दुष्काळ म्हटल्यावर डोक्यावर हंडे घेऊन वणवण फिरणाऱ्या स्त्रिया, जमिनीला पडलेल्या मोठय़ा भेगा, खोल गेलेल्या विहिरी असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. आपला देश कृषीप्रधान आहे, म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांना मौसमी पावसावर अवलंबून राहावं लागतं. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा माणूस बरंच काही शिकत असतो. बुलढाणा जिल्हातील ज्ञानेश्वर गायकवाड या एका यशस्वी शेतकऱ्याची ही कथा.
बुलढाणा हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा. गायकवाड कुटुंबाची गिराडा येथे ४० एकर जमीन आहे. या जमिनीत कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही नेहमीचीच पिकं त्यांच्या शेतात घेतली जायची. दिवसेंदिवस उत्पादनात आणि बाजारभावात होणारी घट ज्ञानेश्वर गायकवाड यांना त्रासदायक ठरत होती. मनात काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती.
आकर्षक रंग आणि सुबक दाण्याची रचना असलेले डाळिंब हे फळ आपल्याला भुरळ पाडतं. पण गायकवाड यांना हे फळ बघून डाळिंबाची शेती करण्याची कल्पना सुचली. त्या दृष्टीने विचार चालू झाले. ते डाळिंब उत्पादनासंबंधीच्या कार्यशाळांमध्ये सहभागी झाले. त्यांनी डाळिंबाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. डाळिंबाच्या शेतीसाठी पसा आणि कष्ट यांची जोड असायला पाहिजे, असा सल्ला त्यांना रमाकांत पवार या अनुभवी शेतकऱ्याकडून मिळाला. कष्ट करण्याची तयारी तर होतीच. पशाची थोडीशी अडचण होती. इच्छा तिथं मार्ग सापडतोच असं म्हणतात. गायकवाड यांची पशाची सोय झाली. त्यांच्या शेतात पाच विहिरी आहेत. यांपकी कोणत्याच विहिरीला पुरेसं पाणी नव्हतं. चार दिवसांनी तीन विहिरीत ठिबक संचातून आणि शेजारच्या शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवला. शेताला आकाशझेप असं साजेसं नाव दिलं.   
१२७८ झाडांची प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. शेतातील बागेला पाणी देणं, बागेची राखण यासाठी घरातील व्यक्तींची, मित्र-परिवाराची खूप मदत झाली. तीन एकरांत २५० ते ३०० ग्रॅम वजनाच्या २१ टन दर्जेदार डािळबांचं उत्पादन मिळवण्यात गायकवाड यशस्वी झाले. त्यातून तीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळालं!
-सुचेता भिडे (कर्जत) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..- मराठी भाषा आणि वैद्यकीय विज्ञान
वैद्यकीय विज्ञानात एवढी सारी प्रगती झाल्यामुळे किंवा नव्या नव्या संकल्पना पुढे आल्यामुळे ते मराठीत शिकवणे किंवा शिकणे शक्य आहे की कसे ही गोष्ट तूर्तास बाजूला ठेवू. प्रगत देशामधली सुशिक्षित जनतासुद्धा नव्या वैद्यकीय कल्पना कवेत घेऊ शकेल की नाही याबद्दल मला शंका आहे.
परंतु आपल्यात आणि प्रगत देशांमधल्या विद्यार्थ्यांमधला एक महत्त्वाचा फरक असा की तिथले वैद्यकीय विद्यार्थी बारावी नव्हे तर पंधरावी झालेले असतात आणि अगदी निरनिराळ्या विषयांमधले पदवीधर असतात. त्यामुळे त्यांची आकलनशक्ती जास्त परिपक्व असते.
आपल्याकडे खासगी शिकवण्या घोकंपट्टी यावर जास्त भर आहे. लोकमानसात मात्र वैद्यकीय माहिती मातृभाषेतूनच सांगावी हे स्पष्ट आहे. आपली माणसे इंग्रजी माध्यमातून शिकली तरी अनेक वर्षे घरात मराठीच बोलणार आहेत (बहुसंख्य) म्हणून त्वचारोपण या विषयावर मी काय सांगतो याचा एक उतारा बघा.
‘त्वचेत बहित्र्वचा आणि अंतत्र्वचा असे भाग असतात. बहित्र्वचा जवळजवळ निर्जीव असते. अंघोळ केल्यावर ती पडते मग परत पुटासारखी जमते. अंतत्र्वचा हे एक इंद्रिय आहे, त्यात घामाच्या, तेलाच्या, केसाच्या ग्रंथी असतात. लवचिक धाग्यांचा स्तर असतो. रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू असतात आणि त्वचेमध्येच पुनर्निर्माण करण्याची शक्ती असते ती सर्व स्तरांमध्ये असते. थोडीशी त्वचा मेली तर त्वचा ती त्वचा भरून काढते. जास्त त्वचा मेली तर मात्र व्रण तयार होतो, त्यात लवचिकता नसते. रक्तवाहिन्या नगण्य असतात. या व्रणाला लागले तर जखम होते, तेव्हा ती भरून काढण्याची क्षमता व्रणात नसते, व्रण आखडतो आणि सांध्यावर असेल तर सांधा आखडतो. इथे व्रण काढून त्वचारोपण करावे लागते. त्या क्रियेत (अंतत्र्वचेचा) अर्धाच भाग (जाड) सोलून काढतात आणि व्रण काढून सांधा सरळ करून जी जखम होईल त्यावर लावतात. ही त्वचा पहिले आठ तास जखमेतल्या पाण्यावर जगते. नंतरच्या अठ्ठेचाळीस तासांत जखमेतल्या रक्तवाहिन्या नव्या त्वचेत प्रवेश करतात आणि तडफड करणारी ती त्वचा नव्या रक्तप्रवाहाने जिवंत होते आणि नव्या रोपटय़ाला कशी काडी लावतात त्याप्रमाणे हालचाल होऊ दिली नाही तर चार आठवडय़ांत नव्या घरात सुखाने नांदू लागते. दुसऱ्याची त्वचा चालत नाही. कारण शरीर ही त्वचा परकीय आहे. हे लगेचच ओळखते. जिथून त्वचा काढली जाते तिथला फक्त पन्नास टक्केच जाड भाग दुसरीकडे जातो. त्यामुळे ती जखम बरी व्हायला दहा-बारा दिवस लागतात आणि तो भागही मग सुखात राहतो’ अशा तऱ्हेने सलग माहिती आकृती काढून दाखवली तर निरक्षर बायाबापडय़ाही आनंदाने मान हलवतात.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – सांसर्गिक रोग : आयुर्वेदीय उपचार- भाग २
१) उवा-लिखा- केसात, डोळ्यांच्या पापण्या, भुवयांनाही त्रस्त करू शकतात. अशा रुग्णाने किमान एक दिवस एकटे राहावे. स्वच्छ आंघोळ करताना शिकेकाई, रिठा यांचा मुक्त वापर करावा. झोपताना केसांत करंजकर्पूरतेल खसखसून लावावे.
