास्त्रज्ञांवरची माहिती तुम्हाला वाचायला मिळाली. ही माहिती खूप वाचकांना नावीन्यपूर्ण आणि मनोरंजनात्मक वाटली. कणकवलीच्या श्री. वामन मधुसूदन पंडित यांना शास्त्रज्ञांची ही माहिती इतकी महत्त्वपूर्ण वाटली, की त्यांनी अशा शंभर शास्त्रज्ञांची माहिती आम्हाला पुरवा, आम्ही त्याचे आमच्या खर्चाने पुस्तक काढतो, अशी चक्क मागणीच केली. किती छान छान माणसे समाजात असतात नाही? त्यांना मराठी विज्ञान परिषदेने शंभर शास्त्रज्ञांची माहिती पुरवायचे मान्य केले आहे असे ऐकतो. शेवटचे काही लेख आम्हा वनस्पतींवर काही हौशी लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांची ओळख करून देणारे होते. एक-दोन लेख या संदर्भात कोणते अभ्यासक्रम आहेत याची माहिती देणारे होते.

बहुसंख्य वाचकांना हे लेख आवडत असत. एखाद् दुसऱ्यांनी काही दुरुस्त्याही सुचवल्याचे आम्ही ऐकतो.

वाचकहो, तुमच्या संगतीत आमचे वर्ष चांगले गेले. आम्हाला नवीन वर्षांची पालवी फुटते, तशा तुम्हाला नवीन वर्षांच्या शुभेच्छा.

. पां. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org