पुस्तकाचं शीर्षक वाचलं आणि ‘बॅक टु मेडिकल कॉलेज’ असं वाटलं. क्लिनिकल काम सुरू होण्यापूर्वी प्रोफेसर ‘मेडिसीन इज नॉट?.. असं आम्हाला विचारायचे आणि आम्हा सर्वाना ‘मॅथेमॅटिक्स’ असं कोरसमध्ये उत्तर द्यावं लागायचं. तेव्हा असला शाळकरीपणा आवडायचा नाही, पण त्यातूनच एक जबरदस्त संस्कार मनावर झाला. ‘मेडिसिन’ म्हणजे गणिताच्या प्रमेयासारखं, विशिष्ट पद्धतीने फॉम्र्यूला मांडून उत्तरं शोधण्याचं शास्त्र नव्हे. कारण गणितात दोन अधिक दोन म्हणजे चार असं तर मेडिसिनमध्ये कदाचित शून्य किंवा काहीही!
याचा अर्थ ठरावीक ठोकताळे वापरून गणितातल्यासारखं रुग्णाच्या विकाराचं निदान करता येतं असं नव्हे. म्हणजे ठोकताळ्यांना मेडिसिनमध्ये काहीच स्थान नाही, असाही अर्थ होत नाही.
वैद्यकशास्त्रात अचूक निदान करण्यासारखं वेधक आवाहन नसतं. गंमत म्हणजे रुग्णाला निदानात फारसा इंटरेस्ट नसतो, त्याला रोगमुक्त, वेदनाविरहित शरीर हवं असतं. त्यामुळे रुग्णाची गरज भागेल आणि आपल्या पुढचं चॅलेंज जिवंत राहील याची सांगड घालत वैद्यकशास्त्राचं पालन करावं लागतं. म्हणजे डॉक्टर म्हणून काम करताना तसा विचार करावा लागतो. डॉक्टरी शास्त्राचं त्याचं तर्क किंवा तर्कट असतं.
वैद्यकशास्त्राचा असा अभ्यास हा मागील अनेक शतकांपूर्वीचा वारसा आहे. वैद्यकशास्त्र हा वैद्यकपेशा होता, व्यवसाय होता; परंतु वैद्यकाचा हा अबलख वारू अचानक धडपडला आणि वैद्यकामधली अंत:स्फूर्ती संपली! फक्त तर्क शिल्लक राहिला. वैद्यकातले तर्क म्हणजे रोगनिदान करण्याकरिता वापरण्यात आलेले अ‍ॅलगॉरिदम.
मुळात संगणकशास्त्रीय परिभाषेतील ही संज्ञा वैद्यकशास्त्रात घुसली आणि निदान करण्याच्या प्रणाली तयार झाल्या. ती रोगनिदान कसं करायचं याचा तर्कशुद्ध विचार शिकविणारी प्रणाली होती, पण ती फक्त निर्देशक, दिशादर्शक होती, त्यांची सिस्टीम झालेली नव्हती!
विमा नि औषध कंपन्या आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलांनी वैद्यकशास्त्राचा एकप्रकारे ताबा घेतला. डॉक्टरला प्रत्येक रुग्ण तपासणीचं आणि निदान करण्याच्या प्रणालीचं प्रचंड प्रमाणात डॉक्युमेंटेशन झालं. याचं कारण रुग्णांच्या निदानावर विम्याची रक्कम मिळू लागली. अ‍ॅलगोरिदमप्रमाणे मिळालेल्या निदानानुसार औषध योजनांची रुजवात होऊ लागली. रुग्णाला बरं करणं हा धंदा झाला. कारण त्यात प्रचंड आर्थिक गुंतवणूक झाली. खरं पाहता कोणत्याही शास्त्रात शास्त्रशुद्ध प्रणाली निर्माण होणं आणि त्याचा वापर होऊ लागणं श्रेयस्कर; परंतु अशा प्रकारच्या अ‍ॅलगोरिदम पद्धतीमध्ये कमालीचा यांत्रिकपणा येतो.