२) कीटकदंश- आपल्या आसपास मुंग्या, माशा, डास, झुरळे व क्वचित उंदरांचाही सामना केव्हातरी करायला लागतो. त्याकरिता लांब बाह्य़ांचे कपडे यांची मदत आपण घेत असतोच. दंश किरकोळ असल्यास खाजेकरिता संगजीरेपूड, आगीकरिता खोबरेल तेल, तूप, लोणी हे उपाय पुरेसे असतात. खाज खूपच असल्यास एक दिवस आळणी जेवावे. लघुसूतशेखर, लघुमालिनी वसंत  गोळ्या घ्याव्यात. खाजेच्या भागाला तूप-मिरेपूड मिश्रण वा एलादितेल लावावे. कीटकदंशामुळे शरीराचा खूपच दाह होत असल्यास प्रवाळ, कामदुधा, मौक्तिकभस्म यांची मदत घ्यावी. खाज व आग दोन्ही खूपच पिडत असल्यास त्रिफळाचूर्ण रात्रौ घ्यावे.
३) कावीळ- काविळीच्या विविध प्रकारातील संसर्गजन्य   रुग्णांच्या कारणांचा मागोवा घेणे थोडे अवघड असते. संसर्गजन्य काविळीकरिता नित्य, स्वच्छ धुतलेले कपडे, कटाक्षाने उकळलेले पाणी, शक्य झाल्यास फक्त गायीच्या दुधाचा आहाराकरिता वापर, कोरफडीचा गर, मनुका, लाह्य़ा यांची मदत न कंटाळता घ्यावी. आरोग्यवर्धिनी, कुमारीआसव, त्रिफळाचूर्ण लक्षणांनुरूप वापरावे.
४) कोड- अजिबात संसर्गजन्य नाही याचे भान घरातील व आसपासच्या मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी ठेवण्याची गरज आहे.
५) कंड-खाज- हा विकार मुंबईसारख्या शहरात दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येला खूपखूप त्रस्त करून सोडत आहे.  कीटक, सूक्ष्मजंतू तसेच सततचा पंखा किंवा ‘एसीचा’ वापर यामुळे तसेच बाधिताचे टॉवेल, पंच्यासारखे इ.  इतर कुटुंबीयांनी वापरले की रोग पसरतो. रोग झाला की  कटाक्षाने टॉवेल, पंचा स्वत:पुरते स्वतंत्र वापरावे; रोज नव्याने उकळावा. साबण टाळावा, चण्याचे पीठ, दूध, हेमांगीचूर्ण आंघोळीकरिता वापरावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – २६ डिसेंबर
१९१४ > कवी आणि जागतिक कीर्तीचे समाजसेवक  बाबा आमटे यांचा जन्म. कुष्ठरुग्णांसाठी ‘आनंदवन’ स्थापण्यासोबत, त्यांनी इंग्रजीतून कविता लिहिल्या होत्या.   ज्वाला आणि फुले हा दीर्घ काव्यसंग्रह, उज्ज्वल उद्यासाठी, करुणेचा कलाम ही त्यांची मराठी पुस्तके.
१९१७> मराठीतील उत्तमोत्तम गद्य व काव्याचा परिचय हिंदीत अनुवाद  व समीक्षेद्वारे करून देणारे प्रभाकर बळवंत माचवे यांचा जन्म. ‘हिंदी व मराठी के निर्गुण काम का अध्ययन’हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता.  
१९३८>  समीक्षक, वाङ्मयेतिहासाचे अभ्यासक दत्तात्रय दिनकर पुंडे यांचा जन्म. कुसुमाग्रज शिरवाडकर : एक शोध वाङ्मयीन निरीक्षणे, मंथन एक वैचारिक आलेख, निबंध कसा लिहावा, भारताचा सांस्कृतिक वारसा आणि स्वामी विवेकानंद, सुलभ भाषा विज्ञान, कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचा उगम आणि विकास, वाङ्मयीन अवलोकन   आदी पुस्तके त्यांनी लिहिली. तसेच अक्षरदिवाळी, महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार, वाङ्मयीन वाद, वाङ्मयाचे अध्यापन, साहित्यविचार, आजचे नाटककार, संभाजी नगरातील साहित्यविचार आदी पुस्तकांच्या संपादनातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.
– संजय वझरेकर