14 December 2017

News Flash

नरेश मेहता यांच्या कादंबऱ्या

वैष्णव साहित्याचे प्रणेते, संपन्न आर्ष कवी नरेश मेहता यांनी अनेक साहित्यप्रकारांत लेखन केले आहे.

मंगला गोखले | Updated: July 27, 2017 4:40 AM

वैष्णव साहित्याचे प्रणेते, संपन्न आर्ष कवी नरेश मेहता यांनी अनेक साहित्यप्रकारांत लेखन केले आहे. १९५४ मध्ये प्रकाशित ‘डूबते मस्तुल’ ही कादंबरी ते १९८२ मधील ‘उत्तरकथा’ या दोन खंडांतील कादंबरींपर्यंत त्यांच्या एकूण सात कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

त्यांच्या सर्व कादंबऱ्यांतून यातनाग्रस्त मनुष्यासाठी विशेषत: स्त्रीसाठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘डूबते मस्तुल’च्या लेखनात १९४९ ते १९५३ पर्यंत अनेक बदल झाले. आत्मकथनाच्या शैलीत लिहिलेली- एका स्त्रीचं समाजात काय स्थान असतं?- काय असणार आहे? आणि काय असायला हवं?- या प्रश्नांच्या विचारमंथनातील ही कादंबरी आहे. रंजना या मध्यमवर्गीय स्त्रीच्या आयुष्यात अनेक पुरुष येतात, पण कुणीही तिच्या आत्म्याचे सौंदर्य ओळखत नाही. परंपरागत सामाजिक मूल्यांविषयी, पुरुषी शोषणाविरुद्ध आपला संताप व्यक्त करीत, अखेर ती आत्महत्या करते.

‘यह पथ बंधु था’ (१९६३)- ही माळव्यातील एक शिक्षक श्रीधर ठाकूर आणि त्यांची कर्तव्यनिष्ठ पत्नी सरो- यांच्या जीवनसंघर्षांवर आधारित कादंबरी आहे. स्वातंत्र्य आंदोलनातील आदर्श आणि मूल्य हे आपला अर्थ गमावून बसले आहेत. या दु:खद निराशापूर्ण वास्तवामुळे सगळे जीवनच व्यर्थ होत चाललेले आहे. या कादंबरीचे कथानक अशा प्रकारे दोन स्तरांवर व्यक्त होते. एकीकडे श्रीधरचे आयुष्य आणि दुसरीकडे त्यांचा मोडकळीस येणारा संसार. या साऱ्याचे कडवटपणे,  तरीही संयत शैलीत लेखकाने चित्रण केले आहे.

‘धूमकेतू: एक श्रुति’ (१९६२)- ही एक अत्यंत प्रभावशाली आणि विचारप्रवण कादंबरी आहे. ढासळणारी ग्रामीण संस्कृती, नैतिक मूल्ये आणि ग्रामीण जीवनाच्या संदर्भात उदयन ही व्यक्तिरेखा मनोविश्लेषणात्मक स्तरावर यात चित्रित केली आहे.

‘दो एकान्त’ (१९६४)- आधुनिकता ही सामाजिक नसते, तर आपली मानसिक स्थिती आहे. आधुनिकतेच्या नावाखाली स्त्री-पुरुषातील बिघडणाऱ्या नातेसंबंधांची चर्चा, सामाजिक मूल्यांच्या संदर्भात या कादंबरीत करण्यात आली आहे.

‘उत्तरकथा’- ही दोन खंडांतील एक महत्त्वपूर्ण कादंबरी असून, यात विसाव्या शतकातील माळव्यातील काही ब्राह्मण कुटुंबांची कथा मध्यवर्ती आहे. स्त्रियांची दु:खे, यातना विशद करणारी ही कादंबरी विरोधाशिवाय समर्पणाचे चित्रण करते.

