20 September 2018

News Flash

मधुबालाची शोकान्तिका (२)

‘ज्वाला’ हा तिचा अखेरचा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर १९७१ साली प्रदíशत झाला.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे बालवयात चित्रपटात भूमिका करून घर सांभाळणारी मुमताज पुढे मधुबाला या नावाने हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री बनली आणि मृत्यूनंतर एक दंतकथा बनली! मधुबालाने एकूण ७० चित्रपटांमध्ये नायिकेचे काम केले. ‘महल’, ‘तराना’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस 55’, ‘चलती का नाम गाडी’, ‘मुघल-ए-आझम’, ‘बरसात की रात’, ‘बसंत’, ‘निराला’, ‘अमर’, ‘ढाके की मलमल’, ‘कालापानी’, ‘हावडा ब्रिज’, ‘हाफ टिकट’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. ‘ज्वाला’ हा तिचा अखेरचा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर १९७१ साली प्रदíशत झाला. मधुबालाने तत्कालीन बहुतेक सर्व प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर नायिकेचे काम केले पण त्यापकी दिलीपकुमार आणि देव आनंद यांच्याबरोबर ती प्रेक्षकांना अधिक भावली.

HOT DEALS
  • Samsung Galaxy J3 Pro 16GB Gold
    ₹ 7490 MRP ₹ 8800 -15%
  • Jivi Energy E12 8 GB (White)
    ₹ 2799 MRP ₹ 4899 -43%

सिनेमा सृष्टीत ती यशाच्या शिखरावर पोहोचली परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र ती दु:खीच राहिली. मधुबालाला दिलीपकुमारशी लग्न करायचे होते, त्यांचे प्रेमसंबंध सात वष्रे टिकले पण तिच्या वडिलांना दिलीपकुमार जावई म्हणून पसंत नसल्याने ते झाले नाही. विवाहासाठी मधुबालाला तिच्या आप्तांनी तीन स्थळे सुचवली. भारतभूषण, प्रदीपकुमार आणि किशोरकुमार यांची. त्यांपकी तिने किशोरकुमारला पसंत केले. लग्नानंतर किशोरकुमारने धर्मातर केले, असे म्हणतात.

मधुबालाच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीला ग्रहण लागले तिच्या आजारपणाचे. १९५४ पासून तिला मधूनमधून रक्ताच्या उलटय़ा होऊन दम लागायला लागला. १९६१ मध्ये तिच्या आजारपणाचे निदान झाले व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, म्हणजे हृदयाला छिद्र असणे. खंगत जाऊन अखेरीस २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबईत या गुणी अभिनेत्रीचे निधन झाले. भारत सरकारने मधुबालाच्या स्मरणार्थ २००८ साली तिचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. तिच्या हयातीतच ‘थिएटर आर्ट्स’ या अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठावर मधुबालाचे पूर्ण पान छायाचित्र छापून खाली लिहिले होते ‘जगातली सर्वाधिक आकर्षक अभिनेत्री- पण आश्चर्य, ती बेव्हर्ली हिलची नाही!’

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on June 8, 2018 2:05 am

Web Title: madhubala