26 March 2019

News Flash

जे आले ते रमले.. : मलिक अंबरचा अस्त

जहांगीर बादशहानेही अहमदनगरवर फौज पाठवून मलिक अंबरला पराभूत करण्याचा प्रयत्न केला.

अकबराने अहमदनगरावर पाठविलेल्या फौजेचा मलिक अंबरने पराभव केल्यावर पुन्हा एकदा मोठय़ा फौजेनिशी अकबराने आपला दुसरा सेनाधिकारी तिकडे पाठवला. या वेळी मोगल सेनेला अहमदनगर घेण्यात यश आले परंतु तेवढय़ात शाहजादा जहांगीरने बादशाह अकबराविरुद्ध बंड केल्यामुळे सर्व मोगल फौज हे युद्ध सोडून परत दिल्लीकडे रवाना झाली. नियमित होणाऱ्या आक्रमणांचा धोका ओळखून मलिक अंबरने आपली राजधानी दौलताबाद जवळ वसवून तिला नाव दिले खडकी. ‘खडकी’ हा खिडकीचा अपभ्रंश आहे असे म्हटले जाते. दक्षिणेकडे उघडणारी खिडकी अशा अर्थी. सन १६०९ मध्ये वसवलेल्या खडकीचे नामांतर पुढे औरंगजेबाने ‘औरंगाबाद’ असे केले.

जहांगीर बादशहानेही अहमदनगरवर फौज पाठवून मलिक अंबरला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या फौजेलाही मलिकच्या गनिमी काव्याच्या छाप्यांपुढे टिकाव धरता आला नाही. समोरासमोर सामना न करता भुरटे हल्ले करून शत्रूला जेरीस आणण्याची त्याची पद्धत होती. मात्र १६१७ साली जहांगीरपुत्र शाहजहानने अहमदनगरवर हल्ला करण्यापूर्वी मलिक अंबरच्या युतीतल्या विजापूरचा सुलतान आणि इतर सरदारांना युतीतून फोडून आपल्याकडे घेतले. त्या वेळी झालेल्या युद्धातल्या पराभवामुळे मलिक अंबरला शांतता तह करून या तहान्वये निजामशाहीतला अहमदनगर आणि आसपासचा बराच प्रदेश मोगलांना द्यावा लागला.

मलिक अंबर १६२६ साली वयाच्या ऐंशीव्या वर्षी मृत्यू पावला. इ.स. १६०७ ते इ.स. १६२६ या काळात मलिक अंबरने अहमदनगरच्या निजामशाहीचा पालक कारभारी आणि वजीर या पदांवरून काम केले. या काळात मोगलांसारख्या प्रबळ शत्रूला त्याने झुंजायला लावले. मोगलांशी टक्कर देण्यासाठी मलिक अंबरने पश्चिम किनारपट्टीवरील लहान लहान राज्ये आणि विशेषत: जंजिरा राज्याचे हबशी राज्यकत्रे यांच्याशी युती केली. निजामशाहीचे मोगलांपासून संरक्षण करताना मलिक अंबरने जी स्वामिनिष्ठा दाखवली तिला भारतीय इतिहासात तोड नाही. त्यामुळेच या एके काळच्या हबशी गुलामाचे नाव आजही आदराने घेतले जाते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on March 13, 2018 2:05 am

Web Title: malik ambar end