कथा-कादंबरी, काव्यलेखनाव्यतिरिक्त नरेश मेहता यांनी ‘सुबह के घण्टे’ आणि ‘खण्डित यात्रा है’ या दोन नाटकांसह एकांकिकाही लिहिल्या आहेत. एक प्रवासवर्णन आणि समीक्षकात्मक लेखनही केले आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

डिझेलचा सीटेन क्रमांक

पेट्रोलच्या ऑक्टेन क्रमांकाप्रमाणे डिझेलची ज्वलनक्षमता ही सीटेन क्रमांकाने मोजली जाते. ती मोजण्यासाठीदेखील सी.एफ.आर. इंजिन वापरले जाते. पेट्रोलवर धावणारे इंजिन हे स्पार्क इग्निशन स्वरूपाचे असते तर डिझेल चालणारे इंजिन अंतज्र्वलन (इंटर्नल कम्बश्चन) प्रकारचे असते. या इंजिनात इंधनाचे ज्वलन होण्यास जो विलंब लागतो तो मोजण्यासाठी सीटेन क्रमांक उपयोगी ठरतो. जेवढा सीटेन क्रमांक जास्त, इंधनाचे ज्वलन होण्यास कमी वेळ लागतो व इंजिन लगोलग कार्यरत होते. साधारणपणे हा क्रमांक ४० ते ५५ च्या दरम्यान असतो.

वेगाने धावणाऱ्या वाहनात जास्त सीटेन क्रमांक असलेले डिझेल भरणे आवश्यक ठरते, अन्यथा इंजिन चालू व्हायला तसेच वाहन गतिमान व्हायला विलंब होतो.

प्रगतशील देशात डिझेलचा सीटेन क्रमांक ४६ राखतात.  प्रीमियम प्रकारातल्या काही डिझेल इंधनाचा हा क्रमांक ६० पर्यंत असतो. डिझेलचा सिटेन क्रमांक वाढवा म्हणून त्यात अल्किल नायट्रेट्स (मुख्यत: २- ईथिलएक्सील नायट्रेट ) आणि डाय-टर्शरी-बुटाइल पेरॉक्साइड ही पूरक रसायने वापरतात. वनस्पतीजन्य जैविक डिझेलचा सीटेन क्रमांक ४६ ते ५२ च्या अधेमधे असतो तर प्राण्याच्या चरबीपासून निर्माण केलेल्या जैविक इंधनाचा सीटेन ५६ टे ६० इतका असू शकतो.

सीटेन हे एक रासायनिक संयुग आहे आणि त्याचे सूत्र ल्ल-उ16ऌ34असे आहे. त्याला हेक्साडिकेन असेही म्हणतात. हे रसायन दाबाखाली सहज पेट घेते, त्यामुळे त्याचा सीटेन क्रमांक १०० मानला जातो. दुसरे एक रसायन अल्फा मेथाइल नॅफ्थीलीन आहे व त्याचा सीटेन क्रमांक शून्य असतो. सी. एफ. आर. इंजिनात या दोन रसायनचे मिश्रण घेऊन त्यांच्या सीटेन क्रमांकाची तुलना करून नमुना डिझेल इंधनाचा क्रमांक तपासाला जातो. डिझेल इंधनात असलेल्या विविध हयड्रोकार्बन संयुगांचे सीटेन क्रमांक वेगवेगळे असतात व त्यांची सरासरी घेऊन येणारा क्रमांक त्या विशिष्ट इंधनाला प्राप्त होतो. अशा प्रकारे, हा क्रमांक दाबाखाली इंधन किती कमी वेळात पेटून कार्यरत होते, याची कल्पना देत असतो.

या चाचणीला पर्याय म्हणून सीटेन निर्देशांक ही दुसरी कसोटी वापरली जाते. त्यासाठी इंधनाची घनता आणि त्याचे विशिष्ट टक्क्यात होणाऱ्या ऊध्र्वपातनाचे (१०%, ५०% व ९०%) तापमान विचारात घेतले जाते. अर्थात, हा निर्देशांक फक्त कोऱ्या इंधनाचा असतो, पूरक रसायने मिसळलेल्या इंधनाचा नसतो.

जोसेफ तुस्कानो

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

First Published on July 27, 2017 4:40 am

Web Title: marathi articles on naresh mehta books