11 December 2017

News Flash

मनमोराचा पिसारा.. मूळ ओढ अंतरीची..

मित्रा, या कट्टय़ावरची आपली अशी शेवटची भेट. तसं तुझं नि माझं न संपणारं आहे.

मुंबई | Updated: December 29, 2012 12:12 PM

मित्रा, या कट्टय़ावरची आपली अशी शेवटची भेट. तसं तुझं नि माझं न संपणारं आहे. वर्षांनुर्वष आपण बोलतो आहोत. मी सांगतो, तू वाचतोस, ऐकतोस नि पाहतोस. खूप खूप गप्पा मारतो आपण. तू मनापासून  दाद देतोस, प्रतिसाद देतोस, प्रेम करतोस, लोभ ठेवतोस. हे प्रेम आणि हा जिव्हाळा आपल्या ‘मर्मबंधातील ठेव’ आहे. ती तशीच आहे. गप्पा मारायला निमित्त मिळालं, तार छेडली, तू माझी, मी तुझी आणि संगीत निर्माण झालं कधी कधी ही तार अबोल होते, पण तुझ्या माझ्यात जुळलेली आहे हे नक्कीच.
बऱ्याच मित्रांनी विचारलं, कधी लिहितोस? कसा वेळ काढतोस? मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. मी सतत तुझं चिंतन करतो. एखादी ओळ मनात घोळते, कधी एखादं वाक्य मनात घुटमळतं, कधी गाण्याची लकेर, कधी ठुमरीतला शब्द, कधी चित्रातली सूक्ष्म छटा माझ्या मनात रेंगाळते ते कागदावर उतरवणं, हे काम फक्त यांत्रिक. मित्रा, वर्षभर मला क्षणभरही एकटं वाटलं नाही.
सदैव मनमोराचा पिसारा फुललेला होता. तू होतास ना माझ्याबरोबर!
वाचता वाचता, तुकोबा मला म्हणाले, जे काही लिहिशील ते मनापासून लिही कसं ते सांगतो..
अनुभवे आले अंगा
तें या जगा देतसे
मूळ  ओल अंतरीची
उतरूनी दिले कशी, शुद्धरसी सरते
तुका म्हणे दुसरे नाही, ऐसी ग्वाही गुजरली
ज्याचा माझ्या अंगी अनुभव आला, तोच मी सर्वास सांगत आहे. हे माझे शब्द पोकळ  आणि व्यर्थ असे नव्हेत.
माझ्या अंत:करणातील मूळच्या खऱ्या जिव्हाळ्याने ज्ञान उत्पन्न झाले आहे.
हे शब्द कसोटीला लावून खरे शुद्ध रसभरित आहेत, असे सिद्ध करून तुम्हास दिले आहेत.
महाराज म्हणतात, यावाचून दुसरे काही करणे नको. अशी साक्ष देऊन मी सादर केले आहेत.
इथे थांबायला हवं, नाही का? पण थांबवत नाही हे खरं. अजून अंतरीची ‘ओल’ तशीच आहे. जीवनाबद्दलचा जिव्हाळा नि प्रेम तसंच आहे. आयुष्याबद्दलची आसक्ती आणि आकर्षण तसंच आहे. मनात अजून खटय़ाळपणा आहे, गमतीजमती करण्याची ओढ तशीच आहे.
ते सगळं कधीच कमी होणार नाही की आटणार नाही. म्हणून थांबण्यात मजा आहे. अजून सांगावंसं वाटतंय, तेव्हाच विराम घेण्यात आनंद आहे. म्हणून थांबतोय, पुन्हा भेटण्यासाठी अशाच एखाद्या वळणावर, एखाद्या कट्टय़ावर. तोवर नमस्कार,
सत्श्रीअकाल,.. ?
बाय बाय, सायोनारा..!
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : वर्ष संपताना..
सुरक्षिततेवरील सदर चालवण्याचे हे २०१२ साल संपत आले. एका सुरक्षिततेला किती पलू आहेत हे वर्षांरंभी ध्यानात आले नव्हते. पण जसजसे वर्ष पुढे सरकत गेले तेव्हा कारखान्यातील सुरक्षितता, घरातील सुरक्षितता, रस्त्यावरील सुरक्षितता, प्रवासाच्या वेगवेगळ्या पद्धती उदा. विमान, रेल्वे, बोट, एसटी बस, स्वत:ची गाडी, सायकल, स्कूटर आणि शेवटी पायी चालण्यातील सुरक्षितता, दवाखाना आणि रुग्णालयातील सुरक्षितता, सर्कशीतील सुरक्षितता, कामाच्या जागेत घडणारे अपघात, शहरे, खेडेगावे येथील सुरक्षितता, शेतीतील सुरक्षितता, अग्निशमन दलातील सुरक्षितता, खेळाच्या मदानातील अपघात, सणांच्या वेळी घडणारे अपघात, प्राणी संग्रहालयातील सुरक्षितता, मोबाइल टॉवर-मोबाइल फोनमधील धोके, प्रयोगशाळा, सांडपाण्याची गटार येथे घडणारे अपघात, हॉटेल, बँकांतील अपघात, नैसर्गीक अपघात, बांधकामातील अपघात, विद्युत, ध्वनिप्रदूषण, शाळेतील सुरक्षितता अशा सर्व ठिकाणच्या सुरक्षिततेला जेव्हा या मालिकेतून स्पर्श केला तेव्हा वाचकांकडून विविध प्रकारचा प्रतिसाद आला. वस्त्रोद्योगावर दिलीप हेल्रेकर यांनी लेख लिहिले, तेव्हा कोल्हापूरच्या शिरगाव भागात ८० माणसे काम करणाऱ्या एका कारखान्याच्या मालकाने आपण आपल्या कारखान्यात रसायने बनवतो आणि कामगारांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांना कोणता युनिफॉर्म द्यावा याबद्धल सल्ला विचारला. तर नागपूरच्या अनंत ताम्हणे यांनी एसी व डीसी विद्युतवर लेख लिहिला तेव्हा मुंबईच्या श्रीनिवास मुजुमदार या महाराष्ट्र राज्य विद्युतनिर्मिती मंडळातील निवृत्त अधीक्षक अभियंत्याने त्या माहितीत काही भर तर घातलीच, पण त्यांनी विद्युत वहनावर चार लेखही लिहून दिले. त्यात विजेचे ग्रीड, त्याची सुरक्षितता, ३०-३१ जुल, २०१२ ला अर्धा भारत देश ग्रीडमुळे अंधारात कसा गेला, विजेची वारंवारता असे ते विषय होते. आपण आयुष्यभर केलेल्या कामातून मिळवलेला अनुभव लोकांपुढे मांडायची संधी त्यांना यानिमित्ताने मिळाल्याचा तो आनंद तर होताच, पण वाचकांनाही ही माहिती वाचायला मिळाली ही कौतुकाची बाब त्यात होती.  अरिवद चिणे यांनी घरगुती गॅस अधिक सुरक्षितपणे वापरण्यासाठी एका गॅस सेफ्टी उपकरणाची ओळख करून दिल्यावर ते खरेदी करण्यासाठी चार-पाच जणांनी चौकशी केली व एकाने ते विकतसुद्धा घेतले.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

