ब्रिटिश सरकारने भारतातील आपली राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा १९११ मध्ये केली. त्यांनी आपल्या सामर्थ्यांचे प्रदर्शन करण्यासाठी टोलेजंग इमारती, सौंदर्य वाढवणाऱ्या उद्यानांनी संपन्न अशा या नियोजित नव्या दिल्लीच्या नगररचना आणि वास्तुस्थापत्याची जबाबदारी ब्रिटिश आर्किटेक्ट एडविन ल्यूटन्स आणि त्याचा व्यवसायातला भागीदार हर्बर्ट बेकर यांच्याकडे सोपवली. ल्यूटन्स यांनी दिल्लीच्या नव्या वसाहतीसाठी ज्या प्रमुख इमारती बांधल्या त्यापैकी राष्ट्रपती भवन आणि संसद भवन या दोन अतिमहत्त्वाच्या समजल्या जातात.

सध्याचे संसद भवन किंवा पार्लमेंट हाऊसचे सुरुवातीचे नाव सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असे होते. ल्यूटन्स यांनी या इमारतीचा आराखडा १९१२-१३ या काळात तयार केला आणि तिचे बांधकाम १९२१ ते १९२७ या काळात पूर्ण झाले, उद्घाटन १९२७ मध्ये झाले. अशोकचक्राप्रमाणे वर्तुळाकार रचना असलेल्या या इमारतीत सेंट्रल हॉल या मध्यवर्ती दालनाशिवाय लोकसभा, राज्यसभा, ग्रंथालय ही दालने आहेत. ब्रिटिश सत्ताकाळात या दालनांची नावे सेंट्रल (लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली) हॉल, स्टेट कौन्सिल, लायब्ररी अशी होती. १९४७ साली भारतीय सत्तांतर समारंभ याच इमारतीच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. सज्जांमध्ये बाहेरून १४४ स्तंभ असलेल्या या इमारतीच्या सभोवताली बगिचे, उद्याने आणि कारंजी आहेत. सांची स्तूपाप्रमाणे या संसद भवनाचे कुंपणही लाल दगडाचे जाळीदार बनवले आहे.

ल्यूटन्सच्या महत्त्वाच्या वास्तुनिर्मितीपैकी सध्याचे ‘इंडिया गेट’ ऊर्फ वॉर मेमोरियलही आहे. ल्यूटन्सच्या आराखडय़ाप्रमाणे राष्ट्रपती भवनापासून सुरू झालेला राजपथ (मूळ नाव किंग्जवे) या प्रशस्त मार्गावर पुढे हे ४२ मीटर्स उंचीचे स्मारक आहे. पहिल्या महायुद्धात वीरगती मिळालेल्या ७०,००० सनिकांसाठी बांधलेल्या या स्मारकाचे उद्घाटन १९३१ मध्ये झाले. याशिवाय ल्यूटन्सने पतियाळा हाऊस, बरोडा हाऊस, हैदराबाद हाऊस आदी इमारतींचे आराखडे केले. ल्यूटन्सच्या आराखडय़ानुसार बांधलेल्या नवी दिल्लीच्या इमारतींमुळे पुढे ल्यूटन्स एवढे जगद्विख्यात झाले की, अनेक वर्षे नव्या दिल्लीचा उल्लेख ‘ल्यूटेन्स दिल्ली’ (ल्यूटन्सची दिल्ली) असा होत राहिला.

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com