News Flash

नवदेशांचा उदयास्त : स्वयंशासित मालदीवज्

ब्रिटिशांच्या संपर्कामुळे मालदीवी जनतेच्या जीवनशैलीत, शिक्षण पद्धतीत थोडाफार युरोपीय पद्धतीचा बदल झाला.

नवदेशांचा उदयास्त : स्वयंशासित मालदीवज्
मुहम्मद अमीन डिडी

सन १८८७ मध्ये ब्रिटिशांनी मालदीवज्च्या सुलतानाशी त्याच्या सल्तनतीच्या संरक्षण व परराष्ट्र व्यवहाराची जबाबदारी घेण्याचा करार केला. ब्रिटिशांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा निवासी गव्हर्नर जनरल, राजधानी मालेत राहात असे. या कराराची अंमलबजावणी सन १९६५ पर्यंत चालू राहिली. या काळात सुलतानाचे वारस मालदीवज्चे सत्ताधारी होते, परंतु कारभाराची सर्व सूत्रे व महत्त्वाचे निर्णय सुलतानाचा मुख्यमंत्रीच घेत असे. बऱ्याच वेळा हा मुख्यमंत्री ब्रिटिश गव्हर्नर जनरलचा सल्ला घेई. सुलतान हा केवळ नामधारी राज्यकर्ता. ब्रिटिशांचे काही अधिकारी, इतर नोकरवर्ग व काही सैनिक अशी शेसव्वाशे कुटुंबांची ब्रिटिश वस्ती मालदीवज्मध्ये तयार झाली आणि व्यापाऱ्यांचेही वरचेवर येणे सुरू झाले. ब्रिटिशांच्या संपर्कामुळे मालदीवी जनतेच्या जीवनशैलीत, शिक्षण पद्धतीत थोडाफार युरोपीय पद्धतीचा बदल झाला. गव्हर्नर जनरलने सुलतानी एकाधिकारशाहीऐवजी संवैधानिक राजेशाहीचा पुरस्कार करून १९३२ मध्ये तशी राजकीय व्यवस्था सुरू केली. ही नवीन व्यवस्था वयोवृद्ध सुलतान व त्याचा मुख्यमंत्री यांच्यासह अनेक कट्टर इस्लामी मंडळींना रुचली नाही, म्हणून त्यांनी ही राज्यघटना जाहीरपणे फाडून टाकली. पुढील काळात ब्रिटिशांनी त्यांच्या लष्करात वाढ करून मालदीवज्चा सुलतान व जनतेवरचा दबाव वाढवला. १९५३ पर्यंत मालदीवज्च्या सल्तनतीचे संरक्षक म्हणून ब्रिटिशांनी काम केले, त्याच वर्षी येथील सल्तनत म्हणजे सुलतानाचे स्वामित्व बरखास्त करण्यात आले. मुहम्मद अमीन डिडी यांची राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्या नेतृत्वाखाली मालदीवज्चे पहिले लोकशाही सरकार स्थापन झाले. डिडी यांनी मत्स्य निर्यातीचे राष्ट्रीयीकरण, स्त्री शिक्षण व्यवस्था या गोष्टी केल्या. परंतु इस्लामी कट्टरवादी विरोधकांनी डिडी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली.

पुढे ब्रिटिशांना आशिया-आफ्रिकेतल्या वसाहतींवर नियंत्रण ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत गेले, त्या वसाहतींतील लोक स्वातंत्र्याची मागणी करू लागले. अनेक वसाहती ब्रिटिशांनी बरखास्त केल्या. मालदीवचे संरक्षक म्हणून त्यांनी केलेला करार रद्द करून २६ जुलै १९६५ रोजी मालदीवज् स्वतंत्र केले. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 12:24 am

Web Title: maldives by the british responsibility for the protection of the sultanate and foreign affairs akp 94
Next Stories
1 कुतूहल : गणिती अर्थशास्त्रज्ञ जॉन नॅश
2 नवदेशांचा उदयास्त : मालदीव बेटांवर परकीय-प्रवेश
3 कुतूहल – जॉन फॉन नॉयमन
Just Now!
X