इतिहासात आज दिनांक.. २९ डिसेंबर
१८०९ विल्यम एवर्ट ग्लॅडस्टन यांचा जन्म. लिव्हरपूल येथील व्यापारी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इंग्लंडच्या राजकारणात त्यांचे स्थान वैशिष्टय़ पूर्ण राहिले. पार्लमेंटमध्ये खासदारपदी काम करताना अंदाजपत्रकावरची त्यांची भाषणे अर्थपूर्ण होती. १८५९ नंतर ते हाऊस कॉमन्समध्ये नेते झाले. १८६८ ते १८९४ – या काळात पंतप्रधानापर्यंतची अनेक महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली.
१९७१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, सुधारकी विचारांचे व आचारांचे कार्यकर्ते भाऊराव कृष्णराव ऊर्फ दादासाहेब गायकवाड यांचे दिल्लीत निधन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्य़ातील आंबे गावी १९०२ मध्ये झाला. शिक्षण घेतल्यावर एक्साईज व मिलिटरी पोस्ट खात्यात त्यांनी नोकऱ्या केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली आणि दादासाहेबांचे आयुष्यच बदलून गेले. या भेटीनंतर त्यांनी आपले सारे आयुष्य आंबेडकरी चळवळीला अर्पण करून टाकले. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह याप्रसंगी त्यांचे संघटनचातुर्य पणास लागले. या काळात त्यांनी सायकलवरून सगळा भाग पिंजून काढला. पुढे ते नाशिक नगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले. येथेही त्यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा प्रश्न मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातील कल्पना अस्तित्वात आणण्यासाठी दादासाहेब झटले. स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी अफाट परिश्रम घेतले.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : सफर (निवडक) प्रतिसादांची ..१
२३ फेब्रुवारी, तन्वी वैशंपायन, मुंबई : माझी आई इतिहास शिक्षिका आहे. आपल्या ‘सफर’ या सदरातील लेखांचा तिला फार उपयोग होतो. तरी आपले सर्व लेख एकत्रितरीत्या पाठवू शकाल काय? आपले एखादे पुस्तक आहे का?
८ फेब्रुवारी, वसंत काळे, ठाणे : आपली लिखाणाची पद्धत चांगली आहे. चीनमधील तैपिंगच्या बंडाविषयी चांगली माहिती मिळाली. हे बंड म्हणजे अमेरिकन यादवी युद्ध. दोन महायुद्धे यासारखी इतिहासाला वेगळे वळण देणारी घटना होती. मध्यपूर्वेतील राणी झेनोबिया हिच्याबद्दल लिहिता येईल काय?
९ मे सतीश  गावडालकर, मुंबई :  पहिला रेल्वे प्रवास, बिसमार्क, टॉलस्टॉय, रॉक ऑफ जिब्राल्टर हे लेख खूपच सुरस, वाचनीय झाले आहेत.
२४ जुलै, प्रवीण आवताडे, मुंबई : आपला ज्युलियस सिझरबद्दलचा लेख अत्यंत माहितीपूर्ण व मोजक्या शब्दांत आहे. याच पद्धतीने आपल्या लिखाणाची प्रतीक्षा आम्ही करीत आहोत.
८ ऑगस्ट, स्वानंद सहस्रबुद्धे, मुंबई : आपल्या नावीन्यपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी लेखांचा मी नियमित वाचक आहे. रोमन साम्राज्यातील मालमत्ता वारसाहक्काच्या कायद्याविषयी आपण लिहाल तर बरे होईल.
७ जून, श्रीधर गांगल, ठाणे : आपले लिखाण स्तुत्य आहे. सामान्यत: न वाचलेली माहिती आपण पुरविता त्याबद्दल धन्यवाद. दुसऱ्या महायुद्धात रशियात दोन कोटी सैनिक व इतर माणसे मेली. १९७७ ते १९८९ या काळातही तेवढीच माणसे राजकीय खून, दगाबाजी, राजनिष्ठा यातून  मारली गेली असे आमच्या वाचनात आले होते. आकडा कितपत खरा आहे? याबद्दल आपण काही लिहू शकाल काय?
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

First Published on December 29, 2012 12:12 pm

Web Title: manmoracha pisara inner basic attraction