News Flash

मराठीचे ‘ज्ञानपीठ’

२००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विंदा करंदीकरांना तर २०१४ चा भालचंद्र नेमाडे यांना मिळाला.

पहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९६५ साली देण्यात आला. त्या वेळी १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता. प्रसिद्ध मल्याळी महाकवी गोविंद शंकर कुरूप यांना ‘ओडोक्वुफल’ (वेळूची बासरी) या महाकाव्याबद्दल हा प्रथम पुरस्कार देण्यात आला.

१९६५ ते २०१५ पर्यंत एकूण ५१ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले; पण गौरव ५६ साहित्यिकांचा झाला. कारण आत्तापर्यंत पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्यापि पुरस्कार लाभलेला नाही. सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; कन्नड भाषेला आठ वेळा, तर मराठी भाषेला चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे.

१९७४चा दहावा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीने पटकावला. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीस  हा पुरस्कार देण्यात आला. ‘ययाति’च्या रूपाने शाश्वत मूल्यांची आठवण भाऊसाहेब खांडेकर यांनी करून दिली आहे. या साहित्यकृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्या वेळी भाषा सल्लागार समितीत (L.A.C.) मराठी भाषेसाठी डॉ. य. दि. फडके, डॉ. अशोक केळकर आणि कवी मंगेश पाडगावकर हे होते. मध्यवर्ती निवड समितीत प्रा. मं. वि. राजाध्यक्ष यांचा समावेश होता. त्यानंतर चौदा वर्षांनी म्हणजे १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांना मिळाला आहे. मराठी मायबोलीचा पुन्हा एकदा गौरव झाला. या वेळी भाषा सल्लागार समितीमध्ये मराठी भाषेसाठी प्रा. बाळ गाडगीळ, प्राचार्य म. द. हातकणंगलेकर आणि डॉ. श्रीमती सरोजिनी वैद्य हे तिघे जण होते. मध्यवर्ती निवड समितीत डॉ. श्रीमती विजया राजाध्यक्ष यांच्यासह इतर नऊ सदस्य होते.

२००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विंदा करंदीकरांना तर २०१४ चा भालचंद्र नेमाडे यांना मिळाला.

तसं पाहिलं तर मराठी चारच लेखकांना हा पुरस्कार मिळाला. इतक्या कमी वेळा का? यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे असे वाटते. येत्या वर्षभरात यासाठीच आपण विविध भाषांतील ‘ज्ञानपीठ’ मानकऱ्यांचं साहित्यिक कर्तृत्व समजून घेऊ या.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

आरंभ मोजमापनाचा!

कुठल्याही गोष्टीचे मोजमापन करणे तसेच तिचे दुसऱ्या गोष्टीशी तुलना करणे हा मानवी मूळ स्वभाव आहे. तसे पाहिल्यास इतर काही सजीव पक्षी आणि प्राणी नसíगकरीत्या किंवा प्रशिक्षण देऊन थोडय़ा प्रमाणात असे करू शकतात, पण माणसाची त्याबाबतची

क्षमता प्रचंड आणि अजोड आहे. अगदी सूक्ष्मतम अणू-रेणूच्या पातळीवरील कक्षाची त्रिज्या ते सुदूर ब्रह्मांडातील अंतरे अचूकपणे मोजण्यापर्यंत आपल्याला यश मिळाले आहे.

तथापि सुरुवातीस मनुष्यवस्ती पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांत निवास करू लागली आणि शतकानुशतके त्या समूहांचा एकमेकांशी संपर्कही आला नाही. त्यामुळे अशा समूहांनी सोयीस्करपणे आपापल्या भाषा आणि मोजमापन करण्याच्या पद्धती स्वतंत्रपणे विकसित केल्या. बरेचसे दैनिक व्यवहार प्रामुख्याने वस्तूंची देव-घेव याप्रकारे पार पाडले जात असत. अर्थातच पुढे कृषीआधारित समाज विकसित होऊ लागल्यावर वस्तुनिर्मितीची विविधता वाढली आणि त्यांचा व्यापार सुरळीतपणे पार पाडण्यात सदर पद्धतीच्या मर्यादा

लक्षात येऊ लागल्या. दोन गोष्टींमधील तुलनात्मक समानता ठरवण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या, विवाद होऊ लागले.

यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे (उदा. दूध, धान्य आणि वस्त्र) मोजमापन पारदर्शकपणे करणे आवश्यक ठरू झाले. त्यासाठी माणसाला तीन व्यवस्था निर्माण कराव्या लागल्या :

(१) मोजणीसाठी एकक ठरविणे (उदा. लांबी, वजन आणि वेळ मोजण्यासाठी),

(२) मोजमापनासाठी खास साधने व पद्धती अवलंबणे (उदा. तराजू व वजने, साखळ्या आणि मोजपट्टय़ा), आणि

(३) वस्तूच्या मापनाप्रमाणे तिची किंमत चलनी रूपात (उदा. गुंजा, कवडय़ा आणि नाणी) मान्य करणे. अर्थातच यासाठी अंक, संख्या आणि प्राथमिक गणिती क्रिया (उदा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आदी) यांचा विकास, शिक्षण आणि वापर अनिवार्य झाला.

विशेष म्हणजे विविध समूहांनी अशा तिन्ही व्यवस्था त्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी स्वतंत्रपणे विकसित केल्या. साहजिकच त्यात फार थोडे साम्य होते. यासंदर्भात मागील पाचशे वर्षांतील प्रगती अचंबित करणारी आहे. मोजमापनात झालेली

प्रगती मनुष्याच्या सर्वागीण विकासाचा एक महत्त्वपूर्ण घटक मानणे रास्त ठरेल.

डॉ. विजय पाटकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:57 am

Web Title: marathi dnyanpeeth
Next Stories
1 कुतूहल : मोजमापन
2 प्रतिसाद
3 वर्ष संपताना..
Just Now!
X