सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय जनमानसात स्वातंत्र्याची मागणी जसजशी जोर धरू लागली तसतसे ब्रिटिशांनी आपली विश्वासार्हता बळकट करण्याचे, आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचे मार्ग शोधायला सुरुवात केली. त्यापैकी एक प्रयत्न असा होता की, मोगलांचे अनुकरण करून दिल्लीला नवीन राजधानी स्थापन करावी! हा प्रयत्न जनतेच्या मनाची पकड घेईल असे त्यांना वाटत होते. इ.स. १९११ मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारात पाचव्या जॉर्जला भारत आणि ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट म्हणून घोषित केले गेले आणि त्यापाठोपाठ ब्रिटिश भारत सरकारची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा झाली.

त्यासाठी दिल्लीत, ६०,०००ची लोकवस्ती मावेल अशी सुनियोजित नगररचना करण्याचे काम जागतिक प्रसिद्धी असलेले वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) एडविन ल्यूटन्स यांना देण्यात आले.

ब्रिटिशांना आपल्या सामर्थ्यांचे प्रदर्शन करण्यासाठी वैभवसंपन्न संचलने, शाही रुबाब दाखवणाऱ्या टोलेजंग इमारतींचे हे शहर निर्माण करायचे होते. ल्यूटन्सने बांधलेल्या नवी दिल्लीत दोन प्रमुख इमारती आहेत : राष्ट्रपती भवन आणि संसद भवन (पार्लमेंट हाऊस). नवी दिल्लीच्या केंद्रस्थानी रायसिना हिलवर व्हॉइसरॉयसाठी निवासस्थान बांधले त्याला आता ‘राष्ट्रपती भवन’ म्हणतात. युरोपीयन, राजपूत आणि मोगल वास्तुशैलींचा मेळ घालून ३२० एकर जमिनीवर ३४० खोल्या असलेले राष्ट्रपती भवन जगातील इतर कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवासाहून अधिक भव्य आणि सुंदर आहे.

प्राचीन भारतीय वास्तुस्थापत्य आणि बाबराच्या काळातील वास्तुशास्त्र यांत बरंच साम्य आहे, असं ल्यूटन्स यांचं मत होतं. राष्ट्रपती भवनाच्या निर्मितीत त्यांनी खांब युरोपीयन शैलीत केले, पण राजस्थानी लाल बलुआ दगडात राजपूत शैलीचे नक्षीकाम आणि जाळ्यांचे कामही केले. एकूण बांधकामात लोखंडाचे प्रमाण नगण्य आहे.

प्रमुख इमारतीच्या भोवताली असलेल्या मुघल गार्डन्समधील गुलाब वाटिकांमध्ये अनेक प्रकारच्या फुललेल्या गुलाब पुष्पांनी सर्व परिसर संपन्न, समृद्ध केला आहे. एकंदर १७ वर्षे बांधकाम चाललेले व्हॉइसरॉय हाऊस ऊर्फ राष्ट्रपती भवन १९२९ मध्ये पूर्ण झाले आणि १९३१ मध्ये त्याचे उद्घाटन झाले.