विविध कलाकारांना राजाश्रय देऊन महाराजा सयाजीरावांनी बडोद्यातील आपल्या लक्ष्मीविलास पॅलेसच्या दरबार हॉलमध्ये चित्रप्रदर्शने, शिल्प प्रदर्शने, गायन-संगीताचे जलसे भरविले. मराठी नाटक मंडळींना ते वर्षांसन देऊन नाटकांचे प्रयोग बडोद्यात करीत. बालगंधर्वानी आपली स्वतंत्र नाटक कंपनी काढली तेव्हा महाराजांनी त्यांच्या गंधर्व नाटक कंपनीला ५,००० रुपये वर्षांसन सुरू केले. नाटकाच्या जाहिरातींवर व तिकिटांवरही महाराजांच्या आश्रयाचा उल्लेख केला जाई. १९१९ साली गंधर्व कंपनीने ‘एकच प्याला’ या नाटकाचा पहिला प्रयोग सयाजीरावांच्या उपस्थितीत सादर केला. या नाटकातील सिंधूची भूमिका बालगंधर्वानी तर सुधाकरची भूमिका गणपतराव बोडसांनी साकारली होती. महाराज या दोघांच्या अभिनयावर इतके खूश झाले की, नाटक मंडळीला त्यांनी वर्षांसनाशिवाय एक हजार रुपये वाढवून दिले. ‘एकच प्याला’चे लेखक गडकरी या प्रयोगाच्या वेळी आजारी होते. इतर नाटक कंपन्यांचेही प्रयोग बडोद्यात नेहमी होत. सयाजीरावांच्या पत्नी चिमणाबाईही नाटय़ कलावंतांना उत्तेजन देत. बालगंधर्वाना त्या आपली शाही वस्त्रे आणि अलंकारही नाटय़प्रयोगासाठी देत. ऐतिहासिक नाटकांमधील पात्रांचा पोशाख, अलंकार, नाटकांचे सेट्स कसे असावेत याविषयी सयाजीराव नाटय़निर्माते, दिग्दर्शकांना सूचना देत असत. तशा प्रकारची वेशभूषा, बठकीची व्यवस्था असलेल्या म्हैसूर, ग्वाल्हेर, इंदूर इत्यादी ठिकाणी अवलोकन करण्यासाठीही नाटय़निर्मात्यांना महाराजांनी पाठविले. सयाजीराव स्वत: उच्च दर्जाचे जाणते प्रेक्षक असल्याने अनेक नाटककारांनी त्यांच्या सूचना स्वीकारून तसे बदल केले. कलाभिरुची असलेल्या महाराजा सयाजीरावांनी कलेच्या क्षेत्रात बडोद्याला अग्रकम मिळवून दिल्यामुळे पुढच्या काळातही कलाकार, कारागीर बडोद्याला आपले माहेरघर समजत आले आहेत.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल: तीव्र स्वच्छक (इंटेन्सिव्ह क्लीनर्स)
िपजण विभागातील शेवटचे स्वच्छक यंत्र म्हणजे तीव्र स्वच्छक यंत्र. या यंत्रामध्ये भरवणी रूळ व पाटीची  किंवा रूळ व पट्टय़ाची भरवणी यंत्रणा वापरलेली असते. या यंत्रणेमुळे आघातकाची क्रिया अधिक सक्षमपणे केली जाते. तीव्र स्वच्छक यंत्रात वापरण्यात येणारे आघातक हे वजनाने अधिक असून त्यावरील आघात करणारे घटक हे अधिक धारदार असून त्यांची संख्याही अधिक असते. या सर्वामुळे या यंत्रामध्ये कापूस खूपच मोठय़ा प्रमाणावर सुटा केला जाऊन कापसाचे अगदी लहान लहान असे पुंजके केले जातात. कापूस मोठय़ा प्रमाणावर सुटा झाल्यामुळे कापसामध्ये अडकलेला कचरा कापसापासून वेगळा होतो आणि आघातकाच्या खाली परिघाभोवती बसविलेल्या दांडय़ाच्या जाळीमधून खाली पडतो. कापसामधील ६० ते ८०% कचरा बाजूला काढला जातो. पूर्वीच्या काळी दोन किंवा तीन तीव्र स्वच्छक यंत्रे वापरली जात असत. आधुनिक िपजण यंत्रणेत एकच तीव्र स्वच्छक वापरला जातो.
वििपजणसाठी भरवणी (कार्ड फीड) : तीव्र स्वच्छक कापूस पुरेसा स्वच्छ व मोकळा झालेला असतो. िपजण विभागामधून वििपजण यंत्राला भरवण्यासाठी तो आता पाठविला जातो. यासाठी दोन पद्धती प्रचलित आहेत.
जुनी पद्धत :  या पद्धतीमध्ये पुढील यंत्राला पाठविला जाणारा कापूस हा कापसाच्या गादीच्या गुंडाळीच्या स्वरूपात असे. सुमारे ४० मी. लांबीच्या लॅप तयार केल्या जात असत आणि कामगाराकरवी या लॅप वििपजण यंत्रास भरविल्या जात असत.
आधुनिक पद्धत : आधुनिक िपजण विभागात शेवटच्या तीव्र स्वच्छकामधून बाहेर पडणारा कापूस नळ्याच्या साहाय्याने सलगपणे वििपजण यंत्रास थेट पुरविला जातो. िपजण विभागात आतापर्यंत आपण पाहिलेल्या यंत्रांशिवाय आणखी काही यंत्रे वापरण्यात येतात ती पुढीलप्रमाणे :
भेसळ स्वच्छक : काही वेळा कापसामध्ये कापसाच्या तंतूंशिवाय इतर तंतू मिसळले जातात. उदा. केस, तागाचे तंतू, पॉली प्रॉपिलिन, इ. या तंतूंमुळे सुताचा दर्जा निकृष्ट होतो. अशा तंतूंना भेसळ असे म्हणतात. भेसळ स्वच्छक यंत्रामध्ये कापसाच्या तंतूंशिवाय येणारे हे सर्व तंतू कापसापासून वेगळे करून बाजूला काढण्यात येतात.
निर्धूलीकारक यंत्र : कापसाबरोबर नेहमी अगदी सूक्ष्म अशी धूळ येते. कापसामधील कचरा काढून टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दांडय़ाची जाळी ही सूक्ष्म धूळ काढून टाकू शकत नाही. यासाठी खास बनविलेली निर्धूलीकारक यंत्रे वापरण्यात येतात.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org