04 June 2020

News Flash

कुतूहल – महेश्वरी साडी

इंदूर येथे होळकरांचे राज्य होते आणि त्या घराण्यातील अहिल्याबाई होळकर या प्रजेची खास काळजी वाहणाऱ्या म्हणून सर्वाना ज्ञात आहेत.

| August 25, 2015 03:46 am

इंदूर येथे होळकरांचे राज्य होते आणि त्या घराण्यातील अहिल्याबाई होळकर या प्रजेची खास काळजी वाहणाऱ्या म्हणून सर्वाना ज्ञात आहेत. संस्थानातील स्त्रियांना साडय़ांसाठी दूरवरच्या गावांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे त्यांची अडचण होते. हे लक्षात घेऊन इंदूर परिसरात साडीनिर्मितीला उत्तेजन द्यायचे अहिल्याबाईंनी ठरवले. त्यासाठी पठणपासून सुरतपर्यंत राहणाऱ्या विणकरांना सवलती देऊन महेश्वरला बोलावले. त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा महेश्वरला उपलब्ध करून दिल्या. तिथे महेश्वरला साडी उत्पादन सरू झाले ती साडी म्हणजे महेश्वरी साडी.
महेश्वरी साडी संपूर्ण सुती साडी असते किंवा सुती ताणा (उभे धागे) आणि रेशमी बाणा (आडवे धागे) अशा पद्धतीने ही विणली जाते. महेश्वरी साडीचे काठपदर रंगीत पण इतर साडय़ांपेक्षा अरुंद असतात. त्यावर जरीकाम करून चौकडी किंवा उभे/आडवे पट्टे यांचे डिझाइन विणले जाते. पदर नेहमी गडद रंगांचा असतो. पूर्वी राजघराण्यापुरती वापरली जाणारी साडी आता देशात-परदेशात दूरवर वापरली जाते. पूर्ण रेशमी धाग्यांनी विणलेल्या महेश्वरी साडीला एक देखणी झळाळी असते आणि ती टिकायलापण मजबूत असते. आता कृत्रिम रेशमाचा वापर करूनही महेश्वरी साडय़ा विणल्या जातात, त्याची किंमत कमी व्हावी या उद्देशाने.
महेश्वरी साडी एकरंगी असते तशीच चौकडी किंवा पट्टे यांचे डिझाइन वापरून विणलेली पण असते. रंगसंगती मात्र एकमेकांना साजेल अशीच ठेवतात. ‘बुगडी महेश्वरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साडीची किनार
उलट-सुलट अशी कशीही वापरता येते. किनारीला पाना-फुलांची नक्षी असते. महेश्वरी साडय़ात चटई, हिरा, चमेलीचे फूल या डिझाइनना सध्या जास्त मागणी आहे.
किनारीसाठी खऱ्या जरीचा वापर हे महेश्वरी साडीचे आणखी एक वैशिष्टय़ होय. त्यामुळे महेश्वरीला वेगळा तजेलदारपणा येतो.
पूर्वी नैसर्गिक रंगांचाच वापर होत होता तोपर्यंत लाल, हिरवा, तपकिरी, पिवळसर असे ठरावीक रंग असत. आता रसायनयुक्त रंगांमुळे रंगांमध्ये बरीच विविधता आली आहे. त्यामुळे मागणीही वाढली आहे.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जयपूर  राज्यस्थापना
सध्याच्या राजस्थान राज्याची राजधानी असलेले जयपूर शहर हे ब्रिटिश भारतातील ‘राजपुताना स्टेट्स एजन्सी’मधील एक महत्त्वाचे संस्थान होते. कछवा राजपूत घराण्याच्या वंशजाने बाराव्या शतकात स्थापन केलेले हे राज्य निरनिराळ्या काळात कछवा राज, धुंधार राज, अंबर राज आणि जयपूर राज या नावाने ओळखले गेले.
दुल्हे राय किंवा दुल्हा राव या राजपुताने स्थानिक कछवा राजपुतांच्या मदतीने धुंधार येथे ११२८ साली हे राज्य स्थापन केले. राज्यकर्त्यांनी पुढे जयपुरा हे राजधानीचे नवीन गाव १७२७ साली वसविल्यावर हे राज्य जयपूर नावाने ओळखले जाऊ लागले. चौदाव्या शतकापासून इ.स.१७२७ पर्यंत राज्याची राजधानी अंबर येथे होती. १५६१ साली अंबरच्या राजा भारमेळ कछवाने आपल्या भाऊबंदकीच्या प्रकरणात बादशाह अकबराकडून मदत घेतली. त्या बदल्यात त्याची मुलगी अकबराला देऊन ठरावीक रक्कम खंडणीच्या स्वरूपात देण्याचे मान्य केले. अंबर राज्यावर अकबराने पुढे मोगल सुभेदार नेमला व भारमेळ मोगलांचा सरंजामदार बनला. मोगल बादशाहाला किंवा त्यांच्या घराण्यातल्या लोकांना आपल्या मुली देऊन मोगल दरबारात सरदारकी आणि त्यांचा वरदहस्त मिळविण्याची प्रथा राजपुतांमध्ये येथूनच सुरू झाली.
अंबर राजाने मोगलांना भगवंत दास, मानसिंह प्रथमसारखे अनेक सेनानी दिले. मानसिंह प्रथम आणि जयसिंह प्रथम यांचा शाहजहान आणि औरंगजेबाच्या अनेक युद्धांमध्ये आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये सहभाग होता. जयपूर राजा सवाई जगतसिंह याने १८१८ साली केलेल्या करारान्वये जयपूरचे राज्य ब्रिटिशांच्या अंकित होऊन त्यांनी ब्रिटिशांची तनाती फौज राखली.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2015 3:46 am

Web Title: maheshwari saree
टॅग Navneet
Next Stories
1 जोधपूर राज्य प्रशासन
2 चंदेरी साडी
3 कुतूहल – पोचमपल्ली
Just Now!
X