26 March 2019

News Flash

निजामशाहीचा तारणहार – मलिक अंबर

या काळात त्याने एक उत्तम योद्धा म्हणून नाव कमावले.

इथिओपियातून आलेला हबशी गुलाम मलिक अंबर याचे नाव त्याची स्वामिनिष्ठा, मुत्सद्देगिरी, न्यायप्रियता आणि औदार्य या गुणांमुळे दक्षिण भारताच्या इतिहासात आदराने घेतले जाते. अहमदनगरच्या निजामशाहीतला सरदार चंगेजखानकडे विकला गेल्यावर मलिक अंबर त्याच्याकडे गुलाम म्हणून वीस वर्षे नोकरीत राहिला. या काळात त्याने एक उत्तम योद्धा म्हणून नाव कमावले. चंगेजखानाच्या मृत्यूनंतर स्वत:चे छोटे सन्य उभे करून भाडोत्री सैनिक पुरवण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला. पुढे सोळाव्या शतकाच्या अखेरीस १५९७ साली मोगल बादशाह अकबरने अहमदनगरवर चढाई केली. त्या काळात अज्ञान सुलतान बहादूर निजामशहाची राज्यपालक राणी चांदबीबी राज्याचा कारभार पाहात होती. काही काळ चांदबीबीने मोगल सन्य थोपवून धरले; परंतु युद्धबंदीच्या तहाची बोलणी सुरू असताना काही लोकांच्या जमावाने चांदबीबीची हत्या केली. त्यानंतर मोगलांनी अहमदनगरचा ताबा घेतला. या घटना घडण्यापूर्वी काही काळ मलिक अंबर निजामशहाच्या सेवेत सेनाधिकाऱ्याच्या पदावर नोकरीत रुजू झाला होता.

बादशाह अकबराने निजामशाहीचा पाडाव करून अहमदनगर शहर आणि आसपासचा काही प्रदेश ताब्यात ठेवला; पण बराच मोठा प्रदेश मलिक अंबर आणि त्याच्या सन्याच्या अमलाखाली होता. त्याने त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या संगनमताने मुर्तजा निजामशाह द्वितीय यास सुलतानपदावर बसवून आपली राजधानी परांडा येथे नेली. यापुढे मलिकने निजामशाही सरकारची सर्व सूत्रे हातात घेऊन वझिर किंवा पंतप्रधान म्हणून कारभाराची निष्ठेने जबाबदारी घेतली.

मलिक अंबरने प्रथम अहमदनगरला तळ ठोकून बसलेल्या मोगल सन्याचा समाचार घेऊन त्यांना हाकलून लावले. यावर अकबर काही शांत बसणार नाही हे ओळखून मलिक पुढच्या युद्धाच्या तयारीला लागला. नंतर त्याने जुन्नर येथे राजधानी हलवली. अकबराने आपला सेनाधिकारी खानेखाना याच्याकडे मोठी फौज सोपवून अहमदनगरवर चढाई केली. या वेळी मलिक अंबरने विजापूरच्या आदिलशहाची आणि मराठय़ांची मदत घेऊन मोगलांचा पराभव केला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on March 9, 2018 2:03 am

Web Title: malik ambar 2