22 November 2019

News Flash

चुंबकसूची फिरली!

विज्ञानाच्या इतिहासात डोकावल्यावर असे आढळते की अनेक शोध हे मानवाला अपघाताने, काहीसे अनपेक्षितपणे लागले आहेत.

विज्ञानाच्या इतिहासात डोकावल्यावर असे आढळते की अनेक शोध हे मानवाला अपघाताने, काहीसे अनपेक्षितपणे लागले आहेत. अशीच एक घटना १८२० साली डेनमार्कमध्ये घडली. या वेळेपर्यंत वीज आणि चुंबकत्व यात काही तरी संबंध असल्याची शास्त्रज्ञांना शक्यता वाटत होती. परंतु संबंध काही स्पष्ट होत नव्हता. याच काळात हॅन्स ओरस्टेड हा प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना एका व्याख्यानात विद्युतप्रवाहावरचे काही प्रयोग दाखवत होता. तारेतून विद्युतप्रवाह पाठवल्यानंतर, तार तापून त्यातून होणाऱ्या प्रकाशाच्या निर्मितीवरचे प्रयोग यात होते. जेव्हा विजेचे प्रयोग दाखवण्यासाठी तो विद्युतघटाला तारा जोडू लागला तेव्हा त्याचे लक्ष जवळच असलेल्या चुंबकसूचीकडे गेले. चुंबकसूची नेहमीसारखी दक्षिणोत्तर दिशा सोडून काहीशी वेगळ्या दिशेला फिरली होती. त्यानंतर ओरस्टेडने तारेतून जाणारा विद्युतप्रवाह बंद केल्याबरोबर चुंबकसूची परत एकदा फिरून नेहमीसारखी दक्षिणोत्तर दिशेत स्थिर झाली. याचाच अर्थ, तारेतून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहाचा चुंबकीय क्षेत्राशी काही तरी संबंध होता.

या घटनेनंतर ओरस्टेडने अनेक प्रयोग करून या निरीक्षणांचा पाठपुरावा केला. या प्रयोगांत त्याने आपला विद्युतघट वेगवेगळ्या धातूंच्या तारांना जोडला. निष्कर्ष तेच होते. तारांतून विद्युतप्रवाह जाऊ  लागल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होत होते. तारेतून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहाची दिशा बदलली तर चुंबकसूचीसुद्धा विरुद्ध दिशेने फिरत होती. याचाच अर्थ, विद्युतप्रवाहामुळे तारेभोवती निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा विद्युतप्रवाहाच्या दिशेवरून ठरत होती. विद्युतवाहक तारेपासून चुंबकसूची लांब नेल्यास तिचे फिरणेही कमी होत असल्याचे ओरस्टेडला आढळले. याचाच अर्थ, विद्युतवाहक तारेपासून जसजसे लांब जावे, तसतशी निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होत होती.

ओरस्टेडच्या या प्रयोगांवरून विद्युतप्रवाहाचा चुंबकीय परिणाम स्पष्ट झाला. सुमारे तीन महिने केलेल्या या प्रयोगांचे निष्कर्ष त्याने लॅटिन भाषेत लिहिलेल्या एका चार पानी शोधपत्रिकेद्वारे वैज्ञानिक क्षेत्रातील त्याच्या परिचितांना कळवले. ओरस्टेडच्या शोधपत्रिकेने अनेकांचे लक्ष वेधले जाऊन विद्युतप्रवाह व चुंबकत्व यासंबंधीच्या संशोधनाला मोठी चालना मिळाली. चुंबकीय क्षेत्र हे केवळ चुंबकाच्या मदतीने नव्हे तर विद्युतप्रवाहामुळेसुद्धा निर्माण करता येते हे स्पष्ट झाले. ओरस्टेडच्या या संशोधनाचा विस्तार इतका मोठा झाला, की कालांतराने भौतिकशास्त्रात ‘विद्युतचुंबकत्व’ या नव्या शाखेचा जन्म झाला.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on June 13, 2019 2:02 am

Web Title: magnet catalogs
Just Now!
X