वृत्तपत्रात येणाऱ्या स्तंभलेखांवर वाचकांच्या प्रतिक्रियांचे प्रमाण हे वाचकांच्या संख्येचे निर्देशक असते; असा निकष लावला तर कुतूहल सदर अतिशय वाचकप्रिय आहे; असे म्हणायला हरकत नाही.

२०१७ या वर्षांसाठी कुतूहल सदराचा विषय होता – ‘मोजमापन’. त्याअंतर्गत मोजमापन विषयावर आजपर्यंत एकूण २५७ लेख ४० लेखकांनी लिहिले. या २५७ लेखांवर आजपर्यंत लिखित पत्रांद्वारे व ई-मेलद्वारे १९४ प्रतिक्रिया मराठी विज्ञान परिषदेकडे आल्या. तसेच वेळोवेळी फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपद्वारे, दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटूनही वाचकांनी आपली मते-प्रतिक्रिया कळवल्या.

विविध भौतिक राशी मोजण्यासाठी मोजमापनाच्या पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी एकके, विविध एककांचे एकमेकात रूपांतर, मोजमापनासाठी वापरली जाणारी उपकरणे, त्या विषयावर काम केलेल्या शास्त्रज्ञांची थोडक्यात माहिती; असे मोजमापन सदराचे स्वरूप असावे असे ठरवले. तोच ढाचा ठेवण्याचा प्रयत्न वर्षभर केला व तो बऱ्यापैकी यशस्वी झाला.

विज्ञान-तंत्रज्ञानविषयक लेखन रूक्ष-क्लिष्ट न होता सोपे आणि रंजक तर हवे, पण त्यातील अचूक शास्त्रीय आशयाशी तडजोड  न करता लेखन करणे, ही तारेवरची कसरत आहे. यासाठी मराठीतून सातत्याने लिहू शकणारे चांगले विज्ञानलेखक मिळवणे, हे एक मोठे आव्हान होते.

या सदरात लेखन करणारी मंडळी ही त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व प्रथितयश मंडळी आहेत. कुणी प्राध्यापक, कुणी संशोधक, कुणी डॉक्टर, कुणी अभियंता तर कुणी विज्ञान प्रसारक. याचबरोबर मराठीतून लिहिणारे नवीन विज्ञानलेखक या माध्यमातून तयार होतील, असाही प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. बहुतेक लेखकांनी ते स्वत: काम करीत असलेल्या क्षेत्रातील अनुभवावर आधारित लेखन केले.

मोजमापन विषयावर हे सदर सुरू झाले तेव्हा लेखकांच्या नावांत, आकृत्या-घातांकांच्या छपाईत चुका अशा काही तांत्रिक चुका झाल्या; परंतु ते लक्षात आल्यानंतर त्यावर मार्ग शोधला गेला.

या प्रतिक्रियांवरून एक लक्षात आले की, मुले वृत्तपत्र वाचत नाहीत हा मोठा गरसमज आहे. कुतूहल सदराच्या नियमित वाचकांची संख्या बरीच मोठी आहे. बहुतेक पत्रे, ‘स्तंभलेखनाचा हा उपक्रम फारच चांगला आहे, सातत्याने यापुढेही असाच चालू ठेवावा’, अशा आशयाची आहेत.

काही वाचकांनी त्यांच्या काही शंका संबंधित लेखकांना विचारल्या होत्या. सोन्याची शुद्धता मोजण्यापासून रक्तदाब मोजण्यापर्यंत अनेक शंका-प्रश्न, अधिकची माहिती वाचकांनी विचारली. वेळोवेळी त्या शंकांची-प्रश्नांची उत्तरे संबंधित लेखकांनी वाचकांना दिली. यात विद्यार्थी होते तसेच प्रौढ वाचकही होते. हे नक्कीच आमचा हुरूप वाढविणारे आहे.

कुतूहल हे सदर वाचणारा वाचक हा वेगवेगळ्या स्तरांतील, वयोगटांतील आहे. मराठी विज्ञान परिषदेकडे आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांचा आढावा आपण पुढील लेखांत घेऊ.

डॉ. जयंत जोशी  मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

शंख घोष : साहित्य आणि सन्मान

सामाजिक विद्रोह हा घोष यांच्या सृजनशील लेखनाचा अंगभूत घटक आहे.  त्यांची कविता मानवी संवेदनेच्या सूक्ष्मातिसूक्ष्म लहरींना सामावून घेणारी आहे.

१९५६ मध्ये ‘दिंगुली रातगुली’ हा घोष यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘निहितो पाताळछाया’ (१९६७) हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. यात सामाजिक, राजकीय गदारोळाला आणि अनाठायी आक्रमकतेला ठामपणे विरोध केलेला दिसतो. अतिशय गंभीर विषय संयत स्वरात, भाषिक तोल जराही ढळू न देता, संवेदनशीलतेने कवितेत ते व्यक्त करतात. हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़ आहे.

‘यमुनावती’ या कवितेमुळे शंख घोष यांना बंगाली साहित्य रसिकांत एक महत्त्वाचे कवी म्हणून मान्यता मिळाली. १९६१ मधील खाप आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात एक ग्रामीण मुलगी मारली गेली. ही घटना ‘यमुनावती’ या कवितेची मूळ प्रेरणा .  शंख घोष यांच्या काही कवितांचे प्रफुल्ल शिलेदार यांनी मराठी अनुवाद केले आहेत. ‘वाढदिवस’ या कवितेत ते लिहितात-

‘आपली कधीतरी भेट होईलच

या वचनाशिवाय

तुझ्या वाढदिवशी दुसरे काय देऊ शकतो!

भेटू या तुलसीवटपाशी..

आपण भटकू या शहरातून, डांबराच्या उखडलेल्या रस्त्यावरून,

तुझ्या जन्मदिनी मी तुला अजून काय देऊ!

फक्त एवढेच वचन देतो की

उद्यापासून प्रत्येक दिवस

माझा जन्मदिवस असेल..!’

‘बार्बरेर प्रार्थना’ (१९७६) या घोष यांच्या काव्यसंग्रहाला एका ऐतिहासिक घटनेचा संदर्भ आहे. तीन भागांतील ४७ कवितांचा हा संग्रह आहे. हुमायून अकालीच मरणासन्न आजारी झाल्याने बाबरने आपलं आयुष्य हुमायूनला मिळावं अशी प्रार्थना केली होती. त्याविषयीच्या या कवितासंग्रहाला १९७७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. या व्यतिरिक्त कुमार आसन पुरस्कार (१९८२), रवींद्र पुरस्कार (१९८९), नरसिंहदास पुरस्कार, शिरोमणी पुरस्कार, अन्नदाशंकर स्मारक पुरस्कार, भारतीय भाषा परिषदेचा स्वर्णाचल पुरस्कार (२००४), २०१६चा ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्भूषणने शंख घोष यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com