अ‍ॅलगोरिदममध्ये डॉक्टरच्या कौशल्यापेक्षा क्लिनिकल अ‍ॅक्युयेन महागडय़ा तपासण्यांवरून यांत्रिकपणे काढलेले निष्कर्ष अधिक सोयिस्कर ठरले. डॉक्टरांच्या ‘जजमेंट’पेक्षा तपासणी यंत्राने दिलेली माहिती अधिक वस्तुनिष्ठ आणि सायंटिफिक मानली जाऊ लागली.
डॉक्टरांच्या जजमेंटस् ह्य़ुमन एररमुळे चुकतात यात शंका नाही आणि त्याचा दुष्परिणाम रुग्णाला भोगावा लागतो याचं दु:खही आहे. परंतु यांत्रिक पद्धतीने विचार करणारा डॉक्टर यंत्राइतकाच थंडपणे, यांत्रिकपणे बिनचेहऱ्याचा संगणक होतो, त्याचं काय? अंत:स्फूर्ती की अ‍ॅलगोरिदम? असा वाद नसून या विचारपद्धती परस्परपूरक आहेत. म्हणून ‘हाऊ डॉक्टर्स थिंक’ हे पुस्तक मनापासून आवडलं. सगळ्या प्रकारच्या डॉक्टरी शाखांचा लेखाजोखा त्यात मांडलाय. गंमत म्हणजे, वैद्यकशास्त्रानं मनोविकारशास्त्राचा त्यात अंतर्भाव केलेला नाही. कारण मनोविकारशास्त्र खरोखरच कोणत्याही यांत्रिकी विचारसरणीत अडकलेलं नाही. इथे तपासणी आधारित निदान नाही, रुग्णाचा अभ्यास करताना तज्ज्ञ डॉक्टराला अतिशय लवचीकपणे विचार करावा लागतो. पुस्तकात अर्थात खूप रंजक केस स्टोरीज आहेत. गंमत म्हणजे सर्वसामान्य वाचकांसाठी असलेलं पुस्तक हे अधिकाधिक डॉक्टरांनीही वाचलं पाहिजे, असं वाटतं.

कुतूहल: पाणी शुद्ध करण्याचा फिल्टर
नद्या, तळी, विहिरींमधील पाणी पिण्याआधी त्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. क्लोरिन वायू र्निजतुकीकरणासाठी खात्रीचा उपाय आहे. क्लोरिन वायू पाण्यात थोडाच विरघळतो, मात्र त्यातून हायड्रोक्लोरिक आणि हायपोक्लोरस आम्ले तयार होतात. पाण्यातील एकपेशीय जीव, जंतू, शैवाल, बुरशी सर्वाना मारून टाकण्याचे काम ही आम्ले चोख बजावतात. हायपोक्लोरस आम्लाचे विघटन होऊन ऑक्सिजन निर्माण होतो, ज्यामुळे पाण्यातील रंगद्रव्ये आणि कार्बनी पदार्थ ऑक्सिडाइज होतात. विरघळलेला क्लोरिन पाण्यात बराच काळ राहतो, त्यामुळे पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून आपल्या घरी पोहोचेपर्यंत र्निजतुकीकरणाचे काम करतच राहतो.
पाण्यात जर ब्रोमिनची कार्बनी संयुगे असतील तर क्लोरिनेशनमुळे विषारी पदार्थ तयार होतात, जे आपल्या शरीरास अपाय करू शकतात. प्रगत देशांमध्ये क्लोरिनऐवजी ओझोन वायू वापरण्याचे कायदे आहेत. ओझोनही पाण्याचे र्निजतुकीकरण क्लोरिन इतक्याच चोखपणे बजावतो, मात्र ओझोनची पाण्यातली पातळी फार काळ टिकत नाही, त्यामुळे पाणी घरापर्यंत वाहून नेण्याच्या काळात पुन्हा जीवजंतू वाढू शकतात. ते मारून टाकण्यासाठी पुन्हा कमी मात्रेत क्लोरिन वापरावा लागतो. इतका सगळा व्याप खूप खर्चीक आहे. सध्या तरी पाण्याच्या र्निजतुकीकरणाचा क्लोरिनेशन हाच सोयीस्कर आणि स्वस्त उपाय आहे.
