News Flash

 यंत्रमाग

आपण ‘विव्हर्स बिम’ म्हणजे ताण्याचे सूत ज्या मोठय़ा रिळावर गुंडाळलेले असते त्याची माहिती घेतली. त्या रिळावर असलेले धागे वया आणि फणीमधून ओवून घेतलेले असतात.

| July 24, 2015 01:46 am

आपण ‘विव्हर्स बिम’ म्हणजे ताण्याचे सूत ज्या मोठय़ा रिळावर गुंडाळलेले असते त्याची माहिती घेतली. त्या रिळावर असलेले धागे वया आणि फणीमधून ओवून घेतलेले असतात. कोणते कापड विणायचे आहे, त्याची वीण कोणती आहे, ताण्याची घनता किती आहे यानुसार ओवण्याचे काम केलेले असते. ताण्याची घनता लक्षात घेऊन त्यानुसार फणीची निवड केली जाते.
– यंत्रमागावर हे बिमाचे सूत बांधून घेतल्यावर एकामागोमाग ज्या मुख्य क्रिया होतात त्या शेडिंग, पिकिंग आणि बिटिंग या नावाने ओळखल्या जातात. शेडिंगमध्ये संपूर्ण ताण्याचे दोन गटांत विभाजन केले जाते. एक गट वर जातो तर दुसरा खाली. त्यानंतर बाणा (आडवा धागा) धोटय़ाच्या साहाय्याने मागाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे टाकला जातो. याला पिकिंग म्हणतात. हा आडवा धागा फणी मागाच्या ज्या भागामध्ये बसवलेली असते, त्या भागाच्या साहाय्याने घट्ट बसवला जातो, त्यालाच बिटिंग असे म्हणतात. अशी एक फेरी पूर्ण झाल्यावर लगेच दुसरी फेरी सुरू होते. त्या वेळी पहिल्या फेरीच्या वेळी वर गेलेला ताण्याचा गट खाली जातो तर खाली गेलेला गट वर जातो आणि त्यानंतर पुन्हा बाण्याचा एक धागा मागाच्या दुसऱ्या बाजूने पहिल्या बाजूकडे धोटा पाठवून टाकला जातो. तसेच हा धागासुद्धा पूर्वीप्रमाणेच घट्ट बसवला जातो. याच कारणाने आडव्या धाग्याच्या दिशेने कापड सहजी फाडता येत नाही.
– ह्या फेऱ्यांचे चक्र असेच सुरू राहते आणि त्याचा वेग मागाच्या वेगानुसार असतो. अगदी साध्या यंत्रमागाचा वेगही सुमारे १५० फेरे प्रति मिनिट इतका असतो. त्यामुळे सर्वच कृती अचूक असावी लागते. तसेच बाण्याच्या घनतेनुसार एका मिनिटात काही से. मी. कापड तयार होते. समजा, एका से. मी.मध्ये २५ आडवे धागे असतील तर एका मिनीटाला ६ से. मी. कापड तयार होईल. हे कापड तयार होताना दोन पूरक कृती घडत असतात. त्या म्हणजे बाण्याचा धागा आवश्यक तेवढा सोडणे आणि तयार झालेले कापड रोलरवर गुंडाळत जाणे. यामध्ये नेमका समन्वय असावा लागतो. तरच माग एवढय़ा वेगाने चालून कापड तयार होत राहते. या कृती अनुक्रमे ‘लेट ऑफ’ आणि ‘टेक अप’ या नावाने ओळखल्या जातात.

–  महेश रोकडे (कोल्हापूर)
– मराठी विज्ञान परिषद,
– वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ – office@mavipamumbai.org
– संस्थानांची बखर

जसवंतसिंहांचे सुशासन

– गुजरातेतील िलबडी संस्थानाच्या इतिहासात जसवंतसिंह आणि जटाशंकर या राजांच्या कार्यकाळात राज्याचा उत्कर्ष झाला. राजा जसवंतसिंह आणि स्वामी विवेकानंद यांचा विशेष स्नेहसंबंध होता. विवेकानंद अनेक वेळा िलबडीत येऊन राहिले. दोघांमध्ये अध्यात्मावर चर्चा होत असे. जसवंतसिंह आणि विवेकानंद दोघे एकदा तीन आठवडे महाबळेश्वरास जाऊन राहिले होते. त्यावेळी वर्ल्ड रिलीजन काँग्रेसच्या अमेरिकेत होणाऱ्या अधिवेशनास विवेकानंदांनी उपस्थित राहून भारताचे प्रतिनिधित्व करावे असे प्रथमच जसवंतसिंहांनी त्यांना सुचविले.
– जसवंतसिंह आणि जटाशंकर या राजांनी िलबडीसारख्या छोटय़ा संस्थानालाही उत्तम प्रशासन देऊन इतर राजांना एक चांगला आदर्श घालून दिला. महिलांनीही सुशिक्षित व्हावे म्हणून १८५९ साली लेडी विलिंग्डन स्कूल स्थापन केले गेले. तत्पूर्वी िहदुस्थानात मुलींसाठी वेगळ्या शाळा नव्हत्या. जसवंतसिंहांनी बनारस िहदू विश्वविद्यालय आणि शांतिनिकेतनला प्रत्येकी एक एक लाख रुपयांची देणगी दिली, िलबडीत पाच फिरती वाचनालये सुरू केली. राज्याच्या प्रशासनासाठी त्यांनी ३० सदस्यांची समिती तयार केली. या समितीत १८ सदस्य नागरिकांमधून नियुक्त केले गेले तर १२ जण प्रशासकीय सेवेतील होते. जसवंतसिंहाने राज्यातील पडीक जमिनी गरीब, भूमिहीन शेतकऱ्यांना देऊन त्यांना कालवे बांधून पाणीपुरवठा योजना सुरू केली. या शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्यासाठी ‘िलबडी को-ऑप.बँक’ स्थापन केली. राज्यात साबण उत्पादन, पितळी वस्तू उत्पादन, कापसाचा व्यापार या उद्योगांना चालना देण्याचे काम या शासकांनी केले. त्यांनी राज्यात मद्य उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालून भीक मागण्यावरही बंदी केली!

सुनीत पोतनीस
– sunitpotnis@rediffmail.com


लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2015 1:46 am

Web Title: machin
Next Stories
1 कापडातील ताणा-बाणा
2 कुतूहल – विणण्याची पूर्वतयारी- कांडी भरण्याची यंत्रे
3 कुतूहल – विणण्याची पूर्वतयारी- बाण्यासाठी
Just Now!
X