नेहमी काहीतरी नवीन करण्यासाठी धडपडणारा बिऑन लखनौतील व्यापारात रमला नाही. त्याचा फ्रेंच मित्र अरमाँड डी लेव्हासोल्ट याची ग्वाल्हेरचे राजे महादजी शिंदे यांच्याशी चांगली ओळख होती. त्याच्या शिफारसीमुळे महादजींनी बिऑनला, प्रथम आपल्या लहान दोन सन्य तुकडय़ांना युरोपियन पद्धतीने अद्ययावत करायची जबाबदारी दिली. ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडल्यामुळे महादजींनी बिऑनला आग्रा येथे तोफा बनवण्यासाठी फाऊंड्री सुरू करून सात हजार सनिकांच्या दोन बटालियन्स नव्याने तयार करून त्या सनिकांना युरोपियन पद्धतीने शस्त्रास्त्रे वापरण्याचे शिक्षण देण्याची कामगिरी दिली. महादजींच्या अपेक्षेपेक्षा बिऑनने ही कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडल्यामुळे ग्वाल्हेर दरबारात डी बिऑन एक प्रभावशाली सेनानी म्हणून ओळखला जाऊ लागला.

बिऑनने तयार केलेल्या प्रबळ सेनेची पहिली लढत झाली १७८३ मधील बुंदेलखंडातील किलजर हा किल्ला घेताना राजपुतांशी. किलजर घेतल्यानंतर पुढे राजपूत, राठोड, मोगल यांच्याशी महादजींच्या लष्कराच्या लढती १७८७ मध्ये लालसोट येथे, १७८८ मध्ये चकसाना येथे आणि आग्रा येथे लढल्या गेल्या. या सर्व लढायांमध्ये बिऑनच्या नेतृत्वामुळे महादजींना विजय मिळाल्यामुळे त्यांनी बिऑनला कमांडर इन चीफ या पदावर बढती दिली. १७९० च्या पाटण आणि मेरठच्या विजयांपाठोपाठ बिऑनने १७९३ च्या लाखैरी लढाईत विजय मिळवून देऊन ग्वाल्हेरचे लष्कर हे देशातले सर्वाधिक प्रबळ लष्कर असल्याचे सिद्ध केले.

या कर्तबगारीमुळे ग्वाल्हेर राज्यात महादजींनंतर महत्त्वाचे अधिकार असणाऱ्या बिऑनला महादजींनी उत्तर प्रदेशातल्या सुपीक खोऱ्याचा काही प्रदेश जहागिरीत दिला. या जहागिरीत मेरठ आणि अलीगढ ही शहरेही अंतर्भूत होती. डी बिऑनच्या फौजेत पायदळाच्या नऊ बटालियन्स, ३०००चे घोडदळ, सुतार, लोहार, इतर कामाचा नोकरवर्ग, ५० ब्राँझच्या तोफा आणि विशेष म्हणजे जखमी सनिकांवर औषधोपचार करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स पथकाचीही व्यवस्था होती. महादजी िशदेंच्या निधनानंतरही त्यांचा वारस दौलतराव शिंदे याला बिऑन निष्ठावंत राहिला. परंतु बिऑनची तब्येत पुढे खराब झाल्यामुळे आपला राजीनामा देऊन तो  फ्रान्सच्या आपल्या गावी स्थायिक झाला. तिथेच १८३० साली  बिऑनचा मृत्यू झाला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com