बाजारात घरगुती वापराचे फिल्टर्स मिळतात. यात पाणी अतिशय सूक्ष्म छिद्राच्या गाळणीतून स्वच्छ करून त्यात अल्ट्रा व्हायोलेट किरणे वापरून जीवजंतूंना मारून टाकण्याची व्यवस्था केलेली असते. काहीमध्ये तर कार्बन फिल्टर वापरून पाण्यातील वास तसेच रंग काढला जातो. रिवर्स ओस्मोसिस फिल्टर्स तर जिवाणूबरोबर विरघळलेले क्षारसुद्धा वेगळे करतात. घरगुती फिल्टर्समध्ये कोणत्याही रसायनांचा वापर केलेला नसतो. मात्र असे फिल्टर्स वेळोवेळी साफ करणे अतिशय जरुरीचे असते, अन्यथा फिल्टर्समध्ये जंतूंची वाढ होऊन पाणी अधिक अशुद्ध होऊ शकते.
र्निजतुकीकरणामुळे आपण ८० टक्के जलजन्य रोगांपासून सुरक्षित राहतो.
डॉ. कमलेश कुशलकर, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व: गारद्यांसारख्या प्रबल व बहुसंख्य परकीय शब्दांचा धुडगूस
मराठीला अनेक नवीन आणि चांगले पर्यायी शब्द देणाऱ्या स्वा. सावरकरांचे परकीय शब्दांच्या मराठीतील प्रमाणाविषयीचे पुढील  विचार आजही मननीय ठरावेत.
‘‘मराठीच्या परकीय शब्दांच्या शिरजोरपणाने झालेल्या भ्रष्टीकरणाचा निषेध नि प्रतिरोध करुन तिचे शुद्धीकरणाने काऱ्य पुन: चालविणे हे आज आपले कऱ्तव्य झालेले आहे. श्रीशिवरायादि पूऱ्वजांच्या कृपेनें मराठींवर पडूं पाडणारी म्लेंच्छ भाषांची धाड आपल्या अुत्तरेकडील भाषाभगिनींवर जितकी वेगानें नि भयंकर प्रकारे पडली तितकी पडूं शकली नाही. म्हणून हिंदीचे वा पंजाबीचे वा सिंधीचे शुद्धाकरण करणे हें जितके अवघड होअून बसले आहे तितके मराठीचे शुद्धिकरण कठीण नाही, नि कठीण नव्हते म्हणूनच ते काम तसेच पडून राहिले होते. परंतु अुत्तरेस ते शुद्धीकरण कठीण झालेले असतांहि हिंदी नि बंगाली बंगाली गद्यपद्यांत ते त्यांनी अितक्या पूऱ्णपणे करून दाखविले आहे कीं आतां मराठींतली म्लेंच्छ शब्दांची अुरलेली थोडी घाणहि कोणास सहन होणारी नाही. आपणांसहि ती आतां ध्यानांत आल्याविना राहणार नाही.. प्रत्येक जिवंत नि सकस भाषेत अितर भाषांतील शब्द हे थोडय़ा प्रमाणांत यावयाचेच. त्यांतहि अिंग्रजीसारख्या साम्राज्याच्या भाषेंत त्यांचे अस्तित्व हें त्या भाषाभाषीयांच्या सम्राटपणाची कथा सांगणारे अेक गमकच असते. मराठीसहि अेकदा या अखिल भारतवऱ्षाच्या साम्राज्याची अुलाढाल करावी लागल्यामुळे तींत अितर आकुंचित जनपदाच्या भाषेंचे आकुंचन न राहून ती प्रसरणशील नि प्रसरणक्षम बनत गेली व तींत अनेक प्रदेशांचे अनेक शब्द मिसळून गेले.. परंतु प्रत्येक प्रसरणशील भाषेमध्ये परदेशी शब्द असणें हे जरी अपमानस्पद असतेंच असे नाही- अिंग्रजी भाषेंत शेंकडा पन्नासांहून अधिक शब्द तदितर भाषेचे आहेत. तरी ते शब्द त्या भाषेचे घरांत दास म्हणून असावेत. पण जेव्हा ते धनीपणा गाजावावयास लागतात किंवा नारायणराव पेशव्यांच्या गारद्यांप्रमाणेच वाटेल तेव्हां माडीवर चढून धन्यासच ठार मारण्याअितके प्रबल व बहुसंख्य होतात तेव्हां देखील त्यांस हाकलून न दिलें तर त्या भाषेसच ते आपली दासी करावयास सोडीत नाहीत.’’