News Flash

डॉ. सी. नारायण रेड्डी –  तेलुगू

सिनारे यांचा जन्म २९ जुलै १९३१ रोजी हैदराबाद संस्थानातील एका शेतकरी कुटुंबात झाला.

१९६८ ते १९८२ या कालावधीतील भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी डॉ. सी. नारायण रेड्डी यांना १९८८ चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘विश्वंभरा’ या मुक्तछंदातील दीर्घकाव्याबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुस्काराने गौरविण्यात आले. वयाच्या ५८ व्या वर्षी हा मान मिळाला तेव्हा ते चकित झाले. इतक्या कमी वयात ज्ञानपीठ पुरस्कार फार कमी साहित्यिकांना मिळाला आहे.  डॉ. रेड्डी यांचे कवी, समीक्षक, गीतकार, गझलकार, शिक्षणतज्ज्ञ तसेच वक्ता म्हणून तेलुगू साहित्यात विशिष्ट स्थान आहे. तेलुगू समाजात ते सिनारे या नावाने लोकप्रिय आहेत. सिंगिरेड्डी नारायण रेड्डी या त्यांच्या नावाचे ‘सिनारे’ हे संक्षिप्त रूप आहे. अगदी अलीकडेच, म्हणजे १२ जून रोजी त्यांचे निधन झाले.

सिनारे यांचा जन्म २९ जुलै १९३१ रोजी हैदराबाद संस्थानातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे गाव निजामाच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण करीमनगर येथे उर्दू माध्यमातून झाले. किशोरावस्थेत त्यांच्यावर लोकगीतांचा तसेच ग्रामीण क्षेत्रातील प्रचलित हरिकथा, भागवत इ.चा खूप प्रभाव पडला. ते संगीतप्रेमी असून चांगले गाऊही शकतात. पुढे हैदराबादमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी वाचनालयाचे सभासदत्व घेतले. तिथेच त्यांची आधुनिक कवी व अन्य साहित्यिकांच्या रचनांची ओळख झाली. बी.ए. करीत असतानाच सिनारेंच्या कविता ‘स्वातंत्र्य’ या मासिकातून छापून येऊ लागल्या. १९५४ मध्ये तेलुगूमध्ये ते एम.ए. झाले. उस्मानिया विश्वविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून तसेच सार्वजनिक मंचावर एक समीक्षक म्हणून कार्यरत राहिले.

शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रात उच्चपदावर ते कार्यरत राहिले आहेत. आंध्र प्रदेश राजभाषा आयोगाचे अध्यक्ष तसेच आंध्र प्रदेश सार्वत्रिक विश्वविद्यालयाचे उपकुलपती तसेच तेलुगू विश्वविद्यालयाचे उपकुलपतिपद ही पदे डॉ. रेड्डी यांनी भूषविली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४७ काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून, त्यात कविता, दीर्घकाव्य, काव्यनाटय़, साहित्य समीक्षा, गझल, चित्रपटकथा, चित्रपटांसाठी लिहिलेली गीते, यांचा समावेश आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मायक्रोमीटर स्क्रू प्रमापी

मायक्रोमीटर स्क्रू प्रमापी हे सूक्ष्म अंतर (जाडी) अचूकपणे मोजण्याचे एक साधन आहे. विल्यम गॅसकॉईन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने मायक्रोमीटर स्क्रू प्रमापी हे साधन तयार केले. चित्रात दाखविल्याप्रमाणे धातूच्या एका अर्धवर्तुळाकार पट्टीस एक धातूचा दांडा जोडलेला असतो. त्यावर स्क्रूप्रमाणे फिरणारी धातूची एक वर्तुळाकार नळी असते. या दोन्हीवर प्रमाणित अशा खुणा केलेल्या असतात. स्क्रूच्या आटय़ांची या उपकरणात महत्त्वाची भूमिका असते. स्क्रूचा वर्तुळाकार एक फेरा फिरविल्यानंतर तो जितके अंतर पुढे जातो त्याला ‘पिच’ असे म्हणतात. हा पिच जितका कमी, तितकी उपकरणाद्वारे मोजलेले वाचन अधिक अचूकतेकडे असते. तसेच अर्धवर्तुळाची त्रिज्या जेवढी जास्त, तेवढी स्क्रू प्रमापीची मोठे अंतर मोजण्याची मर्यादा जास्त. मुख्य वाचनदांडय़ावरील सर्वात कमी वाचन आणि वर्तुळाकार वाचनपट्टीवरील एकूण खुणांची संख्या यांच्या भागाकारास स्क्रू प्रमापीचे लघुत्तम माप असे म्हणतात. स्क्रू प्रमापीचे लघुत्तम माप ०.०१ मिलिमीटर आहे. म्हणजेच स्क्रू प्रमापीने ०.०१ मिलिमीटर म्हणजे ०.००१ सेंटिमीटपर्यंतचे वाचन अचूकपणे करता येते.

मुख्य दांडय़ावरील वाचनास मुख्य वाचन असे म्हणतात व वर्तुळाकार वाचनपट्टीवरील जुळणाऱ्या रेषेस वर्तुळाकार पट्टीवाचन असे म्हणतात.

मुख्य वाचन + (वर्तुळाकार पट्टीवाचन ७ लघुत्तम माप) ही राशी एकत्रित वाचन देते. या उपकरणाने धातूची तार, दोरा, केस अशा प्रकारच्या वस्तूंची जाडी (व्यास) मोजता  येते. फक्त सरळ अंतर मोजण्यासाठी हे उपकरण उपयुक्त नाही. स्क्रूप्रमापीचा फिरणारा नळीसारखा भाग आवश्यकतेपेक्षा जास्त पिळू नये; कारण त्याचे आटे हे अतिशय नाजूक असतात. अनावश्यक जोर लावून ते फिरविल्यास ते खराब होतात व अशा उपकरणाने मोजलेली मापे चुकीची मिळतात.

पूर्वी स्क्रू प्रमापी स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे त्यावर हवामानाचा फारसा फरक होत नसे. हल्ली काही स्क्रू प्रमापींवर स्टेनलेस स्टीलचा मुलामा दिलेला असतो. मुलामा निघाल्यास ते खराब होण्याची शक्यता असते. विशेषत: रासायनिक प्रदूषण व आद्र्रता जास्त असलेल्या भागात स्क्रू प्रमापीचे आटे खराब होऊन तो भाग घट्ट बसल्याने दांडा फिरत नाही. म्हणूनच स्क्रू प्रमापी वापरानंतर स्वच्छ करून सुरक्षित ठेवणे व त्याची नियमित निगराणी करणे आवश्यक असते.

सई पगारे- गोखले

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 4:06 am

Web Title: marathi articles on c narayana reddy
Next Stories
1 व्हर्निअर प्रमापी (कॅलिपर)
2 मोजपट्टी -२
3 वि. वा. शिरवाडकर –  सन्मान
Just Now!
X