News Flash

ज्यूलचे प्रयोग

उष्णतेचे स्वरूप समजून घेण्यासाठी ज्युलने केलेले प्रयोग फार महत्त्वाचे आहेत.

उष्णतेचे स्वरूप समजून घेण्यासाठी ज्युलने केलेले प्रयोग फार महत्त्वाचे आहेत. मात्र ज्यूल (१७८४-१८५८) हा काही व्यवसायाने संशोधक किंवा एखादा प्राध्यापक नव्हता. तो होता दारू गाळण्याचा धंदा करणारा एक व्यावसायिक! त्याच्या कुटुंबाचा तो पारंपरिक व्यवसाय होता. यात काही तरी नावीन्यपूर्ण करण्याच्या प्रयत्नातून विज्ञानात मोलाची भर पडली.

विजेचा शोध तेव्हा नुकताच लागला होता. विजेचे विविध उपयोग करण्याचे प्रयत्न केले जात होते. दारू गाळण्याच्या भट्टीत कोळशाऐवजी वीज वापरता येईल का, या विचारातून त्याच्या संशोधनाला सुरुवात झाली. त्याने किती वीज किती उष्णता निर्माण करते याचा शोध घेतला व त्याचा मूलभूत सिद्धांत शोधून काढला. ‘विद्युत प्रवाहाचा वर्ग आणि विद्युतमंडलाचा रोध यांच्या गुणाकाराएवढी उष्णता दर सेकंदाला निर्माण होते’ हा तो ज्युलचा सिद्धांत. त्याचे दुसरे निरीक्षण अधिक महत्त्वाचे ठरले. ते म्हणजे, खर्च झालेली विद्युत ऊर्जा आणि मिळालेली उष्णता यांचे गुणोत्तर नेहमी ठरावीकच असते.

मग ज्युलने यांत्रिकी ऊर्जा आणि त्यातून मिळणारी उष्णता यांचे गुणोत्तर मोजण्याचे प्रयोग सुरू केले. एखादे वजन ठरावीक अंतरातून खाली येताना एक रवी फिरवेल आणि त्यामुळे पाण्याची ज्वलनातून मुक्तझालेली उष्णता घुसळण होईल व त्यातून पाण्याचे तापमान वाढेल अशी एक यंत्रणा त्याने केली. तापमान अगदी नेमकेपणाने मोजण्याची व्यवस्था केली. त्याला असे आढळले की, खर्च झालेली यांत्रिक ऊर्जा आणि मिळालेली उष्णता यांचे गुणोत्तरही विद्युत ऊर्जा आणि उष्णता यांच्याइतकेच आहे.

ज्युलने त्यातून असा निष्कर्ष काढला की, यांत्रिक, विद्युत, उष्णता वगरे हे सर्व ऊर्जेचे विविध प्रकार आहेत. अन्य प्रकारची ऊर्जा उष्णतेत रूपांतरित होऊ शकते (किंवा उलटदेखील). पण त्यांचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते. त्याला ज्यूलचा स्थिरांक म्हणतात. (४.१८ ज्युल/कॅलरी). ‘ऊर्जा निर्माण होत नाही व विनाश पावत नाही’ हा ऊर्जेच्या अक्षय्यतेचा सिद्धांत यातूनच जन्माला आला. (त्याला ‘उष्मागतिकीचा पहिला नियम’ असेही म्हणतात.)

ज्यूलचे संशोधन त्या वेळच्या प्रस्थापित कल्पनांना धक्का देणारे होते. त्याला विरोध आणि उपेक्षा यांचा सामना करावा लागला. आपले संशोधन प्रसिद्ध व्हावे म्हणून झगडावे लागले; पण आज ज्यूल विज्ञानात अजरामर झाला आहे.

– डॉ. सुधीर पानसे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डॉ. भालचंद्र नेमाडे

२०१४चा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ समीक्षक, कादंबरीकार, कवी,  लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते, देशीवादी साहित्याचे खंदे पुरस्कर्ते अशी बहुमुखी ओळख असलेल्या भालचंद्र नेमाडे यांना साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल देण्यात आला.

नेमाडे यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी जळगाव जिल्हय़ातील सांगवी या गावी  झाला.  पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून १९५९ मध्ये  त्यांनी बी.ए. केले. त्यानंतर १९६१ मध्ये पुण्याच्याच डेक्कन महाविद्यालयातून भाषाविज्ञान या विषयात एम.ए., १९६४ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए. (इंग्रजी) केले. १९८१ मध्ये औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी. केले.  इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मय प्रकार, भाषाविज्ञान, भारतीय साहित्य, तौलनिक साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य इ. त्यांच्या अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय आहेत.

त्यांची इंग्रजी आणि मराठी ग्रंथसंपदा विपुल आहे. नेमाडेंच्या वाङ्मयीन कारकीर्दीची सुरुवात फेब्रुवारी १९५६ पासून झाली. ‘निळे मनोरे’ ही त्यांची पहिली कविता फर्गसन महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाली. त्यानंतर विविध नियतकालिकांतून त्यांच्या कविता  प्रसिद्ध होत होत्या. नेमाडे ओळखले जातात ते त्यांच्या १९६३ मध्ये  प्रकाशित झालेल्या ‘कोसला’ कादंबरीमुळे. त्यानंतर बिढार (१९७५), जरिला (१९७७), झूल (१९७९), हूल (२०००) आणि अगदी अलीकडची ‘हिंदू’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. साहित्याची भाषा (१९८७) व टीकास्वयंवर (१९९०) हे त्यांचे समीक्षा ग्रंथ मराठीत महत्त्वाचे मानले जातात.

इंग्रजीतूनही त्यांनी लेखन केले असून, त्यापैकी ‘तुकाराम’ (१९९०) हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड इ. भाषांत झाला असून, ‘कोसला’ या त्यांच्या कादंबरीचे कन्नड, तेलुगू, असामी, उडिया, पंजाबी, उर्दू, गुजराथी, हिंदी अनुवादही प्रसिद्ध झाले आहेत.

नेमाडे यांच्या लेखनातील टोकदारपणा, तिरकसपणा, परंपरेची मोडतोड करणारी, परखड शैली, चिकित्सक दृष्टी, देशीवादाचा प्रखर पुरस्कार आणि त्यांनी मांडलेला मूल्यविचार या साऱ्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:52 am

Web Title: marathi articles on electric heating
Next Stories
1 उष्णतेचे स्वरूप
2 डेसिबल
3 ध्वनीची उच्च-नीचता, लहान-मोठेपणा
Just Now!
X