11 August 2020

News Flash

कुतूहल : खारफुटी महोत्सव

एकंदरीतच खारफुटीची प्रदूषकांना सामावून घेण्याची क्षमता खूप जास्त असते.

खारफुटीची जंगले खाडी किंवा समुद्र किनाऱ्याची सीमा आखून देतात. खाडीत अथवा  समुद्रात विलीन होणारे शहरी मलप्रवाह आणि जलप्रवाह याच खारफुटीच्या जंगलांतून प्रवाहीत होत असताना त्यांचे बऱ्याच अंशी शुद्धीकरण होत असते. खाडी किंवा समुद्रातील सजीवसृष्टीला  घातक ठरू शकणारी अनेक मूलद्रव्ये किंवा त्यांची अपरूपे खारफुटी वनस्पतींच्या मुळांद्वारे शोषली जातात. एकंदरीतच खारफुटीची प्रदूषकांना सामावून घेण्याची क्षमता खूप जास्त असते. खाडी तसेच समुद्रालगतच्या वेगवेगळ्या अधिवासांमध्ये स्वत:चे अस्तित्व टिकून राहावे यासाठी या वनस्पतींमध्ये  त्या त्या अधिवासांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माना अनुकूल असे बदल घडवून आणण्याची क्षमता असते.

मासे तसेच इतर सागरी जीवांसाठी खारफुटींची जंगले ही उत्तम प्रजनन केंद्रे आणि लहानग्या पिलांसाठी उत्तम संगोपन केंद्रे आहेत. यामुळे अर्थार्जन, व्यवसायासाठी खाडी तसेच समुद्रावर अवलंबून असणाऱ्या पारंपरिक समाजसंस्कृतीत या खारफुटी वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना खारफुटी या खाडीवर अवलंबून असलेल्या समाजांसाठी जीवनदायिनी आहेत.

खारफुटीच्या लाकडाचा उष्मांक तुलनेने अधिक असल्याने याचा ग्रामीण भागात छोटय़ा उद्योगांसाठी  अधिक कार्यक्षम इंधन म्हणून मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येतो. थोडे भान ठेवून आणि जबाबदार नागरिक म्हणून जर खारफुटीच्या जंगलांना आपण विकासाच्या नावाखाली हात लावला नाही, आपला संपर्क होऊ दिला  नाही, तर खारफुटीची वाढ अधिक वेगाने होऊ शकते. या वनस्पती अक्षरश: १५ ते २० फुटांपर्यंत वाढू शकतात. मानवाच्या अशा समजूतदार वागण्यामुळे खारफुटींच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत कोणताही व्यत्यय न येता हे चक्र अविरत चालू राहते आणि हे जंगल अधिक घनदाट व सदाहरित राहू शकते.

दरवर्षीप्रमाणे नुकताच, २६ जुलै रोजी ‘आंतरराष्ट्रीय खारफुटी दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने साधारणपणे जनजागृतीसाठी संबंधित सरकारी यंत्रणा, या क्षेत्रात कार्यरत असणारे संशोधक, अधिकारी पर्यावरणीय संस्था/संघटना यांच्याद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ठाण्यातील ‘पर्यावरण दक्षता मंडळा’तर्फे गेली काही वर्षे किनाऱ्यालगतच्या पारंपरिक वसाहतींमध्ये ‘खारफुटी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते आणि त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. आपणदेखील आपल्या परिसरातील खारफुटीचा होणारा विनाश टाळण्यासाठी, थांबविण्यासाठी  स्थानिक पातळीवर जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘खारफुटी महोत्सवां’चे आयोजन करून संबंधित समाजांच्या सहकार्याने खारफुटी संरक्षण आणि संवर्धनासाठी मोलाचे योगदान देता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:15 am

Web Title: mangrove festival zws 70
Next Stories
1 मनोवेध : प्रतिबिंब
2 मनोवेध : स्वमग्नतेमध्ये माइंडफुलनेस
3 कुतूहल : पश्चिम किनारपट्टीवरील प्रजाती
Just Now!
X