‘मय्या का हर’ म्हणजेच देवीचा हार या ठिकाणी पडला अशी श्रद्धा आहे, म्हणून या स्थानाचे नाव महर असे झाले. जबलपूरहून उत्तरेस शंभर किलोमीटरवर असलेल्या महर येथे भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात कछवा राजपूत राज्यकर्त्यांचे संस्थान होते. येथील १२०० पायऱ्या असलेल्या एका उंच टेकडीवर असलेले देवीचे मंदिर हे प्रति वैष्णोदेवी मंदिर म्हणून महत्त्वाचे समजले जाते. या मंदिरामुळे महरची प्रसिद्धी अधिक आहे.
 सतराव्या शतकात कछवा राजपुतांचे एक कुटुंब भीमसिंग याच्या नेतृत्वाखाली अलवार येथून महर गावी स्थलांतरित झाले. भीमसिंगचा नातू बेनीसिंह हा ओर्छा येथील राजा िहदुपत याचा एक विश्वासू मंत्री होता. बेनीसिंहला िहदुपतने महर तहसील इनाम दिला आणि १७७८ साली बेनीसिंहने तेथे आपले राज्य स्थापन केले. बांदा राज्याचा शासक नवाब अलीबहादूर याने महरच्या अनेक गावांवर कबजा केल्यामुळे दुर्जनसिंह या महर राजाने १८१४ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी करार करून त्यांची तनाती फौज राखली. ब्रिटिशांनी महर आणि इतर दहा राज्ये पुढे बुंदेलखंड एजन्सीत वर्ग केली. १०५४ चौ.कि.मी. क्षेत्र व्यापलेल्या महर राज्यात २१० खेडी अंतर्भूत होती. १९०१ च्या खानेसुमारीमध्ये महरची लोकसंख्या ६३००० होती.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महरचा मोठा सहभाग होता. हिरालाल सराफ आणि लालाराम वाजपेयींच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा साखळी सत्याग्रहांचे आयोजन करण्यात आले. ‘झंडा सत्याग्रह’ या नावाने हे आंदोलन प्रसिद्ध होते. १९३१-३२ साली बद्रिप्रसाद दुबे हे गोंड आणि अहीर आदिवासी नेते यांना ब्रिटिशांकडून तुरुंगात अमानुषपणे वागणूक मिळाली. त्यामुळे त्यांनी इतर राजकीय कैद्यांबरोबर तुरुंगातच हे झेंडा सत्याग्रह सुरू केले. ब्रिटिशांनी नऊ तोफ सलामींचा बहुमान दिलेले महर संस्थान १ एप्रिल १९५० रोजी स्वतंत्र भारतात विलीन झाले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – वस्त्रोद्योगात वापरले जाणारे तंतू  
nav02आज जगभर जो कापूस वापरला जातो तो शेतांमध्ये मशागत करून उत्पादित केला जातो. म्हणून अशा कापसाला मशागती कापूस किंवा व्यापारी कापूस असे म्हणता येईल. आज वापरण्यात येणाऱ्या मशागती कापसाचा विकास हा कापसाच्या जंगली अथवा रानटी जातींपासून झाला आहे. जगात अतिप्राचीन काळापासून कापसाच्या साधारणपणे अर्धा डझन जाती प्रचलित असून या जाती आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांच्या उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात आढळतात. जवळजवळ वर्षभर कोरडय़ा राहणाऱ्या नद्या व नाले यांच्या काठावर तसेच कोरडय़ा पात्रात या जातींची झाडे उगवत असत. काही जाती अतिशय कडक दुष्काळ असणाऱ्या भागात दगडी किंवा वालुकामय प्रदेशात तसेच कोरडय़ा डोंगर पठारावर आढळून येतात. मशागती कापसाच्या विकासापूर्वी कुणी तरी या जंगली जातीच्या कापसाचे अवलोकन केले असेल आणि त्यावरील तंतूंच्या थराचा उपयोग लक्षात आल्यामुळे अशी झाडे घराच्या परिसरात आणून लावली असतील आणि त्यांना पाणी, खते देऊन त्यांची मशागत केली असेल व अशा रीतीने मशागती कापसाचा विकास झाला.
जंगली कापसापासून जरी मशागती कापूस विकसित झाला असला तरी जंगली कापूस जशाचा तसा सूत बनविण्यास योग्य असत नाही. कारण एक तर जंगली कापसाच्या तंतूची लांबी खूपच कमी असते तसेच या झाडांच्या बियांवरील तंतूचा थर अतिशय विरळ असतो. त्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पादन अत्यंत कमी असल्यामुळे ते आíथकदृष्टय़ा किफायतशीर ठरत नाही. तांत्रिकदृष्टय़ासुद्धा जंगली कापसाच्या तंतूंमध्ये कमतरता आहे. सामान्यत: मशागती कापसाच्या तंतूची रचना पाहिल्यास, हा तंतू वृत्तचितीच्या आकाराचा असतो व या वृत्तचितीच्या मध्यभागी एक पोकळ नलिका असते. कापसाचे तंतू झाडावरती, बोंडाच्या आतमध्ये असताना, प्रथम ओले असतात व बोंड फुटून तंतू बाहेर पडल्यावर त्यांची सुकण्याची प्रक्रिया सुरू होते.
मशागती कापसामध्ये तंतूच्या मध्यभागी असलेल्या पोकळ नलिकेमुळे तंतूची वाळण्याची प्रक्रिया सुरू असताना तंतूना पीळ पडतो व त्यामुळे कापसाचे तंतू हे चपटय़ा पीळ दिलेल्या नळीप्रमाणे दिसतात. या रचनेमुळे मशागती कापसाचा पृष्ठभाग हा काहीसा खडबडीत होतो व त्यामुळे सूतकताई करताना तंतू एकमेकांजवळ राहतात व सुतास चांगली ताकद देतात.
– चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org