19 October 2019

News Flash

मलेरियावरची लस

मलेरिया (हिवताप) हा अविकसित देशांतला एक घातक रोग गणला गेला आहे.

मलेरिया (हिवताप) हा अविकसित देशांतला एक घातक रोग गणला गेला आहे. या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सजीवांचा शोध चार्ल्स लावेरान या अल्जेरियास्थित फ्रेंच लष्करी अधिकाऱ्याला लागला. मलेरियाच्या रुग्णांच्या प्लिहेत दिसणारे विशिष्ट रंगाचे ठिपके, रुग्णांच्या रक्तपेशींतही दिसत असल्याचे त्याला आढळले. या ठिपक्यांची वाढ व त्याबरोबरच वाढणारा मलेरियाचा तापही त्याच्या लक्षात आला. यावरून काही एकपेशीय सजीव मलेरियाला कारणीभूत ठरत असल्याचे त्याने १८८० साली दाखवून दिले. हे एकपेशीय सजीव परजीवी (पॅरॅसाइट) असून, अ‍ॅनोफेलिस या प्रजातीच्या डासांची मादी ही या परजीवींची वाहक असल्याचे अल्पकाळातच स्पष्ट झाले. या परजीवींना प्लाझमोडियम या नावे ओळखले जाते.

मलेरिया काबूत आणण्यासाठी त्यावर परिणामकारक लस निर्माण करण्याची गरज आहे. प्लाझमोडियमच्या गुंतागुंतीच्या जीवनचक्रातील नेमक्या कुठल्या अवस्थेसाठी लस तयार करायची हा संशोधनाचा विषय आहे. यासाठीची एक महत्त्वाची अवस्था म्हणजे बीजसदृश बिजाणूज अवस्था (स्पोरोझॉइट). डासांच्या शरीरात निर्माण झालेले प्लाझमोडियमचे बिजाणूज हे त्यांच्या लाळेद्वारे माणसाच्या शरीरात टोचले जाऊन माणसाला मलेरियाची लागण होते. बिजाणूजपासून लस तयार करण्याची कल्पना १९६७ साली ऑस्ट्रियन-ब्राझिलियन संशोधिका रूथ नुझेनझ्वाइग या संशोधिकेने उचलून धरली होती. इ.स. २००२ साली अमेरिकन संशोधक स्टीफन हॉफमन याने गामा किरणांचा वापर करून अ‍ॅनोफेलिस डासाच्या मादीच्या शरीरातील बिजाणूजची रोगकारकशक्ती क्षीण करून त्यापासून लस तयार केली. ही लस टोचलेले उंदीर रोगप्रतिकारक्षम असल्याचे निदर्शनात आले; परंतु ही पद्धत प्रत्यक्ष वापराच्या वेळी अयशस्वी ठरली.

परजीवी प्लाझमोडियम हे, डासाने चावा घेतल्यानंतर साधारण एका तासाच्या आतच यकृताच्या पेशींमध्ये शिरतात. ही नेमकी वेळ साधली तर या परजीवीला नष्ट करून प्रतिकारकशक्ती प्राप्त करता येते. या प्रकारातली ‘आरटीएस, एस’ ही लस निर्माण केली गेली आहे. या लसीच्या छोटय़ा प्रमाणावरील वापराची शिफारस २०१६ साली जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतरीत्या स्वीकारली असून, त्यानुसार आफ्रिकेतील देशांत या लसीचा प्रत्यक्ष वापरही सुरू झाला आहे. यकृतात निर्माण झालेल्या मलेरियाच्या पेशी लाल रक्तपेशींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचे प्रजनन थांबवण्यासाठीही एक लस तयार केली गेली आहे. ही लस मात्र अद्याप चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आहे.

– डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on May 13, 2019 12:04 am

Web Title: malaria vaccine