18 March 2019

News Flash

मॅग्नेशियमचे उपयोग

मॅग्नेशियम धातू अ‍ॅल्युमिनियमपेक्षाही वजनाने हलका आहे.

चमकदार करडय़ा रंगाचा हा मॅग्नेशियम धातू अ‍ॅल्युमिनियमपेक्षाही वजनाने हलका आहे. हलका परंतु बळकट या गुणधर्मामुळे याचा अन्याच्या संमिश्र धातूंचा उपयोग विमाने, वाहने, लॅपटॉप, कॅमेरा यांच्या सुटय़ा भागांमध्ये केला जातो. मॅग्नेशियमबरोबर अ‍ॅल्युमिनियम, यिट्रियम, चांदी, जस्त इत्यादी धातू मिसळून मॅग्नेशियमचे मिश्रधातू बनविले जातात. या मिश्रधातूंची मालिका ‘इलेक्ट्रॉन’ या नावाने ओळखली जाते. ‘मॅग्नॉक्स’हा मिश्रधातू (99%Mg and 1% Al) अणु ऊर्जा केंद्रांत वापरतात. तर इलेक्ट्रॉन २१ हा मिश्रधातू वायूअवकाश (एरोस्पेस) उद्योगांत वापरतात.

हवेत उघडे ठेवले असता मॅग्नेशियमवर ऑक्साइडचा थर तयार होऊन हा थर पुढील ऑक्सिडेशन रोखतो. मॅग्नेशियम हवेत जाळले असता यातून ज्वालांसह शुभ्र झगझगीत प्रकाश बाहेर पडण्याच्या गुणधर्मामुळे याचा उपयोग शोभेच्या दारुकामासाठी केला जातो. मॅग्नेशियमला लागलेली आग पाण्याने विझत नाही. कारण त्यावर पाणी टाकले असता पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होऊन ज्वलनशील हायड्रोजन तयार होतो. नुसत्या थंड पाण्याबरोबर मॅग्नेशियमची अभिक्रिया होत नाही. मॅग्नेशियम हा चांगला उष्णता व विद्युतवाहक धातू आहे. गंजरोधक म्हणूनही मॅग्नेशियमचा उपयोग करतात.

वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनातील मॅग्नेशियम हे महत्त्वाचे मूलद्रव्य आहे. प्रकाश संश्लेषणाला आवश्यक असणाऱ्या हरितद्रव्याच्या केंद्रकात मॅग्नेशियमचा अणू असतो. प्रकाश संश्लेषणात मॅग्नेशियम हे वनस्पतींचे ऊर्जा केंद्र असते. मॅग्नेशियममुळेच वनस्पतीला प्रकाशाचा उपयोग होऊन प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया सुरू होते. मानवाच्या शरीरातील अनेक संप्रेरकांच्या कार्यात मॅग्नेशियम आवश्यक असते. शरीरातील हाडांच्या मजबुतीमध्ये कॅल्शियमसह मॅग्नेशियमचा सहभाग असतो. मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम स्रिटेट अशा संयुगांचा वापर औषधांमध्ये केला जातो. ‘मिल्क ऑफ मॅग्नेशिया’ हे मॅग्नेशियमचे संयुग (मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड) सौम्य रेचक आणि आम्लनाशक म्हणूनही वापरले जाते.

याशिवाय काच, पशुखाद्य, खते, रबर-उद्योग, सौंदर्यप्रसाधने, विद्युत् भट्टय़ा किंवा आग लागण्याची शक्यता असेल अशा ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या उष्णता-रोधक विटांमध्ये तसेच अग्निरोधक प्लास्टिक बनवण्यासाठी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा उपयोग केला जातो. स्टील आणि लोखंडाच्या उत्पादन प्रक्रियेत गंधक काढून टाकण्यासाठी मॅग्नेशियमचा वापर करतात. कापड आणि कागद-उद्योगात, ते रंगविण्याच्या कामात मॅग्नेशियम सल्फेटचा उपयोग रंगबंधक म्हणून करतात. केवळ चार ग्रॅम मॅग्नेशियम जाळले असता एक पेलाभर पाणी उकळू शकते. यामुळे सध्या पर्यायी इंधन म्हणून मॅग्नेशियमचा कसा वापर करता येईल यावर संशोधन सुरू आहे.

– डॉ. सुभगा काल्रेकर, मुंबई

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on March 8, 2018 2:27 am

Web Title: magnesium chemical element 2