19 November 2017

News Flash

मजेशीर एककं

वेगवेगळ्या क्षेत्रांत आपण गरजेनुसार वेगवेगळी एककं वापरतो.

लोकसत्ता टीम | Updated: August 21, 2017 2:26 AM

वेगवेगळ्या क्षेत्रांत आपण गरजेनुसार वेगवेगळी एककं वापरतो. जागेसाठी आपण चौरस मीटरमध्ये विचार करतो, तर कापडासाठी फक्त मीटरचा विचार करतो. शिवाय प्रत्येक क्षेत्रात सर्वसाधारणपणे ज्या प्रमाणात व्यवहार होतो, त्या प्रमाणात एककांची गुणकं आपण घेतो. उदाहरणार्थ, आपण तांदूळ किलोग्रॅममध्ये मोजतो, तर औषधं मिलिग्रॅममध्ये.

कधी कधी मात्र वेगळी मजेशीर एककं काही क्षेत्रांत प्रचलित असतात. त्यांची ओळख आपण या आठवडय़ात करून घेणार आहोत.

‘टू शेक्स ऑफ लॅम्ब्स टेल’ – इवलासा वेळ दाखवणाऱ्या या वाक्प्रचारावरून आण्विक भौतिकशास्त्रात शेक (shake) हे एकक वापरलं जातं. एक शेक म्हणजे १० नॅनोसेकंद. अणुविभाजनाच्या साखळी प्रक्रियेचा झपाटा इतका असतो, की साखळीच्या दोन टप्प्यांमध्ये केवळ एक शेक इतका अत्यल्प वेळ जातो.

वेळ मोजण्यासाठी संगणकशास्त्रात कधी कधी नॅनोसेंचुरी हे अजब एकक वापरलं जातं. नॅनो हे अतिसूक्ष्म मापनासाठी गुणक आहे, तर सेंचुरी म्हणजे शतक; पण नॅनोसेंचुरी म्हणजे ३.१५५ सेकंद अशी तिसरीच वेळ आहे. काही जणांच्या मते गणितातल्या पाय (३.१४२) ह्य़ा स्थिरांकावरून नॅनोसेंचुरी हे एकक निश्चित केलं आहे.

आयबीएम या सुप्रसिद्ध संगणक कंपनीने १९६९ मध्ये हे एकक वापरायला सुरुवात केली. संगणक आज्ञावली अशी असली पाहिजे की,  काम करताना कोणालाही संगणकासमोर बसून एका नॅनोसेंचुरीपेक्षा जास्त वाट बघायला लागता नये असा दंडक आयबीएमने तेव्हा घालून दिला होता. अर्थात आज आपण त्यासाठी एक सेकंदही धीर धरू शकत नाही ही गोष्ट वेगळी!

वेळेसाठी आणखी एक विलक्षण एकक आहे- ‘फ्रीडमन’. द वर्ल्ड इज फ्लॅट या जागतिकीकरणाविषयीच्या सुप्रसिद्ध पुस्तकाचा लेखक थॉमस फ्रीडमन हा एक राजकीय-सामाजिक पत्रकार आहे.

इराकच्या भवितव्याविषयी लेखन करताना तो दर सहा महिन्यांनी नवे आडाखे बांधत असे. हे आडाखे अभ्यासपूर्ण असत; पण जग किती अस्थिर आहे याचंही द्योतक असत. त्यामुळे सुमारे सहा महिन्यांत परिस्थिती बदलत असेल, तर फ्रीडमन ह्य़ा एककात काळ दर्शवण्याची एक अनोखी प्रथा पत्रकारितेत पडली आहे.

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

एम. टी. वासुदेवन नायर – विचार

१९९५ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात लेखकाच्या भूमिकेविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतात- ‘‘मल्याळम ही माझी भाषा. कोणत्याही भाषेतील महान साहित्यकृती ही सार्वभौमिक साहित्यसंपत्ती असते, असा मल्याळम लोकांचा विश्वास आहे. त्यांच्या मनाची दारं बाहेरील प्रकाश आणि स्वच्छ हवेसाठी सदैव उघडी असतात. बाहेरील जगाच्या आणि साहित्यिक आंदोलनाच्या संपर्कात राहूनच आमचं साहित्य प्राणशक्ती अर्जित करते, असा माझा विश्वास आहे.

मी लेखक कसा बनलो, हा प्रश्न आजही मला आश्चर्यचकित करतो. वयाच्या चौदाव्या वर्षी मी नियमित लिहायला सुरुवात केली. लेखन सुरू केलं खरं, पण या टप्प्यावर लेखकाचा आंतरिक संघर्ष सुरू होतो. विषयाची निवड हाच तो संघर्ष. विषय आणि त्याचे माध्यम यामध्येही सारखा संघर्ष होत राहतो. त्याची मुळे परंपरेतही मुरलेली असतात. ज्या परंपरेविषयी त्याच्या मनात सन्मानाची भावना असते, त्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा तो प्रयत्न करीत असतो. अनुभवातून तो जाणतो, की वाचकांना लेखकाविषयी प्रेमपूर्ण सहानुभूती वाटत असते. वाचक त्याचे वाचन आपल्या हृदयात कोरून ठेवतात. त्यात आपलाही अनुभव मिसळतात आणि मग त्या कलाकृतीला एक नवीनच रूप बहाल करतात. अशा वेळी ते लेखकाचा स्वीकार कशा तऱ्हेने करतात? हा एक दुसरा संघर्ष आहे. त्याची जाणीव लेखकाला होणे आवश्यक आहे. कित्येक वर्षांपासून मी विश्वस्तरीय साहित्यिकांच्या महान साहित्यकृतींची पारायणं करीत आलो आहे. त्यातून मला कथेची व्यापकता समजण्याला मदतच झालेली आहे. आपल्या कलेची सीमारेषा आपण आपलीच आखून घेतली पाहिजे हे त्यातून मी शिकतो. अनेक शक्यता आपल्याला दिसत असतात, पण आपण जेव्हा या कार्यक्षेत्रात उतरतो तेव्हा आपली सामग्री आपल्यालाच गोळा करावी लागते. शिखरावर पोहोचण्याच्या ईष्र्येने आपण ज्या सिद्धांतांना, तत्त्वांना एके काळी पवित्र मानलं, पावन मानलं, तीच तत्त्वं आपण आज पायदळी तुडवतो आहोत. शासक आणि शासित वर्गामध्ये संघर्ष सुरू आहे. संस्कृती आणि अपसंस्कृती यांच्यातही ओढाताण सुरू आहे. या झंझावातापासून बाहेर पडण्यासाठी लेखक धडपडतो आहे.’’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on August 21, 2017 2:26 am

Web Title: marathi articles on shake unit